NEET आणि JEE परीक्षांसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर पालक संघटनांची नाराजी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 18 August 2020
  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ जुलै रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार NEET आणि JEE  या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होतील असे जाहीर केले.
  • परंतु कोरोना महामारीकाळात परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये याकरीता देशातील विविध अकरा राज्यातील अकरा विद्यार्थ्यांनी सप्टेंबर मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई :- नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ जुलै रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार NEET आणि JEE  या परीक्षा सप्टेंबर महिन्यात होतील असे जाहीर केले. परंतु कोरोना महामारीकाळात परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या  आरोग्याला धोका निर्माण होऊ नये याकरीता देशातील विविध अकरा राज्यातील अकरा विद्यार्थ्यांनी सप्टेंबर मध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार NEET आणि JEE परीक्षा ही ठरलेल्या वेळा पत्रकानुसारच होणार असे निश्चित झाले आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने धोरणात्मक निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला तसेच NEET आणि JEE परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच नुकसान होईल असे सांगितले. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पालक संघटनांमध्ये नाराजीचा सूर आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहेता यांनी सुनावणी वेळी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाईल असे सांगितले परंतु दररोज कोरोना बाधितांचा वाढत जाणारा आकडा हा कोरोनाचे संकट अजूनही कमी न झाल्याचा दाखला देत आहे. दरवर्षी NEET आणि JEE परीक्षांसाठी देशभरातून जवळपास २५ लाख विद्यार्थी बसतात. अश्या परिस्थितीत सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्यात आल्या तर आरोग्य सुरक्षा पुरवण्याकरीता मोठी समस्या निर्माण होऊ शकेल असे मत पालक संघटना व्यक्त करीत आहेत. 

NEET आणि JEE ह्या परीक्षांच्या आयोजनासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागेल. अनेक ठिकाणी वाहतुकीच्या समस्या असल्याकारणाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत वेळेत पोहोचण्याकरीता मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल तसेच परीक्षा केंद्रांवरही कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. NEET आणि JEE ह्या परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन डिसेंबर महिन्यात घ्याव्यात असे मत इंडिया वाइड पॅरेंट्स असोसिएशनने व्यक्त केले होते. यासाठी त्यांनी मनुष्यबळ विकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, गृह मंत्रालय, कुटुंब कल्याण मंत्रालय यांना पत्र दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानेच वेळापत्रकानुसार परीक्षा होतील असे आदेश दिल्यामुळे ठरलेल्या वेळेनुसार परीक्षा होणारच असे निश्चित झाले आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायला गेला असताना जर त्याला कोरोनाची लागण झाली आणि तो घरच्यांच्या संपर्कात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनाही जर कोरोना झाला तर याची जबाबदारी राज्य सरकारची असेल आणि जीवितहानी झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही केंद्र सरकारची असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्टुडंट यूनियनचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News