बालवाडीत शिकवण्या हा पालकांचा क्रुरपणा - डॉ. श्रुती पानसे

सुशांत सांगवे
Sunday, 19 January 2020

डॉ. श्रुती पानसे यांची टीका; विद्यार्थी-पालक अन्‌ शिक्षकांशी साधला मनमोकळा संवाद

लातूर : मुलाच्या शिक्षणाची सुरवात श्रवणाने आणि संभाषणाने करायची असते; पण बहुतांश बालवाडीत लेखनाने केली जात आहे. हा भाषा शिक्षणाचा नैसर्गिक क्रम नाही. मुलांवर अशा प्रकारे वाचन, लेखन लादू नका. बालवाडीपासूनच त्यांना शिकवण्यांना (ट्यूशन) पाठविणे, हा तर क्रुर प्रकार आहे, अशा शब्दांत मेंदू आणि बुद्धीमत्ता अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांनी बदलत्या शिक्षणपद्धतीवर बोट ठेवले.

शैक्षणिक संशोधन व विकास परिषद (इरादा) यांच्या वतीने ‘शिक्षणावर बोलू काही’ या कार्यक्रमात डॉ. पानसे यांनी 'मुलांच्या भावविश्वात डोकावताना' या विषयावर शनिवारी (ता. १८) विद्यार्थी-पालकांशी मनमोकळा संवाद साधला. पुण्या-मुंबईत बालवाडीतील मुलांचे ट्यूशन घेतले जातात. लातूरसारख्या लहान शहरात घेतले जातात का, असा प्रश्न विचारल्यानंतर प्रेक्षकांमधून ‘हो’ असे उत्तर आले. त्यामुळे लहान वयातच अशा प्रकारचे ओझे मुलांवर लादू नका, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी निवृत्त शिक्षण उपसंचालक भाऊ गावंडे, परिषदेचे मधुकर दुवे, उमाकांत किडीले उपस्थित होते. संस्थेच्या यू ट्यूब चॅनेलचे उद्‌घाटन या सोहळ्यात करण्यात आले.

डॉ. पानसे म्हणाल्या, श्रवण, संभाषणाने शिक्षणाची सुरवात व्हायला हवी. त्यानंतर लेखन-वाचन हे टप्पे येतात. मात्र, लेखन-वाचन हे टप्पे आधी घेणे पूर्णत: चुकीचे आहे. ज्या वयात मुलाच्या डोळ्याची बुबळे अजून स्थिर झालेली नसतात, त्या वयात त्यांना आपण एका चौकटीत पानभर ए-बी-सी-डी काढायला सांगतो, हे त्यांच्या डोक्यावर आघात करण्यासारखे आहे. त्यात घरात मराठी वातावरण आणि शाळेत इंग्रजी वातावरण. त्यामुळे मुल कुठल्या मानसिक परिस्थितीतून जात असते, याचा आपण अंदाजही घेत नाही. खरंतर या वयात त्यांना भींतीवर किंवा कागदावर रेघोट्या मारू द्या. बस इतकेच.

मुल जन्मल्यानंतर पहिल्या दोन वर्षात ते बोलायला लागू लागले, घरातली भाषा शिकले आणि चालायला लागू लागले तर त्याचा मेंदू चांगला आहे, असे म्हणता येईल. मेंदू हा व्यापक असतो. हव ते शोषून घेते. पण, आपण हा मेंदू एका चौकटीत अडकवतो. याला शालेय चौकट म्हणतात. गुण कमी पडले की आपण मुलांना रागावतो. मारतो. ट्यूशनची संख्या वाढवतो. यातून तू निर्बुद्ध आहेस, हेच आपण अप्रत्यक्षपणे सांगत असतो. मुलांसोबत असे वागू नका. कमी गुण पडले असतील, तर संवाद साधून कुठे कमी गुण पडले हे जाणून घ्या. मुलाची गती ज्यात आहे, ते त्याला द्या. पुढे जाऊन तो त्या क्षेत्रात नक्कीच चमकेल, असे डॉ. पानसे यांनी सांगितले.

 

केवळ गुणांसाठी मुलांमधील आत्मविश्वास घालवू नका. सचिन, धोनी, दीपिका अशा अनेकांना आपण कधी गुण विचारले आहेत का? मुलाची आवड ज्या क्षेत्रात आहे, त्या क्षेत्रात त्याला चमकू द्या.

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि बुद्धीमत्ता अभ्यासक 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News