पनीर बिर्याणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

पनीर सगळ्यांनाचा आवडत त्यामुळे आज तुमच्यासाठी खास पनीर बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे. 

 पनीर सगळ्यांनाचा आवडत त्यामुळे आज तुमच्यासाठी खास पनीर बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे. 

साहित्य :-

• २ कप बासमती तांदूळ 
• ३-४ वेलची
• ३-४ तमालपत्र
• ३-४ लवंग 
• १ लहान दालचिनी काडी
• पनीर मॅरीशेन
• २५० ग्रॅम पनीर
• १/२ कप दही आलेलसूण पेस्ट
• १/४ चमचा मीठ 

ग्रेव्ही

• १ कप कांदा (उभा पातळ चिरलेला)
• ५ टोमॅटो
• २ चमचा आलं लसूण पेस्ट
• २ चमचा तूप

खडा गरम मसाला

• २ वेलची 
• ३-४ लवंग 
• ३-४ मिरीदाणे 
• २-३ तमालपत्र 
• १ चमचा धणेपूड
• १ चमचा जिरेपूड
• १ चमचा गरम मसाला 
• १/२ चमचा लाल तिखट
• १ कप मिल्क पावडर (किंवा १/२ कप क्रिम)
• चवीपुरते मीठ

साधारण पाऊण ते एक कप भाज्यांचे तुकडे

• मटार 
• गाजर लहान तुकडे
• फरसबी तुकडे

इतर साहित्य

• ४ चमचे तूप
• १ कप कांद्याचे पातळ उभे काप
• ८ ते १० काजूबी 
• ८-१० बेदाणे
• १/४ कप पुदीना बारीक चिरून 
• १/४ कप कोथिंबीर बारीक चिरून 
• २ चमचा दूध 
• ३-४ केशर काड्या

कृती

पनीर

दही फेटून घ्यावे. त्यात आले लसूण पेस्ट आणि मीठ घालून मिक्स करावे. पनीरचे तुकडे या मिश्रणात १/२ तास घोळवून ठेवावे. 

भात

तांदूळ स्वच्छ धुवून १/२ तास निथळत ठेवावेत. पातेल्यात ६ कप पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात वेलची, लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि मीठ घालून पाण्यात उकळी येऊ द्यावी. पाणी उकळले की, त्यात धुतलेले तांदूळ घालावे. भात साधारण ६० ते ७० टक्के शिजला की, चाळणीमध्ये ओतावा आणि अधिकचे पाणी काढून टाकावे. तयार भात परातील मोकळा करून गार होण्यास ठेवावा. 

ग्रेव्ही

पाणी उकळावे. त्यात टोमॅटो घालून २ मिनिटांनी गार पाण्यात सोडावे. सालं सुटली की, काढून टाकावी. आतील गराच्या मध्यम फोडी कराव्यात. कढईत २ चमचा तूप गरम करून त्यात खडा गरम मसाला काही सेकंद परतावा. आलेलसूण पेस्ट परतावी. कांदा घालून तो गुलाबी रंग येई येईस्तोवर परतावा. नंतर चिरलेल्या टोमॅटोच्या फोडी घालून त्या नरम होईस्तोवर परतवावे. लाल तिखट घालावे. हे मिश्रण थोडे गार होवू द्यावे. मिक्सरमध्ये पाणी न घालता प्युरी करावी. कढईत साधारण २ चमचे तूप गरम करावे. यामध्ये काजूबी आणि बेदाणे परतून बाजूला काढून ठेवावे. याच तुपात ही प्युरी परत कढईत घ्यावी. मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवावी. त्यात धणेजिरेपूड, गरम मसाला घालावा. मिल्क पावडर घालावी. भाज्या घालाव्यात निट ढवळून हे मिश्रण घट्टसर करावे. चवीपुरते मीठ घालावे. ही ग्रेव्ही एकदम पातळ किंवा एकदम घट्टही नसावी. ग्रेव्ही दाटसर होत आली की, पनीरचे मॅरीनेट केले तुकडे घालून थोडा वेळ उकळी काढावी. 

तळलेला कांदा

तुपात किंवा तेलात कांद्याचे पातळ काप (१ कप ) खरपूस तळून काढावेत. हा तळलेला कांदा सजावटीसाठी वापरावा. 

एकदा भात आणि ग्रेव्ही तयार झाली की, भाताचे ४ आणि ग्रेव्हीचे ३ असे समसमान भाग करून घ्यावे. एका खोलगट नॉनस्टिक पॅनमध्ये पाहिले तूप सोडावे आणि पसरवून घ्यावे. प्रथम भाताचा एक भाग घेऊन समान पसरावा. त्यावर ग्रेव्हीचा १ भाग समान पसरवून घ्यावा. थोडा चिरलेला पुदीना आणि कोथिंबीर घालावी. ३-४ काजू, बेदाणे घालावे. अशाप्रकारे सर्व थर पूर्ण करावे. भाताचा शेवटचा थर दिला की, त्यावर तळलेला कांदा, उरलेले काजू बेदाणे आणि दुधात कालवलेले केशर असे पसरावे. वरती घट्ट झाकण ठेवावे, वाफ बाहेर जाता कामा नये. एकदम मंद आचेवर १५ ते २० मिनिटे वाफ काढावी. गरम गरम बिर्याणी रायत्याबरोबर सर्व्ह करावी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News