टिकटॉकच्या नादात मुलीचे एक जोडी कपडे आणि ५००० रुपये घेऊन पलायन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019
  • मोबाईल रिचार्जमुळे ठावठिकाणा, नेपाळला जाताना घेतले पोलिसांनी ताब्यात
  • घरातून पलायन करण्यासाठी या मुलीने एक जोडी कपडे आणि ५००० रुपये जवळ ठेवले होते​

मुंबई - टिकटॉक ॲप्लिकेशनवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याला भेटण्यासाठी घर सोडून नेपाळला निघालेल्या १४ वर्षांच्या मुलीचे समुपदेशन करून वडाळा पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले. या मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत.

शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी १४ वर्षांची दहावीत शिकणारी मुलगी समाजमाध्यमांवरील टिकटॉक ॲपवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याची चाहती आहे. ती दिवसभर आईच्या मोबाईलवर रियाजचे व्हिडीओ पाहायची. त्यावरून तिचे वडिलांसोबत वारंवार वाद व्हायचे.

कुटुंबीयांनी तिच्याकडून मोबाईल काढून घेतला होता. दिल्ली आणि नेपाळमध्ये रियाजचे कार्यक्रम असल्याची माहिती तिला मैत्रिणीने दिली. त्यानुसार तिने रियाजला भेटण्यासाठी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

घरातून पलायन करण्यासाठी या मुलीने एक जोडी कपडे आणि ५००० रुपये जवळ ठेवले होते. १ जूनला पहाटे साडेचार वाजता कुटुंबीय झोपेत असताना ती घराबाहेर पडली. त्यानंतर तिने कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस गाठून सकाळी ६.१५ वाजता गोरखपूरकडे रवाना होणारी एक्‍स्प्रेस पकडली. शोध घेऊनही तिचा थांगपत्ता न लागल्यामुळे कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांकडे धाव घेतली. 

दरम्यान, वडाळा पोलिसांनी दिलेल्या सूचनेवरून खांडवा येथील रेल्वे सुरक्षा दलातील पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात ठेवले. त्यानंतर रविवारी वडाळा पोलिसांनी खांडवा येथे या मुलीचे समुपदेशन करून तिला मुंबईतील घरी आणले.

रिचार्जवरून समजला ठावठिकाणा
या मुलीने आईचा मोबाईल नेला असल्याचे पोलिसांना समजले. मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या क्रमांकावर रिचार्ज केला. रिचार्जचा संदेश आल्यानंतर ती मुलगी रेल्वे गाडीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तिला खांडवा स्थानकात उतरण्यास भाग पाडले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News