100 कोव्हिडग्रस्त मुलांपैकी 18 मुलांना कोव्हिडमुळे दुर्मिळ आजार झाल्याचे निदान 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 22 July 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे या लहान मुलांमध्ये अवयव निकामी आणि हृदयावर परिणाम झाल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मुंबईच्या परळ येथील लहान मुलांचे बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील 100 कोव्हिडग्रस्त मुलांपैकी 18 मुलांना कोव्हिडमुळे दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे या लहान मुलांमध्ये अवयव निकामी आणि हृदयावर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. त्यात एका 6 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर 24 तासांच्या आत या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे; तर दुसऱ्या 4 वर्षांच्या मुलीवर व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात आले. शिवाय, अशा प्रकारे कोव्हिडमुळे लहान मुलांना इतर आजार होऊन मृत्यू झाल्यामुळे या घटनेची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) माहिती देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून वाडिया रुग्णालयात 100 कोरोना पॉझिटिव्ह मुलांवर उपचार केले जात आहेत. त्यापैकी 18 मुला-मुलींना पीएमआयएस म्हणजेच पीडिऍट्रीक मल्टिसिस्टिम इन्फ्लॅमेटरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराची लक्षणे दिसली. त्यातील एकीला आपला जीव गमवावा लागला, तर दुसऱ्या मुलीवर गेल्या 12 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. सोमवारी तिला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. पीएमआयएस हा एक जीवघेणा दुर्मिळ आजार आहे. जो लहान मुलांना कुठलाही संसर्ग झाला की होऊ शकतो. यात ताप आणि अवयव निकामी होतात. शिवाय, त्वचेवर चट्टे आल्यानंतर काही काळाने हृदय, धमन्या, किडनी, फुप्फुस आणि दुसऱ्या अवयवांवर त्याचा परिणाम होतो. योग्य उपचार नाही झाले तर मृत्यूदेखील ओढावू शकतो. कोव्हिडच्या संसर्गामुळे या मुलांमध्ये हा आजार आढळून आला आहे, असे जनरल फिजीशियन डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले आहे. लहान मुलांना कोव्हिडचा संसर्ग झाल्यास पुढच्या 3 ते 4 आठवड्यांत पीएमआयएसची लक्षणे दिसतात, असे डॉक्‍टरांच्या निरीक्षणातून समोर आले आहे.

ब्रोकन हार्ट सिंड्रोमचाही धोका
पीएमआयएससोबत या लहान मुलांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम या आजाराचीदेखील लक्षणे दिसून आली आहेत. आतापर्यंत याची लक्षणे फक्त तरुणांमध्ये किंवा मध्यम वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येत होती. हा सिंड्रोम आतापर्यंत एकाही लहान मुलामध्ये आढळलेला नसल्याचा दावा वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ब्रोकन हार्ट सिंड्रोममध्ये रुग्णाच्या हृदयात स्ट्रोक येतो आणि हृदयावर त्याचा परिणाम होतो.

चार वर्षांच्या मुलीची लढाई
सध्या वाडिया रुग्णालयात चार वर्षांची मुलगी ब्रोकन हार्ट सिंड्रोम या आजाराशी गंभीररित्या लढा देत आहे. ही मुलगी जुलै महिन्यात रुग्णालयात हृदयाच्या ठोक्‍यांची समस्या, कमी रक्तदाबाची समस्या आणि न्यूमोनियाची लक्षणे घेऊन दाखल झाली होती. त्यानंतर तिला लगेचच व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि तिचा रक्तदाब सुधारावा म्हणून उपचार केले गेले. आधी तिची कोव्हिड चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, आणखी एक चाचणी केल्यानंतर तिला पीएमआयएस हा आजार असू शकतो, असे निदान डॉक्‍टरांनी केले. त्यानंतर तिची अँटीबॉडीज चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर ती कधीतरी कोरोनाच्या संसर्गात आली असावी असे स्पष्ट झाले. तिच्यावर तात्काळ या संबंधित उपचार केले गेले आणि आता या मुलीची हळूहळू प्रकृती सुधारत असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून रुग्णालयात लहान मुलांसाठी कोव्हिड 19 वॉर्ड सुरू करण्यात आला. ब्रोकन हार्ट सिंड्रोम आणि कोव्हिड 19 मध्ये काय संबंध आहे, यावर डॉक्‍टर्स अभ्यास करत आहेत. कारण हा सिंड्रोम लहान मुलांमध्ये आढळत नाही. याबाबतचा पत्रव्यवहार लवकरच आयसीएमआरसोबत केला जाणार आहे.
- डॉ. मिनी बोधनवाला, सीईओ, वाडिया रुग्णालय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News