‘आपली माती- आपलं कोल्हापूर’ हा संस्कार कायम

संभाजी गंडमाळे
Saturday, 25 May 2019

राज्य नाट्य स्पर्धेत प्रमुख दावेदार म्हणून आमच्याकडे पाहिले जाऊ लागले. आजवर अनेक नाटकं, चित्रपटांतून भूमिका केल्या. पण, ‘आपली माती- आपलं कोल्हापूर’ हा संस्कार कायम जपला.
- अभिनेता, दिग्दर्शक प्रकाश पाटील

 

मी मूळचा कसबा बीडचा. जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून रुजू झालो. काळम्मावाडीला कार्यरत असताना १९९३ च्या सुमारास येथे नाट्यचळवळ सुरू झाली. हनुमान नाट्य मंडळाच्या माध्यमातून रंगमंचावर एंट्री केली. सुरवातीला ‘ही पोरं काय करणार नाटक’ अशी टीकाही झाली. पण, पुढे राज्य नाट्य स्पर्धेत प्रमुख दावेदार म्हणून आमच्याकडे पाहिले जाऊ लागले.

आजवर अनेक नाटकं, चित्रपटांतून भूमिका केल्या. पण, ‘आपली माती- आपलं कोल्हापूर’ हा संस्कार कायम जपला...प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक प्रकाश पाटील संवाद साधत असतात आणि ‘हनुमान’च्या टीमसह त्यांचाही प्रवास उलगडत जातो.

‘हनुमान’च्या टीमसाठी सुनील माने यांनी लेखन करायचे आणि श्री. पाटील यांचे दिग्दर्शन हे एक अतूट समीकरण. या टीमने अनेक नाटकं हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीवर आणली. त्यात पाटील यांचं योगदान मोठे राहिले. ‘शेवंता जिती हाय’, ‘अंधार’, ‘निष्पाप’, ‘नातीगोती’, ‘आषाढातील एक दिवस’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘धरणाखालच्या अंधारातून’, ‘सासू ४२०’, ‘जमेल तसं’, ‘पेईंग गेस्ट एकदम बेस्ट’, ‘गोंधळ मांडियेला’, ‘बांबूकाका’, ‘अग्निदिव्य’ ही नाटकं हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सादर केली. स्पर्धेपुरतेच मर्यादित प्रयोग न ठेवता काही नाटकांचे प्रयोग जाणीवपूर्वक सर्वत्र केले. अभिनय आणि दिग्दर्शनासाठी पाटील यांना अनेक पारितोषिकं मिळाली.

‘सौभाग्यलक्ष्मी’, ‘रामदेव आले रे बाबा’, ‘इवलासा खोपा’, ‘झक मारली बायको केली’, ‘रंगीबेरंगी’, ‘प्रेमाय नमः’, ‘झेल्या’, ‘काव काव कावळे’, ‘शिवगड पोलिस स्टेशन’, ‘मिक्‍सर’ आदी चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या. मात्र, ‘कथा नाम्या जोग्याची’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष उल्लेखनीय ठरली. देवदासींच्या प्रश्‍नावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ‘हनुमान’च्या टीमसह पाटील यांचा आग्रह होता.

अनेक अडचणी होत्या; पण त्यावर मात करत हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ‘रात्रीस खेळ चाले’ यासह विविध मालिका आणि ‘कर्मानम्‌’ लघुपटातही त्यांच्या भूमिका होत्या. नोकरी करत त्यांनी हा सारा प्रवास केला. अर्थात सध्या ते सेवानिवृत्त झाले असले तरी आजही तितक्‍याच सळसळत्या उत्साहानं नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

नाटकांच्या माध्यमातून परिवर्तनाचा विचार मांडण्याचा आजवर प्रयत्न केला. त्याला रसिक मायबाप प्रेक्षक आणि कलापूरचाही नेहमीच पाठिंबा मिळाला. येत्या काळातही तितक्‍याच खमकेपणाने कार्यरत राहीन.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News