...अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल: विद्यार्थी संघटनेचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020
  • दक्षिण मुंबईतील नामांकित महाविद्यालय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थांची लूट करत असल्याचा आरोप आंबेडकर स्टुडंट्‌स असोसिएशनने केला आहे.

मुंबई: दक्षिण मुंबईतील नामांकित महाविद्यालय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थांची लूट करत असल्याचा आरोप आंबेडकर स्टुडंट्‌स असोसिएशनने केला आहे. महाविद्यालयाच्या अर्जाची 500 रुपयांपर्यंत विक्री होत असल्याने विद्यार्थांची ही लूट तातडीने थांबवावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थांच्या पालकांचे रोजगार बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यातच प्रवेशासाठी महाविद्यालये विद्यार्थांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये मुंबईतील नामांकित सेंट झेवियर्स आणि जय हिंद महाविद्यालयसुद्धा सामील झाले आहेत, असा आरोप संघटनेचे अध्यक्ष सचिन मनवाडकर यांनी केला आहे.

ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज असलेले प्रॉस्पेक्‍ट्‌स सुमारे 100 ते 200 रुपयांपर्यंत असते. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रॉस्पेक्‍ट्‌स तसेच महाविद्यालयाची माहिती वेबसाईटवर असल्याने अनेक महाविद्यालयांचे प्रॉस्पेक्‍ट्‌स छापण्याचे पैसे वाचत आहेत. असे असतानासुद्धा सेंट झेवियर्स महविद्यालय प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जाची किंमत तब्बल 500 रुपये घेत आहे; तर जय हिंद महाविद्यालय अनुदानितसाठी 250 रुपये आणि विनाअनुदानितसाठी 500 रुपये घेत आहे. गंमत म्हणजे जिथे विद्यार्थी कमी येतात अशा एम. कॉम. आणि पीएच.डी.साठी फक्त 100 रुपये जय हिंद महाविद्यालय घेत आहे. ही विद्यार्थ्यांची लूट असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

कारवाईची मागणी
नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी हजारो विद्यार्थी अर्ज करतात आणि यातून लाखो रुपयांची रक्कम महाविद्यालयांना मिळते. कोरोनामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक संकट ओढवले असतानाही महाविद्यालये पैसा उकळत आहेत, असा आरोप आंबेडकर स्टुडंट्‌स असोसिएशनने केला आहे. हे रोखण्यासाठी सेंट झेवियर्स आणि जय हिंद महाविद्यालयांवर कारवाई करण्याची मागणी संघटनेने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि कुलगुरू यांच्याकडे केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News