नाहीतर मुंबई-कोल्हापूरच्या खेळाडूंवर होईल कारवाई 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या नियमानुसार जो खेळाडू ज्या जिल्ह्यातर्फे खेळत असेल, त्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्याच्या क्‍लबकडून खेळला असेल व त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले नसेल तर अशा खेळाडूंवर गैरशिस्तीची कारवाई करण्यात येते.

जळगाव : जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय आंतर जिल्हा महिला खुल्या गटातील फुटबॉल स्पर्धेत अंतिम स्पर्धेसाठी मुंबई व कोल्हापूर संघांनी आपली जागा निश्‍चित केली आहे. दोन्ही संघांमध्ये उद्या (ता.२५) दुपारी सामना रंगणार असून, कोण अंतिम बाजी मारणार याचीच उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर ही स्पर्धा होत आहे. आज उपांत्य फेरीचे सामने खेळविण्यात आले. पहिला सामना मुंबई विरुद्ध पुणे यांच्यात झाला. पुण्याच्या सोनाली चितेने पहिल्या दहा मिनिटातच गोल करून आघाडी घेतली. त्यानंतर विसाव्या मिनिटात सोनालीने दुसरा गोल करून २-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु मुंबईच्या श्रुती लक्ष्मीने दुसऱ्या हाफनंतरच्या पाचव्या मिनिटात गोल आणि तिसाव्या मिनिटात पुन्हा दुसरा गोल करून संघास बरोबरीत आणले. नियोजित वेळेनुसार खेळ संपला तेव्हा दोन्ही संघ २-२ बरोबरीत होते. त्यामुळे ट्राय ब्रेकर देण्यात आला. टायब्रेकरमध्ये मुंबईने चार गोल केले. तर पुण्याचे फक्त दोन गोल झाले. त्यामुळे मुंबईने हा सामना चार-दोन असा जिंकला.
दुसरा उपांत्य सामना कोल्हापूर विरुद्ध बुलडाणा यांच्यात झाला. बुलडाणा संघातील सात खेळाडू जखमी असल्याने सामना एकतर्फी झाला. कोल्हापूरच्या प्रतीक्षा मिठारीने चार गोल केले. तर सरस्वती माळीने व अधिका भोसलेने प्रत्येकी एक गोल करत कोल्हापूर संघाला ६-० ने विजेतेपद मिळवून दिले.

आजच्या सामन्यांमधील उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुंबईची श्रुती लक्ष्मी व कोल्हापूरची सरस्वती माळी यांना उत्कृष्ट खेळाडू तर पुण्याची गोलकीपर कश्‍मिरा पेडणेकर व बुलडाण्याची दीपसिका हिवाळे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील अंतिम सामन्यानंतर लागलीच पारितोषिक वितरण समारंभ होईल.

मुंबई, कोल्हापूरच्या खेळाडूंवर कारवाई
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या नियमानुसार जो खेळाडू ज्या जिल्ह्यातर्फे खेळत असेल, त्या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्याच्या क्‍लबकडून खेळला असेल व त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले नसेल तर अशा खेळाडूंवर गैरशिस्तीची कारवाई करण्यात येते. त्यानुसार आज मुंबई संघातील सहा व कोल्हापूर संघातील चार महिला खेळाडू यांच्यावर शिस्त पालन समितीचे समन्वयक फारुक शेख यांनी कार्यवाहीसाठी मुंबई येथे अहवाल सादर केला. तत्पूर्वी या खेळाडूंना पुढील स्पर्धा खेळण्यास बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळे उद्या (ता.२५) होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबई संघातील सहा खेळाडूंचा सहभाग नसेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News