'या' वेटलिफ्टरला हवा 'अर्जुन' पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 29 May 2020

अर्जुन पुरस्कारासाठी चानूने आमच्याकडे अर्ज केला. आम्ही तिची शिफारस केली आहे,

मुंबई : अनुभवी वेटलिफ्टर सैखोम मीराबाई चानू हिला 2018 मध्ये राजीव गांधी खेलरत्न क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याच वर्षी तिचा पद्मश्री पुरस्काराने गौरव झाला; पण आता तिने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला आहे. "खेलरत्न' हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मानला जातो. तो तिला 2018 मध्ये विराट कोहलीसह देण्यात आला होता. 2017 मध्ये जागतिक स्पर्धेत विजेतेपद जिंकल्यामुळे देण्यात आला होता. 

अर्जुन पुरस्कारासाठी चानूने आमच्याकडे अर्ज केला. आम्ही तिची शिफारस केली आहे, असे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सचिव सहदेव यादव यांनी सांगितले. चानूनेही मला अर्जुन पुरस्कार हवा आहे, असे सांगितले. जागतिक विजेतेपदानंतर चानूला दुखापतीने सतावले; पण गतवर्षीपासून तिची कामगिरी उंचावत आहे. तिने आशियाई स्पर्धेत एकंदर 199 किलो वजन उचलून ब्रॉंझ पदक जिंकले. त्यानंतरच्या जागतिक स्पर्धेत तिने 201 किलो वजन पेलण्याची कामगिरी केली. त्या वेळी तिने स्नॅचमध्ये 87; तर क्‍लीन अँड जर्कमध्ये 114 किलो वजन पेलले होते. तिच्याप्रमाणेच राष्ट्रकुल क्रीडाविजेत्या राहुल आणि पूनमची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. सतीश शिवलिंगमला 2015 मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकाही वेटलिफ्टरने हा पुरस्कार जिंकलेला नाही.
 

खेलरत्न हा देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असल्याचे मीसुद्धा जाणते; पण यापूर्वी माझा अर्जुन पुरस्कार हुकला होता. त्या पुरस्कारानेही मला गौरविण्यात यावे, असे मला वाटते. अर्जुन पुरस्कार जिंकावा, असे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. 2018 मध्ये मी अर्जुन पुरस्कारासाठीही अर्ज केला होता.
- मीराबाई चानू

प्रत्येक खेळाडूसाठी अर्जुन पुरस्काराचे महत्त्व असते. आता यापासून चानूही अपवाद नाही. तिने अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला आहे. खेलरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर अर्जुन पुरस्कार मिळू शकतो. खेलरत्न पुरस्कार मोठा असेल; पण अर्जुन पुरस्कारही काही कमी महत्त्वाचा नाही.
- सहदेव यादव, भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सचिव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News