‘आयसीटी’मध्ये करिअर संधी

हेमचंद्र शिंदे, करिअर, प्रवेशप्रक्रिया मार्गदर्शक
Tuesday, 11 June 2019

स्वातंत्र्यपूर्व काळात १९३३मध्ये आयसीटी (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई) या संस्थेची स्थापना झाली.

स्वातंत्र्यपूर्व काळात १९३३मध्ये आयसीटी (इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई) या संस्थेची स्थापना झाली. २००४मध्ये स्वायत्त संस्थेचा दर्जा, मानवसंसाधन मंत्रालयाकडून सतत ‘अ’ श्रेणी, त्याचबरोबर देशभरातील शेकडो कंपन्यांबरोबर व जपान, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी, कॅनडा, इटलीसह अनेक शैक्षणिक संस्थांशी सामंजस्य, सहकार्याचे करार असलेली केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा असलेली नामांकित संस्था असून, यामधील प्रवेश म्हणजेच जागतिक स्तरावर करिअरची संधी असते.

उपलब्ध कोर्सेस -
बारावीनंतर चार वर्षे कालावधीचे एकूण नऊ पदवी अभ्यासक्रम असून, एकूण २४१ जागा उपलब्ध आहेत. बॅचलर ऑफ केमिकल इंजिनिअरिंग (७५ जागा), बॅचलर ऑफ टेक्‍नॉलॉजी (१३६ जागा) असून, या बी.टेक. अंतर्गत रंगसामग्री तंत्रज्ञान (२० जागा), धागे व वस्त्र निर्मिती प्रक्रिया तंत्रज्ञान (३४ जागा), अन्न अभियांत्रिकी तंत्रज्ञान (१६ जागा), तैलरसायन पृष्ठ क्रियाकर्मी तंत्रज्ञान (१६ जागा), औषधनिर्माण व तंत्रज्ञान (१८ जागा), पॉलिमर इंजिनिअरिंग व टेक्‍नॉलॉजी (१६ जागा), सरफेस कोटिंग (१६ जागा) उपलब्ध होतात. याचबरोबर बॅचलर ऑफ फार्मसी, बीफार्मसाठी ३० जागा आहेत.

प्रवेशप्रक्रिया -
वरील पदवी अभ्यासक्रमासाठी संस्थेमार्फत कोणतीही स्वतंत्र परीक्षा घेतली जात नाही. बी.टेक. इंजिनिअरिंग सात शाखा व बॅचलर ऑफ केमिकल इंजिनिअरिंगच्या शाखांमधील ७० टक्के जागांवरील प्रवेश हे राज्यस्तरावर राज्य शासनातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमएचटी सीईटी २०१९मधील गुणांद्वारे व ३० टक्के जागांवरील प्रवेश ऑल इंडिया स्तरावर अभियांत्रिकी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या जेईई मेन २०१९मधील गुणांद्वारे होतात. बॅचलर ऑफ फार्मसीमधील ७० टक्के जागांवरील प्रवेश राज्य शासनाच्या फार्मसीसाठीच्या एमएचटी सीईटीमधील गुणांच्या आधारे, तसेच ३० टक्के प्रवेश हे देशपातळीवरील नीट परीक्षेच्या गुणांद्वारे मागील वर्षी देण्यात आले.

संपूर्ण प्रवेशप्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या अंतर्गत तंत्रशिक्षण विभागामार्फत राबवली जाते. जूनमध्ये सीईटीच्या निकालानंतर राज्यातील अभियांत्रिकीसाठीच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या पसंतिक्रम भरण्याच्या प्रोसेसमध्येच बी. केमिकल इंजिनिअरिंग व बी. टेक इंजिनिअरिंगच्या जागांसाठीचे पसंतीक्रम नोंदविण्याची सोय असते. राज्यातील फार्मसीसाठीच्या पसंतीक्रम भरण्याच्या प्रक्रियेमध्येच आयसीटी मधील बी.फार्मसाठी पसंतीक्रम नोंदविण्याची सोय असते. वरील दोन्ही शाखांची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे न तीन फेऱ्यांच्या माध्यमातून राबविली जाते.

शैक्षणिक पात्रता -
बी.टेक. इंजिनिअरिंग बी. केमिकल इंजिनिअरिंग व बी. फार्मसाठी संबंधित ग्रुपमध्ये बारावी परीक्षेत एकत्रितरीत्या खुला गट ५० टक्के व राखीव गटासाठी ४५ टक्के कमीत कमी गुणांची पात्रतेसाठी आवश्‍यकता असते.
आयसीटी मुंबईबरोबरच इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी मराठवाडा कॅम्पस जालना, तसेच आयओसी कॅम्पस भुवनेश्‍वर या ठिकाणी प्रवेश दिले जाऊ शकतील. त्यासंबंधी माहितीसाठी www.ictmumbai.edu.in या संकेतस्थळाच्या 
संपर्कात राहावे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News