कोरोनावर नियंत्रन मिळवण्याचा 'हा' एकमेव उपाय: राजेश टोपे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 April 2020

एका संसर्गित रूग्णासोबत 10 संशयित क्वारंटाइन करण्याची तयारी ठेवावी. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांची स्वतंत्र टिम तयार करण्यात यावी, असेही यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई : मतदार यादीनिहाय नागरिकांचे सर्वेक्षण केल्यास कोरोनावर नियंत्रण मिळू शकेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला. नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कायदा, सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य व प्रशासकीय उपाययोजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोरोना साथ रोगाच्या निमित्ताने होणऱ्या सर्वेक्षणात आरोग्य यंत्रणांची पथके घरोघरी जात आहेत. परंतू लोक घरातील लोकांची खरी संख्या सांगत नाही. सर्वेक्षण करणारे त्यांना ओळखतही नाही, अशा परिस्थितीत मतदार यादी व पल्स पोलिओ अभियानाच्या याद्यांचा संदर्भ घेवून सर्वेक्षण केल्यास मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाला यश मिळेल. सर्वेक्षण हाच कोरोना नियंत्रणाचा पहिला टप्पा असून त्यात मिळालेले यश हे महत्वाचे असेल, त्यात अपयश आल्यास कोरोना नियंत्रणाची दिशाच चुकू शकते. त्यामुळे अचूक सर्वेक्षणावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

ते म्हणाले, 10 ते 15 दिवस प्रलंबित असलेल्या नमुन्यांचे अहवाल हे निगेटिव्ह येवू शकतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जास्त काळ अहवाल प्रलंबित असलेल्या संशयित रूग्णांचे नव्याने स्वॅब घेण्यात यावेत. नमुन्यांचे अहवाल मोठ्या प्रमाणावर प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. एनआयबीच्या संचालक व लॅब इनर्चाज यांच्याशी समन्वय साधून किती दिवसांचा जुना अहवाल हा ग्राह्य धरावा याबाबत मार्गदर्शन घेण्यात यावे. एकूण रूग्णांच्या 5 टक्के लोकांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागेल, असे गृहीत धरून तयारी ठेवावी.

खाजगी हॉस्पीटल्स व क्‍लिनीक यांची सक्रीयता वाढविण्यात यावी. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे, वेळेवर निदान झाल्यास तात्काळ उपचार सुरू करता येतात. सर्वेक्षणामध्ये एक्‍सरे डायाग्नोसिस केल्यास त्याचे परिणाम चांगले दिसून येतील. पोर्टेबल पल्स ऑक्‍सीमीटर व पोर्टेबल एक्‍सरेची सुविधा डिजिटल माध्यमातून केल्यास कार्डियालॉजिस्टच्या माध्यमातून त्याचे तात्काळ निदान करता येवू शकते. स्वतंत्र तापाची तपासणी करणारे क्‍लिनिक सुरू करण्यात यावेत. प्रसंगी खाजगी डॉक्‍टर्स व हॉस्पीटलसच्या सेवा अधिग्रहीत करण्यात याव्यात. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची कमतरता लक्षात घेवून आरोग्य उपसंचालकांमार्फत मालेगाव येथे प्रतिनियुक्तीने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भरती करण्याचे उपसंचालक यांचे अधिकार स्थानिक पातळीवरच आहेत, ते तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार तात्काळ भरती प्रक्रीया राबविण्यात यावी.

गंभीर रूग्णांसाठी नाशिक व मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्‍टरांची मदत घेण्यात यावी. त्यामुळे मृत्यूदर कमी करण्यात आपण यशस्वी होवू. 60 वर्षे वयाच्या मधुमेह व तत्सम आजारांच्या रुग्णांचेही सर्वेक्षण करण्यात यावेत. एका संसर्गित रूग्णासोबत 10 संशयित क्वारंटाइन करण्याची तयारी ठेवावी. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांची स्वतंत्र टिम तयार करण्यात यावी, असेही यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News