डॉक्‍टरांची ऑनलाईन फसवणूक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 25 May 2020

अमेरिकेतील मुलाला सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज पाठवण्याचा घेतला निर्णय 

मुंबई : लॉकडाऊनमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असतानाच केईएम रुग्णालयातील एक ज्येष्ठ डॉक्‍टर या भामट्यांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांना या भामट्यांनी सव्वा लाख रुपयांचा गंडा घातला. या डॉक्‍टरला अमेरिकेत आपल्या मुलासाठी सॅनिटायझर, मास्क पाठवायचे होते. याच संधीचा फायदा घेत डॉक्‍टरची फसवणूक करणाऱ्याविरुद्ध मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केईएम रुग्णालयात सेवा देणाऱ्या 60 वर्षीय डॉक्‍टरांची पत्नी पालिकेत नोकरीला आहे. त्यांचा 28 वर्षांचा मुलगा अमेरिकेत असून सध्या भारतापेक्षा कोरोनाची लाट त्या ठिकाणी भयंकर आहे. या परिस्थितीत मुलाची गैरसोय होऊ नये, डॉक्‍टरांनी भारतामधून सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी गुगल सर्च इंजिनवर जाऊन कुरिअर कंपनीचा कस्टमर केअर क्रमांक शोधला. यावर मिळालेल्या क्रमांकावर डॉक्‍टरने संपर्क साधला कस्टमर केअरमधून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना गुगल पे डाऊनलोड करून त्या माध्यमातून आगाऊ रक्कम 48 हजार रुपये भरण्यास सांगितले. डॉक्‍टरांनी गुगल पेवरून या व्यक्तीने दिलेल्या बॅंक तपशिलावर पैसे ट्रान्स्फर केले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार 29 हजार 101 रुपये पाठविले.

पैसे पाठवून बराच कालावधी उलटला तरी पार्सल घेण्यासाठी कुणीच येत नसल्याने कस्टमर केअरमधील व्यक्तीने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर डॉक्‍टरांनी संपर्क साधला; मात्र हा मोबाईल बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉक्‍टरांनी बॅंक गाठली आणि सर्व प्रकार सांगितला. बॅंकेतील कर्मचाऱ्यांनीदेखील त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. डॉक्‍टरांच्या बॅंक खात्यामध्ये सुमारे 50 लाख रुपये जमा होते. ही रक्कम काढली जाऊ नये, यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांनी तत्काळ डॉक्‍टरांचे दुसरे खाते उघडले आणि ही रक्कम त्या खात्यात वळती केली. डॉक्‍टरांच्या दुसऱ्या बॅंक खात्यातून 49 हजार 996 रुपये परस्पर वळते करण्यात आले. असे सुमारे एक लाख 27 हजार रुपये भामट्यांनी काढून घेतले. डॉक्‍टरांनी याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, याचा अधिक तपास सुरू आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News