ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे एका वर्षाचे काऊंटडाऊन पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 24 July 2020

 एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे एका वर्षाचे काऊंटडाऊन पुन्हा सुरू झाले खरे

टोकियो:  एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे एका वर्षाचे काऊंटडाऊन पुन्हा सुरू झाले खरे; पण टोकियोतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही लांबणीवर टाकलेली स्पर्धा 2021 मध्ये होऊ शकेल का, याबाबत शंका घेतली जात आहे.मूळ कार्यक्रमानुसार टोकियो स्पर्धेचे उद्या (24 जुलै 2020) उद्‌घाटन होणार होते. त्यात दोनशे देशातील अकरा हजार क्रीडापटू आपले कसब पणास लावणार होते. आता ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जवळपास साडेतीन महिने अगोदर स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला.

नव्या कार्यक्रमानुसार 23 जुलै 2021 रोजी टोकियो वेळेनुसार रात्री आठ वाजता स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. त्यामुळे त्याचे काऊंटडाऊन सुरू झाले; पण त्याच्या उत्साहापेक्षा टोकियोत एका दिवशी आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या प्रथमच तीनशेच्या पार गेली. बुधवारी एकंदर रुग्ण दहा हजार झाल्यामुळे टोकियोवासीय धास्तावले होते. त्यातच गुरुवारी 366 रुग्ण आढळल्याचे जाहीर झाले.

एका वर्षापूर्वी टोकियोत ऑलिंपिकचे काऊंटडाऊन सुरू झाले होते. त्या वेळी शहरात उत्साह होता, फटाक्‍यांची आतषबाजी झाली होती. सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पदकांचे अनावर झाले होते; पण आजचा सोहळा पंधरा मिनिटांत उरकण्यात आला. पुढील वर्षीच्या स्पर्धेचे प्रमोशन सुरू झाल्याची एक चित्रफीत दाखवण्यात आली. गेले कित्येक दिवस बंद असल्याचे ऑलिंपिक ज्योतीचे दर्शन घडवण्यात आले. टोकियोत होत असलेल्या पावसाने वातावरणात कुंदपणा आला होता. तोच कार्यक्रमावर जाणवत होता.
ऑलिंपिकला एक वर्ष असल्याचा उत्साह साजरा करण्यासारखी सध्याची परिस्थिती नाही, अशी कबुली ऑलिंपिक संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मॉरी यांनी गेल्या आठवड्यात दिली होती. संयोजन समिती पुढील वर्षीच्या स्पर्धेचा खर्च कसा कमी होईल, याचाच विचार करीत आहे. त्यासाठी दोनशे गोष्टींची निवड झाली आहे. स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे होणारा खर्च आता जपान कितपत पेलू शकेल, हीच विचारणा होत आहे.

शेकडो अब्ज येननी खर्च वाढण्याची भीती
एक वर्ष ऑलिंपिक लांबणीवर पडल्यामुळे जपानवर शेकडो अब्ज येनचा आर्थिक ताण पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने 69 अब्ज येनचे साह्य दिले आहे; पण त्यामुळे भार फारसा कमी होणार नाही. त्यामुळेच ऑलिंपिकच्या निमित्ताने जपानच्या अर्थव्यवस्थेस चालना देण्यासाठी स्पर्धा कालावधीत प्रवासावरील मर्यादा दूर करण्याचा विचार होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News