अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी एक लाख 93 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020

दहावीच्या निकालानंतर शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रेही ऑनलाईन सादर करता येणार आहेत

मुंबई: दहावीच्या निकालानंतर शिक्षण विभागाने अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रेही ऑनलाईन सादर करता येणार आहेत. तसेच त्यांना प्रवेश शुल्कही ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याने यंदा विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
राज्यभरात मुंबई एमएमआर क्षेत्र तसेच पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिकांच्या क्षेत्रात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. या प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ सुरू झाले असून दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येणार आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरल्यानंतर विद्यार्थांना दुसरा टप्प्यात महाविद्यालय पसंतीक्रम असणार आहे. दरवर्षी अकरावी प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचे असले तरी विद्यार्थ्यांना त्यांची प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन करावी लागत होती. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाईन सादर करता येणार आहेत. तसेच त्यांना प्रवेश शुल्कही ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मिळालेला प्रवेश निश्‍चित करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारीसाठी कुठेही धावाधाव करू नका, सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

ग्रेडचे गुणांमध्ये रूपांतर करण्याची सोय
आयसीएसई आणि आयजीएससीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुण ग्रेडमध्ये दिले जातात. त्यामुळे त्यांना दरवर्षी गुणांमध्ये रूपांतर करण्यासाठी धावपळ करावी लागते. मात्र यंदा यामध्ये बदल करण्यात आला असून विद्यार्थांना प्रवेशाच्या संकेतस्थळावरच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

एक लाख 93 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत 1 लाख 92 हजार 247 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये एसएससी बोर्डाचे 1 लाख 72 हजार 357 विद्यार्थी आहेत.

बोर्डनिहाय नोंदणी झालेले विद्यार्थी
एसएससी 1,72,357
सीबीएसई 7,200
आयसीएसई 10,824
आयबी 35
आयजीसीएसई 1260
एनआयओएस 276
इतर 295
एकूण 1,92,247

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News