एक दिवस हाच ठरेल भारताचा 'उसेन बोल्ट'

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 18 August 2019

शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना ट्विटरवर टॅग केले असून या तरुणाला योग्य संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली होती.

भोपाळ : जगातील सर्वात वेगवान माणूस म्हणून जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला ओळखले जाते. मात्र, त्याला टक्कर देणारा भारताचा उसेन बोल्ट तुम्ही पाहिला आहे का? मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील एका तरुण धावपटूचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा तरूण अनवाणी पायांनीसुद्धा 100 मीटर इतके अंतर अवघ्या 11 सेकंदांमध्ये पूर्ण करण्याची कमाल करून दाखवत आहे. या तरूणाचे नाव रामेश्वर गुर्जर असून त्याचा हा व्हिडीओ भाजप नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवरून पोस्ट केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओची दखल केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी घेतली आहे.  

शिवराज सिंह चौहान यांनी केंद्रीय क्रीडामंत्र्यांना ट्विटरवर टॅग केले असून या तरुणाला योग्य संधी आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली होती. त्यानंतर खुद्द क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनाही या भारतीय धावपटूची भुरळ पडली. या तरुणाला कोणीतरी माझ्याकडे घेऊन या. देशाच्या अॅथलिट अॅकॅडमीमध्ये मी त्याची व्यवस्था करेन, असे प्रत्युत्तर रिजीजू यांनी चौहान यांच्या ट्विटला दिले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशचे क्रीडामंत्री जीतू पटवारी यांनीदेखील रामेश्वरला भोपाळमध्ये उत्तम प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. या उभरत्या धावपटूला योग्य सुविधा, दर्जेदार बूट आणि चांगले प्रशिक्षण मिळाले, तर तो 100 मीटर अंतर केवळ नऊ सेकंदांमध्ये पूर्ण करु शकतो, असा विश्वास पटवारी यांनी व्यक्त केला आहे.

रामेश्वर गुर्जरने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्याला आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. त्याच्या कुटुंबात आई-वडिल आणि पाच भावंडे असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर चालतो. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून नेटकऱ्यांनी त्याची तुलना जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्टशी केली आहे. हा भारताचा उसेन बोल्ट होऊ शकतो, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

या तरूण धावपटूला योग्य प्रशिक्षण द्यावे. तसेच रामेश्वरसारख्या अनेक खेळाडूंना संधी दिल्यास ते देशाचे नाव जागतिक स्तरावर नक्कीच उमटवू शकतील, अशी मागणी नेटकरी करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News