'चला परीक्षेला सामोरे जाऊ' एकदा वाचाच, तुमचा दृष्टीकोनच बदलेल... 

चंद्रशेखर निमट (सचीव, आधार फाउंडेशन, हिंगणघाट)
Friday, 21 February 2020

माझ्या विद्यार्थी मित्रांनो,
फेब्रुवारी ,मार्च, एप्रिल महिना आला की तुमच्या चेहऱ्यावरचा तणाव अगदी स्पष्टपणे दिसू लागतो, कारण समोर असतो तुमच्या परीक्षेचा हंगाम! जन्माला आल्यावर रडण्याची पहिली परीक्षा पास झाल्यानंतर परीक्षा देण्याची निरंतर साखळी तुमच्या समोर येते, ती शेवटपर्यंत थांबत नाही, हे पक्के ध्यानात ठेवा. म्हणून परीक्षा म्हणजे तुमचा शत्रू नव्हे तर मित्र अशी सकारात्मक मानसिकता आपल्याला अंगीकारावीच लागेल.

माझ्या विद्यार्थी मित्रांनो,
फेब्रुवारी ,मार्च, एप्रिल महिना आला की तुमच्या चेहऱ्यावरचा तणाव अगदी स्पष्टपणे दिसू लागतो, कारण समोर असतो तुमच्या परीक्षेचा हंगाम! जन्माला आल्यावर रडण्याची पहिली परीक्षा पास झाल्यानंतर परीक्षा देण्याची निरंतर साखळी तुमच्या समोर येते, ती शेवटपर्यंत थांबत नाही, हे पक्के ध्यानात ठेवा. म्हणून परीक्षा म्हणजे तुमचा शत्रू नव्हे तर मित्र अशी सकारात्मक मानसिकता आपल्याला अंगीकारावीच लागेल.

परीक्षा आली की आम्हाला तणाव येतो म्हणूनच परीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे. परिक्षा ही भविष्यातील आव्हानांना समोर जाण्याची शारीरिक व मानसिक तयारी करत असते म्हणून प्रत्येक परीक्षेचा तणाव हा भविष्यातील तणावांना तोंड देण्याची पूर्वतयारी या सकारात्मक मानसिकतेनेच आपल्याला परीक्षेला सामोरे जायला हवे.

परिक्षा दरवर्षीच होते परंतु दहावी-बारावीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पहिली ते नववी व अकरावी या परीक्षा आपल्याच लोकांसमोर द्यायच्या व त्यांनीच मूल्यमापन करायचे. परंतु दहावी-बारावीची परीक्षा म्हणजे तुम्ही प्राप्त केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक क्षमतांची कसोटी तिही त्रयस्त शिक्षण मंडळाद्वारे!

परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांचा मानसिक छळ नसून सत्राच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत प्राप्त व विकसित क्षमतांचे सातत्यपूर्ण सर्वांगीण मूल्यमापन होय व ही अविभाज्य प्रक्रिया आहे. त्यास तुम्हाला सामोरे जायचेच आहे, तेही संपूर्ण तयारी व ताकदीनिशी. म्हणून परीक्षा म्हणजे शिक्षा नव्हे तर स्वतः अंगिकारलेली दीक्षा होय.

ज्याचा अभ्यास पहिल्या दिवसापासून सुरु होतो व तो वाढत्या व चढत्या  अभ्यासक्रमाची सांगड घालत समोर समयबद्ध वेळापत्रकानुसार स्वीकारून कृतीबद्ध करतो, त्याला परीक्षेचा तणाव जाणवतसुद्धा नाही. 

मला सांगा एक आठवडाभर मी खूप कार्बोहाइड्रेट, प्रथिने, मिनरल्स, प्रोटीनयुक्त आहार घेतला की दुसऱ्याच आठवड्याला कुस्ती जिंकली असे होईल का?

नाही, मुळीच नाही! कोणतेही यश सहज नशिबाने मिळत नसते, त्याकरता कठोर परिश्रम, सातत्य, मार्गदर्शन, नवीन तंत्र शिकण्याची जिद्द व सोबत प्राप्त केलेल्या कौशल्याचे परिणाम व परिमाण योजना शिस्तबद्ध, नियमबद्ध व समयबद्धरित्या आखावी लागते व त्याने प्राप्त झालेली उत्तीर्णतेची टक्केवारी गुणवत्तेच्या दर्जासह अभ्यासून, आवश्यकतेनुसार आपल्या योजनांची पुनर्रचना करायची असते. हे जे सांगतो आहे, हे सहज शक्य आहे, गरज आहे ती आपल्या स्वप्नांसोबत प्रत्यक्ष जगण्याची!

लक्षात ठेवा ,जेव्हा आपण दृढतेने, निश्चयाने कोणतेही चांगलं कार्य करण्यास तत्पर होतो, त्यावेळेस या चराचरातील सर्व सकारात्मक ऊर्जा आपल्या पाठीशी उभी राहते व आपल्या इप्सित ध्येयापर्यंत नेण्यास प्रोत्साहित करते. त्यामुळे म्हणुया पुन्हा एकदा,' चला परीक्षा सामोरे'.

मित्रांनो, परीक्षेला सामोरे जाताना काही गोष्टींची काळजी घ्यावयास हवी. नव्हे, ती घेणे क्रमप्राप्तच आहे!
1)परीक्षेचा कोणताही ताण आपल्या मनावर न घेता ती एक सातत्यपूर्ण निरंतर असलेली शिक्षणाची प्रक्रिया आहे. त्यामुळे सकारात्मक राहा. आजपर्यंत तुम्ही अनेक परीक्षांना तोंड दिलेले आहे, त्यामुळे प्रत्येक परीक्षा ही नवी असली तरी नवल नाही.
2) परीक्षेच्या तोंडावर कोणतीही नवी गोष्ट, नवी योजना करू  नका. कोणत्याही नव्या योजना आखू नका.
3)  आपल्या अभ्यासाच्या वेळापत्रकात परीक्षेदरम्यान बदल हा होणारच परंतु त्याचे  योग्य नियोजन करणे किमान आवश्यक आहे.
4) लक्षात असू द्या, मेंदूला मिळणारा विश्राम नवीन ऊर्जेने, जोमाने कार्यास लागण्याचा मंत्र आहे. त्यामुळे पुरेसा आराम मेंदूवरील तणाव कमी करण्यासाठी लाभकारी असतो. त्यामूळे वेळीच झोपा व वेळीच उठा.
5) अभ्यासाची जागा, अभ्यासाची वेळ, अभ्यासाच्या पद्धतीत बदल करू नका, आपला दिनक्रम आहे त्याच पद्धतीने सुरळीतपणे सुरु ठेवा.
6)  साधेपणाने राहा ,सभोवतालचे वातावरण, घरातील, मित्रांमध्ये आनंदी, सकारात्मक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. माझा म्हणण्याचा अर्थ हाच, 'आपण बरे, आपले काम बरे', हे सूत्र पाळा.
7) अभ्यासातील त्याच त्या रटाळपणामुळे मेंदू लवकर थकतो. त्याच्याद्वारे नकारात्मक संकेत मिळू लागतात म्हणून शाळेच्या तासिका प्रमाणेच वेगवेगळ्या विषयांच्या अभ्यासाच्या वेळापत्रकाचा अवलंब करा. 45 मिनिटांच्या वर एका विषयाचा सलग अभ्यास करू नका. मध्ये-मध्ये ब्रेक घेत जा. एका विषयाचे पाठांतर, एका विषयाचे लेखन आणि एका विषययाचे उपयोजन या पद्धतीने काम करा.
8) पाच-दहा मिनिटांचा ब्रेकमध्ये चित्र काढणे. अवांतर  वाचन करणे, जोक्स वाचणे  किंवा ऐकवणे, कार्टून पाहणे किंवा ऐकणे, वरांड्यात, बगिच्यात फिरणे इत्यादी मन विश्रांतीची पद्धती स्विकारा.
10) या दरम्यान आपल्याला त्रास देणाऱ्या, चीड आणणार्‍या वस्तू, व्यक्ति व घटना टाळा. एकाग्रता वाढवण्यासाठी, मन-चित्त प्रसन्न करण्यासाठी आपले इष्ट देवतेचे, आराध्याचे स्मरण करा. नास्तिक असाल तर मन एकाग्र करण्याच्या वेगवेगळ्या क्रियांचा अवलंब करा. म्हणण्याचा अर्थ एकच, 'एकाग्र मन, कुशाग्र बुद्धी'.
11) परीक्षा दरम्यान साधी राहणी, साधा आहार व सकारात्मक विचार या त्रिसूत्रीचा अंगीकार करा. आपल्या आम्लपित्त (असिडीटी) वाढणार नाही याची दक्षता घ्या. वेळेवर सकस आहार घ्या.

मित्रांनो, परीक्षेच्या केंद्रावर जाताना खालील गोष्टींची दक्षता घ्या.

1) परीक्षेला जाताना आपल्या घरातील ज्येष्ठ वडीलधारी मंडळीचा आशीर्वाद घ्या. आपल्या इष्ट देवतेचे नामस्मरण करा ज्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते आहे, याची अनुभूती घ्या.
2) आपल्या प्रवेश पत्रातील प्रत्येक नोंदी काळजीपूर्वक तपासा. संपूर्ण माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्या. काही चूक आढळल्यास वर्गशिक्षक, मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून द्या.
3) प्रवेश पत्र सोबत घ्या तसेच त्याची झेरॉक्स प्रत आपल्या घरी ठेवा. बॅगमध्ये रायटिंग पॅड, पेन (फक्त काळा व निळाच), कंपास इत्यादी घेतल्याची खात्री करा. लाल व हिरव्या पेनचा अजिबात वापर करू नका. निळ्या किंवा काळ्या पेन यांचाच वापर उत्तरपत्रिका लिहिण्यास करा. इतर कोणत्याही रंगाची पेन वापरण्याची मनाई असते.
4) परीक्षेला अर्धा तास आगोदर परीक्षा केंद्रावर हजर व्हा. आपला आसन क्रमांक कोणत्या खोलीत आहे, हे निश्चित करा. नव्या परिक्षा पद्धतीनुसार उत्तरपत्रिका अर्धा तास आधी व प्रश्नपत्रिका नियोजित वेळेच्या दहामिनीट अधिक दिले जाते, याचे मुख्य कारण म्हणजे परीक्षार्थी परीक्षेच्या वातावरणात एकरुप होणे व ताणतणावातून मुक्त होणे होय. याचा परिपूर्ण फायदा घ्या.
5) उत्तरपत्रिकेवर अचूक आसन क्रमांक, सर्व आवश्यक बाबी विषय, दिनांक, लेखनाची भाषा, उत्तरपत्रिकेवर पर्यवेक्षकाची सही, स्वतःची सही इत्यादी पूर्ण केल्याची खात्री करा.
6) उत्तरपत्रिकेत काही लिहिलेले नाही, ती खराब झालेले नाही, आतले पान फाटलेले नाही, उत्तरपत्रिकेची शीलाई नीट आहे का? याची तपासणी करून घ्या, तसे आढळल्यास त्वरीत पर्यवेक्षकास कळवा.
7) शाई बदल झाल्यास तशी सूचना पर्यवेक्षकाला द्या, त्यांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा.
8) प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक पुर्ण लिहा.
9) उत्तरपत्रिका सजावटीस जास्त वेळ खर्च करू नका. आवश्यक तेवढेच अधोरेखन, चौकटी काढा त्यासाठी वेगळा पेन वापरू नका कारण ही  आपल्याला वर्षभर सवय झालेली असते.
10) उत्तर पत्रिकेत खोडतोड करू नका. उत्तर चुकले आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तरी न खोडता तोच प्रश्न नव्याने सोडवा.
11) मूळ उत्तर पत्रिका व घेतलेल्या पुरवण्यांची संख्या 1+1=2, 1+2=3 या पद्धतीने नोंद करा. होलॉक्राफ्ट लावा, पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेला घट्ट बांधली आहे व ती सुटणार नाही हे निश्चीत करा.
12) एक पूर्ण प्रश्न सोडवा. दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात वेगळ्या पानावर करा. प्रश्न क्रमांक 1 ते शेवटचा प्रश्न याप्रमाणे उत्तर लिहिण्याचा क्रम असू द्या.
13) परीक्षा म्हणजे  वेळचे सुयोग्य नियोजन! किती मिनिटामध्ये किती प्रश्न सोडवायचे आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक गुणाला किती मिनिटे द्यायची आहेत याचे गणित निश्चित करा. 
14) एखादा प्रश्न सोडवण्यात अडचण येत असेल तर त्याला अधिक वेळ खर्च करू नका, सर्वप्रथम आवश्यक प्रश्न सोडवण्याच्या प्रयत्न करा. अतिरिक्त प्रश्‍न, उपप्रश्‍न वेळ मिळाल्यास सोडवता येतील. त्यामुळे प्रथम लक्ष एकच, आवश्यक संपूर्ण प्रश्न सोडवणे.
15) चुकूनही आपल्या आपल्या जवळ संबंधित विषयासंबंधीची कोणत्याही प्रकारची गाईड, पुस्तक, मार्गदर्शक पुस्तिका तसेच कोणताही साधा चिटोरा आजूबाजूलाही नाही, हे निश्चित करा.
16) वर्गामध्ये कोणी तुम्हाला उत्तर दाखवण्याबद्दल त्रास देत असेल, तुमची एकाग्रता भंग करत असेल तर तशी विनंतीवजा तक्रार पर्यवेक्षकाजवळ करावी.
17) परिक्षा म्हणजे उत्सव जरी असला तरी फॅशन करू नका. तुम्हाला आवडणारे व नियमित कपडे घाला,
18) परीक्षा केंद्रावर  पोहचल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणीसोबत विषयाच्या तयारी त्याविषयी कोणतीही चर्चा करू नका. त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
19) परिक्षा झाल्यावर उत्तराविषयी अधिक चर्चा करू नका. 'झाले गेले गंगेला मिळाले', अशी क्षणिक भूमिका ठेवा. नको त्या बाबींवर चर्चा टाळा.
20) मनासारखा पेपर जरी सोडवता आला नसेल, तरी त्यावर अधिक विचार करू नका यापेक्षा पुढचा पेपर कसा चांगला सोडवता येईल, अशी सकारात्मक भूमिका ठेवा. किती प्रश्नावर किती गुण मिळतील, याची गोळाबेरीज करत राहू नका आपला वेळ घालवू नका. त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला बरीच सवड मिळणार आहे.
21) प्रत्येक विषयाची परीक्षा देऊन झाल्यावर त्या विषयाच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी किमान एक दोन तासांचा निवांत घ्या व पुढील तयारीला लागा.
22) परीक्षा मंडळे आजकाल विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करतात त्यामुळे प्रत्येक विषयाच्या तयारीला एक-दोन दिवसांचा अवकाश दिला जातो. त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा. आपली तयारी अधिक सूक्ष्म रीतीने करा.
23) या संपूर्ण कालावधीत दरम्यान शारीरिक व मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्या. भीती, काळजी, घाबरल्यासारखे होणे, धडधड वाढणे, भांमभावल्या सारखे होणे, या विषयी आपल्या पालकांशी मनमोकळेपणे चर्चा करा. आवश्यकता पडल्यास योग्य डॉक्टरांची समुपदेशन घ्या, सल्ला घ्या.

महत्त्वाची एकच गोष्ट लक्षात असू द्या, 'सर सलामत, तो परीक्षा पचास", म्हणून आपले सर्वस्व पणाला लागले असले तरी आपले डोके आपल्याला शाबूत ठेवायचे आहे. हेही तेवढेच खरे की, प्रत्येक परीक्षाही शेवटची नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे यापेक्षा पुढची परिक्षा अधिक सरस तयारीनिशी कशी देता येईल? हाच सकारात्मक विचाराचा अंगीकार करा.

सृष्टीतील सर्व सकारात्मक शक्ती आपल्या सोबत आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत. आम्हा सर्व गुरुजनांचा, पालकांचे  आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच.
शुभम भवतु, यशस्वी भव!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News