'या' खाऊगल्लीला तुम्ही भेट दिलीये का?

अदिती पराडकर-लोंढे
Wednesday, 13 March 2019

पूर्वी खाऊगल्ली म्हटली, की पटकन एसएनडीटी कॉलेजची खाऊगल्लीच डोळ्यांसमोर यायची. तितकी ती प्रसिद्ध होती. मात्र, आता या खाऊगल्ल्या गल्लोगल्ली झाल्या आहेत. असं असलं तरीही १०-१५ वर्षांपूर्वीच नरिमन पॉइंटची खाऊगल्लीदेखील अशीच उदयाला आली. आजूबाजूला असलेल्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांसाठी ही खाऊगल्ली ‘ऑफिशिअल’ ठरत आहे. 

नरिमन पॉइंटला खाऊगल्ली आहे असं म्हटलं तर तुम्हाला कित्येकांना आश्‍चर्यच वाटेल. कारण नरिमन पॉइंटचा परिसर आठवला, तर तिथे कोणती खाऊगल्ली आहे, असा प्रश्‍न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. कारण नरिमन पॉइंटच्या परिसरात मंत्रालय, योगक्षेम, एअर इंडिया, एक्‍स्प्रेस टॉवर, विधान भवन, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, युनियन बॅंक अशी विविध खासगी आणि सरकारी कार्यालये तिथे आहेत. याशिवाय तिथे छोटे छोटे मंत्र्यांचे बंगलेदेखील आहेत. म्हणूनच हा परिसर सकाळी ९-१० वाजल्यापासून ते संध्याकाळी अगदी ८-९ वाजेपर्यंत सदैव गजबजलेला दिसतो. अशा या गजबजलेल्या परिसरातच ही नरिमन पॉइंटची खाऊगल्ली वसलेली आहे. 

एअर इंडिया आणि एक्‍स्प्रेस टॉवरलगत असलेल्या विधान भवन मार्गावरच या खाऊगल्लीला सुरुवात होते. सुरुवातीला भेळ, पाणीपुरी आणि रगड्याचा ठेला लावलेला दिसतो. पहिलंच दुकान आहे ते प्रियांका फास्ट फूड. सॅंडवीच, पिझ्झा, पावभाजी आणि डोशाचं. साध्या व्हेज सॅंडवीचपासून ते चॉकलेट, वेफर, ग्रिल्ड, मसाला, चीझ, कॉर्न, व्हेजिटेबल असे सॅंडवीचचे विविध पर्याय मिळतात. पावभाजी मात्र केवळ सकाळच्या वेळेतच उपलब्ध आहे.

पावभाजीबरोबरच पावभाजी पुलाव किंवा तवा पुलाव आलाच. मात्र, दुपारच्या जेवणाची भूक भागवण्यासाठी हा पुलावाचा पर्याय ठेवला आहे. कारण तुम्ही संध्याकाळी गेलात तर मात्र तुम्हाला पुलाव मिळणार नाही. मात्र, इडली आणि डोशांची तर भरपूर व्हरायटी तिथे तुम्हाला मिळेल. म्हैसूर मसाला, साधा, मसाला असे नेहमीचे डोशाचे प्रकार तर आहेतच; पण इकडचा चायनीज डोसादेखील खूप प्रसिद्ध आहे. डोसा आणि चायनीज यांचं मिश्रण करून त्या डोशाची एक लाजवाब चव चाखायला मिळते. त्याचप्रमाणे इडली चिली किंवा इडली फ्राय. कोबी, सिमला मिरची, कांदा, गाजर, बीट आणि चायनीजचे विविध सॉस यांच्या मिश्रणात फ्राय केलेल्या इडलीची चव तुमच्या जिभेवर रेंगाळली नाही तरच नवल.

तुमचं ऑफिस तिथेच आहे किंवा तुम्ही फिरायला या परिसरात गेला असाल आणि तुम्ही दुपारच्या जेवणाचा विचार करत असाल तरीदेखील तुमच्याकडे विविध पर्याय आहेत. पुढे तुम्हाला मोठी दुकानं नाही; तरीदेखील लहान लहान भरपूर ठेले लावलेले दिसतील. यात तुमचा ‘जय महाराष्ट्र’ नावाचा समोसा पाव, वडा पाव, भजी पाव याचादेखील स्टॉल पाहायला मिळेल. फास्ट फूड खायचं नसेल तरीही तुमच्यासाठी अंडा भुर्जी, छोले भटुरे, बैदा राईस, पुलाव, पुरी भाजी आणि टरटरीत फुगलेला आलूचा पराठादेखील उपलब्ध आहे. गरमगरम तव्यावरचा गोल गरगरीत आणि फुगलेला पराठा पाहून तो खाण्याचा मोह होणार नाही, असा माणूसच विरळा! निवांत बसून खायचं असेल तर एक्‍स्प्रेस टॉवरच्या समोरच एक ‘आशीर्वाद’ नावाचं झुणका-भाकर केंद्रदेखील आहे. त्यामुळे तुमची जेवणाची इच्छादेखील पूर्ण होईल.  

केवळ चायनीज खायचं असेल तरीही तुमच्यासमोर विविध पर्याय आहेत. केवळ व्हेजच नाही तर नॉन व्हेज खवय्यांसाठीदेखील भरपूर पर्याय आहेत. चायनीज चिली, लॉलीपॉप, चिकन राईस, चिकन, आमलेट असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील.

दुपारच्या वेळेत चहाची तलफ आली असेल तर तुमच्यासाठी तोदेखील पर्याय आहे. इराणी हॉटेलसारखा चहा आणि बन मस्कादेखील तुम्हाला इथे मिळेल. 
या पदार्थांचा आस्वाद घेऊन थकला असाल तर उसाचा रस, थंडगार लस्सी आणि फ्रूट ज्युसचाही आस्वाद घेता येईल. बरं हे तुम्हाला खूपच जास्त खाल्ल्यासारखं वाटत असेल तर त्यासाठीही फ्रूट सलाडचाही पर्याय आहेच बरं का आणि यांची किंमतही अगदी खिशाला परवडेल अशीच आहे. अगदी २०-४० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत तुम्ही पोटभर जेवाल. जेवल्यानंतर मुखशुद्धी हवीच. त्यासाठी बडिशोप आणि चॉकलेटदेखील मिळतील.

१५ वर्षांपासून कार्यरत असलेला भोला सिंग म्हणतो, ‘या ठिकाणी आजूबाजूला असलेली मोठमोठी कार्यालये, बंगले आणि नरिमन पॉइंटला आलेल्या खवय्यांची या ठिकाणी सतत रीघ लागलेली असते. सकाळी १० वाजल्यापासून साडेनऊ-दहापर्यंत ही खाऊगल्ली सतत गजबजलेली असते.’

या गल्लीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गल्ली तुम्हाला कधीच बंद दिसणार नाही. रविवारी सुटीच्या दिवशीदेखील फिरायला येणाऱ्यांची पेटपूजा याच ठिकाणी होते. मग काय नरिमन पॉइंटला फिरायला गेलात की या खाऊगल्लीला एकदा आवर्जून भेट द्या.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News