चावंड किल्ल्याचा अदभूत इतिहास नक्की वाचाच

रसिका जाधव
Friday, 5 April 2019

चामुंडा अपभ्रंशे चावंड । जयावरी सप्तकुंड ।। गिरी ते खोदूनी अश्मखंड । प्रसन्नगडा मार्ग निर्मिला ।।


 

जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यापैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी. अंतरावर चावंड आहे. चावंड गावात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.

दरवाजातून आत जाताच, दहा पायऱ्या चढून वर गेल्यावर दोन वाटा लागतात. वरची उजवीकडची वाट उद्धवस्त अवशेषांकडे घेऊन जाते, तर डावीकडची वाट तटबंदीच्या दिशेने जाते. उजव्या बाजूस कातळात कोरलेल्या १५-२० पायऱ्या चढून गेल्यावर, काही वास्तू नजरेत येतात. एका वास्तूचा चौथरा अजून व्यवस्थित आहे. इथे आपल्याला आशा बऱ्याच वास्तू दिसतात. (जवळ-जवळ १५ ते २० वास्तूंचे अवषेश इथे आहेत) म्हणून असा निष्कर्ष काढता येईल की, इथे मोठी वस्ती असावी. 

आजूबाजूच्या परिसराचा मुलकी कारभार या गडावरून चालत असावा. जेथे चौथरा शिल्लक आहे, तेथेच मोठे गोल उखळ आहे. मात्र त्यास खालच्या बाजूला एक छिद्र आहे. बाजूलाच २ संलग्न अशी टाकी आहेत. येथून उत्तरेस थोडे पुढे गेले की, एक खचत चालेली वास्तू नजरेस पडते. हिच्या बांधकामावरून असे प्रतीत होते कि हे एक मंदिर असावे; पण बरीच खचल्यामुळे जास्त काही अंदाज बांधता येत नाही. येथून आजूबाजूला साधारण ३०० मीटरच्या परिसरात १०-१५ उद्धवस्त बांधकामे तशीच ७-८ टाकी आढळून येतात. गडाच्या वायव्य भागात एकमेकांना लागून सप्त मातृकांशी निगडित असलेल्या सात टाक्या आहेत. 

गडाच्या याच भागात बऱ्यापैकी तटबंदी असून, आग्नेय भाग कड्यांनी व्यापला आहे. ज्या भागात तटबंदी आहे, त्या भागात या तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे, ही बहूदा गस्त घालण्यासाठी असावी. या ठिकाणी बराच उतार असून काही ठिकाणी हौद आहेत. थोडे पुढे उजवीकडे गेल्यावर एका मंदिराचे अवशेष आढळतात. तिथेही बरेच शिल्पकाम आढळते. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे, त्याठिकाणी चिऱ्याचे दगड गडग्यासारखे रचून ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतील. ईशान्य भागात ज्या ठिकाणी तटबंदी संपते, त्या ठिकाणी कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकऱ्यांच्या चौक्या असाव्यात, असा देखील अंदाज आहे. एक गुहा अगदी सुस्थितीत आहे. गुहेत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला हौद सदृश साधारण ५ फूट खोलीचे बांधकाम आढळते. या गुहेलगत असलेल्या तटबंदीच्या खाली भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार आहे, असे ग्रामस्त सांगतात, येथे रॅपलिंग करून जाता येते.

यापुढे आपण गडाच्या पूर्वेस येतो. या भागात कोणतेही अवशेष नाहीत. बेलाग कड्यांनी हा भाग व्यापला असल्यामुळे इथे तटबंदी नाही. हा भाग बराच विस्त्रीर्ण असूनही निर्जन आणि ओसाड आहे. जवळ-जवळ अर्ध्या किलोमीटरच्या परिसरात एकही बांधकाम आढळत नाही. गडाच्या दक्षिण बाजूला आणि नैऋत्येस आपल्याला तुरळक अशी तटबंदी आढळते. इथेच पाण्याच्या दोन टाकी आहेत. दोन बुरुजही आढळतात इथून आपण टेकडी कडे निघतो, मंदिर पाहायला. 

         
गडाच्या सर्वात उंच भागात चांमूडा देवीचे मंदिर आहे. मंदिरातील मूर्ती प्राचीन असून बांधकाम मात्र नवीन आहे. आजूबाजूला जुन्या मंदिराचे अवशेष विखुरलेले दिसतात. एक तुटलेली मूर्ती आढळते, जी एखाद्या ऋषींचे प्रतीक असावी. तसेच एक आशर्यकारक गोष्ट म्हणजे या चांमूडा देवीच्या मंदिरासमोर आढळणारा नंदी. जुन्या अवशेषमध्येही नंदीची मूर्ती आढळते. याचा अर्थ हा होतो की, जवळच कुठेतरी शिवलिंग असावे आणि काळाच्या ओघात हरवले असावे. ग्रामस्थांनी श्रमदानाने जसे नवीन देऊळ बांधले तशी शेजारी असलेली दीपमाळ असे सुचवते की, इथे एक शिवमंदिर असावे.

एकंदरीत पाहता, गडाचा घेरा विस्तीर्ण आहे. साधारण ५-६ किमीचा परीघ असावा. गडाच्या ईशान्येस असणाऱ्या गुहांचा अभ्यास होणे महत्वाचे आहे. या वास्तूविषयी बऱ्याच दंतकथा प्रचलित आहेत. गडावर सातवाहन संस्कृतीचा प्रभाव आहे. या किल्ल्यांचा इंग्रजांनी पूर्ण नायनाट करण्याचा प्रयत्न केला, पण ते सफल झाले नाहीत. आज हेच किल्ले आपल्याला आवाहन करीत आहेत, त्यांना भेट द्यायला, आपण का जाऊ नये? इथल्या स्थानिक महादेव कोळ्यांकडून जसे आपण दंतकथा ऐकतो, तसे इतिहासही जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News