निसर्गाचे सानिध्य अनुभवणारे ट्रेकिंग वेड!

अजिता मल्लाडे
Tuesday, 30 April 2019

रात्रीच्या काळोखात येणारी पहाटेची चाहूल, वर लखलखणाऱ्या चांदण्यांनी भरगच्च असलेलं निरभ्र आकाश आणि सुखावणारी शांतता

 

एखाद्या गोष्टीचं वेड लागलं की मग ते वेड स्वस्थ बसू देत नाही. इको फ्रेंडली क्लबसोबत महाराष्ट्राचे सर्वोच्च कळसूबाई शिखर सर केल्यापासून ट्रेकिंगच्या वेडाची सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या महिन्यात सह्याद्री ट्रेकर्ससोबत हरिश्चंद्रगडाला जाण्याची संधी मी गमावली नाही. रात्रीच्या काळोखात येणारी पहाटेची चाहूल, वर लखलखणाऱ्या चांदण्यांनी भरगच्च असलेलं निरभ्र आकाश आणि सुखावणारी शांतता अशा वातावरणात आम्ही पाचनई गावात पोहोचलो.
 

गावातल्या घरात तासभर विश्रांतीनंतर सकाळी डोळे उघडले तर समोरच सह्याद्रीचा कातळ कडा. तो बघूनच उत्साह संचारला. घरासमोर शेणाने सारवलेलं अंगण, तुळशी वृंदावन, कोंबड्या आणि तिच्या पिल्लांची लगबग, कुत्र्याचं छोटंसं मागे मागे येणारं पिल्लू, परसात बकऱ्या आणि कोकरू. सिमेंटच्या जंगलात, प्रदूषणात हरवलेल्या माझ्यासारखीच्या मनात हे छोटेखानी पण सुंदर घर अगदी ठसलं आहे.

चहानाष्टा घेऊन चालायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा जणू कोणत्या तरी साहस मोहिमेवर चाललो आहोत असा सर्वांचा उत्साह होता. ‘How’s the josh?’ ‘High Sir!’ पठारावर पोहोचेपर्यंत मात्र या 'High Sir!’ ची intensity पार बदलली होती. एक आवड, छंद म्हणून मन म्हणेल तेव्हा स्वतःचे सामान स्वतःच्या पाठीवर घेऊन दमत भागत हौसेपोटी ट्रेकिंग करणारे आणि या 'हौशी ट्रेकर्स' ची सोय करून जगण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी डोंगरमाळ लीलया तुडवणारे (तेदेखील रोज आपल्यापेक्षा कैक पटीने अधिक जड सामान घेऊन जाणारे) गावकरी पाहिले की दोन वेगळ्या जीवनशैलीमधील तफावत प्रकर्षाने जाणवते.   
 

कडेकपारीतून जाणाऱ्या रस्त्याने, दरीच्या कडेने, 'थोडेच अंतर बाकी आहे' अशी खोटी समजूत काढत चालायचे, उंचावरून चालताना खाली पाहिले तर गरगरेल म्हणून दरीकडे न पाहता समोरची वाट तुडवत सरळ जात राहायचे. वर पुष्करणी, हरिश्चंद्रमंदिर पाहिलं. तिथे आधी चांगदेव महाराजांनी तपश्चर्या केली असं म्हणतात.

केदारेश्वराची गुहा पाहिली जिथे एका खांबावर ती तग धरून उभी आहे. सगळीकडे चालताना नजरेत खुपलेली गोष्ट म्हणजे सर्वत्र विखुरलेला कचरा. निसर्गाचे सानिध्य अनुभवण्यासाठी शहरातून लांबवर येऊन इथे कचरा टाकून निसर्गसौंदर्य मलीन करताना अशा लोकांचे मन धजावतेच कसे देव जाणे. हे बघून 'प्रत्येक सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असतोच असे नाही' हे अगदी तंतोतंत पटते. 

एकदाचे आम्ही जेव्हा तारामती शिखरावर पोहोचलो तेव्हाचे मानसिक समाधान वेगळेच होते. तिथे विचार येऊन गेला, 'माणूस स्वतःलाच हद्दीची बंधने लादून घेतो आणि स्वतःच ती पार करत सर्वोच्चतेची उंची गाठताना मानसिक समाधान मिळवतो.' शिखरावरून खाली बघताना किती लांबचा पल्ला आपण पार करून आलोय याची जाणीव झाली. सभोवतालचे नयनरम्य दृश्य डोळ्यात काही काळ साठवून घेतल्यावर आम्ही परतीचा रस्ता धरला. खाली उतरताना लोखंडी शिड्यांवरून उतरावे लागते. असं वाटतं फक्त उतरत आहोत तर आपली इतकी दमछाक होत आहे तर या शिड्या इथे किती प्रयत्नांती, अथक परिश्रमाने लावल्या असतील! 

खाली उतरून आम्ही कोकणकड्यावर पोहोचलो. दुपारी सर्वांनी चुलीवरच्या मस्त भाकरी पिठल्यावर मनसोक्त ताव मारला. दुपारच्या वामकुक्षीनंतर कोकणकड्यावर जाऊन बसलो तेव्हा दरीमध्ये सूर मारणाऱ्या खडपाकोळ्या आकाशात मुक्तपणे भिरभिरताना पाहून वेगळेच नेत्रसुख मिळाले.  नंतर संध्याकाळचा सूर्यास्त सह्याद्रीच्या साक्षीने कोकणकड्याच्या सानिध्यात चहाचा आस्वाद घेत पाहिला. 

सूर्यास्त माणसाला अंतर्मुख का करतो? 'आजचा अस्त हा उद्याच्या उदयासाठी आहे', या शाश्वत सत्याची जाणीव करून देतो, म्हणूनही असेल कदाचित! कोकणकड्याजवळून सभोवताल निरखताना, 'निसर्ग किती अफाट आहे आणि आपण किती यःकश्चित आहोत' याची जाणीव झाली. 

सूर्यास्तानंतर थंडी जाणवू लागली. मग 'टेंट' समोरच्या शेकोटीभोवती 'अंताक्षरी' झाल्याशिवाय 'कॅम्पिंग' पूर्ण कसं होईल?!  रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा सगळीकडे सामसूम झाली, तेव्हा आमच्या 'stargazing' ला सुरुवात झाली. आकाशात जिकडे नजर जाईल तिकडे ग्रह-तारे.... जणू संपूर्ण आकाशात हिरे विखुरले गेले आहेत. नजर हटतच नव्हती. मान जेव्हा अवघडली तेव्हा निमूटपणे खाली बघत टेंटकडे परतीची वाट धरावी लागली. 

रात्र टेंटमध्ये घालवल्यावर दुसरा दिवस सह्याद्रीच्या कुशीतील नवा सूर्योदय घेऊन आला. सकाळी गणपती गुफा पाहून खाली उतरलो आणि पुण्याकडे मार्गस्थ झालो. ट्रेक जरी संपला तरी जमवलेल्या आठवणी आणि अनुभव आयुष्याच्या शिदोरीसाठी मनाच्या कुपीत कायमचे साठवले गेले आहेत. 

(लेखिका स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये अधिकारी)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News