नुरी ते दुर्री...

संदीप काळे
Sunday, 18 August 2019

नुरी ते दुर्री... (संदीप काळे)
संदीप काळे sandip98868@gmail.com
 

एक जण मराठी बोलत होता आणि दोघं जण हिंदी बोलत होते. महिलेचं वय आणि त्या दोघांचं वय ३५ ते ४० च्या दरम्यान असावं. रस्त्यावर, फूटपाथवर भीक मागून खाणारी माणसं किती प्रांजळ आणि समाधान मनाची असू शकतात, याचे हे तिघे जण आदर्श होते. तिथलं वातावरण, त्यांचं बालपण, त्यांचं राहणं, त्यांच्या आयुष्यातला आतापर्यंतचा सगळा कालखंड यांच्याविषयी ते सांगत होते. त्यांनी मला ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्यातली एक सर्वांत धक्कादायक गोष्ट होती, ती म्हणजे हे तिघं जण नवरा-बायको होते. म्हणजे एक बायको आणि दोन नवरे.

एक जण मराठी बोलत होता आणि दोघं जण हिंदी बोलत होते. महिलेचं वय आणि त्या दोघांचं वय ३५ ते ४० च्या दरम्यान असावं. रस्त्यावर, फूटपाथवर भीक मागून खाणारी माणसं किती प्रांजळ आणि समाधान मनाची असू शकतात, याचे हे तिघे जण आदर्श होते. तिथलं वातावरण, त्यांचं बालपण, त्यांचं राहणं, त्यांच्या आयुष्यातला आतापर्यंतचा सगळा कालखंड यांच्याविषयी ते सांगत होते. त्यांनी मला ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्यातली एक सर्वांत धक्कादायक गोष्ट होती, ती म्हणजे हे तिघं जण नवरा-बायको होते. म्हणजे एक बायको आणि दोन नवरे. माझ्यासाठी हे धक्कादायकच होतं; पण बाजूला चिलीम ओढत बसलेले अंगावर कंबर झाकेल एवढंच कापड असलेले, एक साठ वर्षांचे गृहस्थ मला म्हणाले : ‘‘ये झूठ नही बोल रहे, ये सही है।’’

विमानतळावर खूप वेळ ताटकळत बसल्यावर घरी जायला टॅक्‍सी मिळाली. पावसामध्ये प्रत्येक जण आपण सुरक्षित राहिलं पाहिजे, यासाठी काळजी घेत होता- कारण गेल्या सहा-सात दिवसांपासून पावसाचं वातावरण मुंबईकरांना जगणं नकोसं करत होतं. शेवटी चाकरमानी बिचारे करणार तरी काय? रोजचं हातावरचं पोट! त्यांचं कामाचा गाडा ओढणं सुरूच होतं. गाडीत बॅग ठेवताना टॅक्‍सीवाल्यांनी मला तंबीच्या स्वरूपात बजावून सागितलं : ‘‘साहब, बीचमें रास्ता अगर बंद हो गया, तो आपको जहां छोडूंगा वहां उतरना पडेगा; क्‍योंकी सुबहसे ऐसा दोन-तीन बार हुआ है...’’ मला ‘हो’ म्हटल्याशिवाय पर्याय नव्हता- कारण गेल्या दीड तासापासून मी घरी जाण्यासाठी काहीतरी मिळेल, याची वाट पाहत बसलो होतो.

विमानतळाच्या बाहेरच्या रस्त्यावर पडल्यापडल्या, मुंग्यांसारखी ट्रॅफिकची लाईन समोर रस्त्यावर दिसत होती. पाच मिनिटं झाली तेव्हा लक्षात आलं, की आता काहीही केलं तरी आपण पुढं जाऊ शकत नाही. सांताक्रूझला मुख्य रस्त्यावर वाकोला ब्रिजच्या पलीकडच्या बाजूला रस्त्यावरच एक पोल पडला आहे आणि त्याला आता काढणं शक्‍य नाही...! कारण सगळीकडूनच वाहतूक ठप्प झाली. पोलला बाजूला सारणारं महापालिकेचं सामान घेऊन जाणारे लोक वाहनांच्या अतिगर्दीमुळे पोलपर्यंत पोचू शकत नव्हते. पावसाची रिपरिपही जोरात सुरू होती. मुख्य रस्त्यावरून कशीबशी टॅक्‍सीवाल्यानं एका छोट्या गल्लीमध्ये गाडी वळवली आणि सांगितलं : ‘‘साहब, आप यही पे उतर जाव।’’ मी म्हणालो : ‘‘अरे, थोडा वेळ थांब, ट्रॅफिक कमी झाल्यावर आपण जाऊ.’’ तो म्हणाला : ‘‘साहब, आपको मैं लिखके देता हूं, ये काम करनेके लिए कमसे कम चार-पांच घंटे तो जाएंगे...’’ तो आपल्या निर्णयावर ठाम होता. मी सामान घेतलं आणि गाडीच्या खाली उतरलो. तो पैसे न घेता निघून गेला. मला त्या छोट्या गल्लीत जाणं आणि तिकडून काही वाहन पकडणं शक्‍य नव्हतं, म्हणून मी मुख्य रस्त्यावर ट्रॅफिकची लाईन लागलेल्या एका बाजूला थांबलो. पुलावरून येणारी-जाणारी ट्रॅफिक आणि पुलाच्या खाली जिथं मी थांबलो तिथं येणारी-जाणारी ट्रॅफिक सगळीकडे वाहनंच वाहन होती. काहीतरी वाहन मिळेल या अपेक्षेनं मी पुलाच्या खाली कितीतरी वेळ वाट पाहत होतो; पण वाहन काही मिळेना. उभं राहून पाय दुखायला लागले. बसायला जागा नाही. अशा परिस्थितीमध्ये एका हातात बॅग आणि एका हातात मोबाईल अशी माझी अवस्था. त्याच क्षणी माझी नजर पुलाखाली पेटलेल्या एका चुलीकडे गेली. एक महिला त्या चुलीवर काहीतरी शिजवत होती. तसे त्या पुलाखाली अनेकांनी संसार थाटले होते; पण त्या सगळ्या संसारामध्ये या चुलीवर काहीतरी शिजत असलेल्या महिलेचा संसार अधिक नीटनेटका वाटत होता. मी पुन्हा एखादी गाडी येईल, या आशेनं रस्त्याकडे पाहत होतो; पण अर्धा तास झाला, वाहनं पुढे हलायचं चिन्ह दिसत नव्हतं. बाजूला ज्या महिलेनं जेवण शिजायला टाकलं होतं, ते आता शिजून तिनं एका प्लेटमध्ये थंड व्हायला ठेवलं होतं. ‘खिचडी’ त्याला म्हणताच येणार नाही, चटणी-मीठ टाकलेला साध्या तांदळाचा भात होता तो. अख्खं पातेलं एका प्लेटमध्ये ओतून ती महिला पाणी भरून घेत होती. अत्यंत मळकट असलेला कपडा तिनं बसायलाही टाकला. दोन माणसं त्या कपड्यावर बसली, एकाच ताटात तिघंही जेवायला लागली. त्यांच्या सगळ्या हालचालींकडं माझं बारकाईनं लक्ष होतं. मला जे-जे प्रश्न पडत होते, त्या सगळ्यांची उत्तरं त्यांच्या वागण्यातूनच मला मिळत होती.

दुपारचे दोन वाजले असावेत. आता मात्र पायांमधल्या मुंग्यांनी अक्षरश: वळवळ करायला सुरू केली. थोडं बाजूला गेलो आणि जिथं चूल पेटली होती, त्याच्या बाजूला असलेल्या दगडावर मी बसलो. ती दोन माणसं आणि जेवण शिजवणारी महिला या तिघांच्या गप्पांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. तसाही रस्त्यावर राहणारी माणसं, फूटपाथवर संसार थाटणारी माणसं यांच्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच वेळा चांगला नसतोच; पण हे तिघं जण माझ्यासाठी वेगळे होते. ते यासाठी, की त्यांच्यामध्ये असलेलं समाधान खळखळून वाहत होतं. त्यांचे कपडे कसेही असले, तरी त्यांच्या डोळ्यातली चमक काही औरच सांगून जात होती. दोन तास उलटून गेले; पण रस्त्यावरची ट्रॅफिक काही हालेना... त्यांच्या चाललेल्या चर्चा पाहून त्यांना काहीतरी बोलावं, या उद्देशानं मी तिकडे मान वळवली. मी म्हणालो : ‘‘भाई, ये ट्रॅफिक सुबहसेही ऐसा है क्‍या?’’ ते तिघंही माझ्याकडे बघत होते. रस्त्यावर चालणारा एक टॉपटिप माणूस आपल्याला ‘भाई’ म्हणू शकतो? असा प्रश्न त्यांच्या मनात आला असावा. त्या वेळेला त्यांच्यातला एक जण म्हणाला : ‘‘अहो, आजपासून नाही, गेले एक-दोन दिवस असंच सुरू आहे. तुम्हाला कुठं जायचंय?’’ मी म्हणालो : ‘‘नवी मुंबईला.’’ पहिल्यांदा बोललेला तो परत बोलला : ‘‘थोडा वेळ थांबा, होईल व्यवस्थित’’ आणि ते तिघे जण पुन्हा आपापसात बोलण्यात गुंग झाले. मी त्यांच्या जरा जवळ गेलो आणि ‘‘तुम्ही इथंच राहता का? रात्रीच्या वेळेला तुम्हाला त्रास होत नाही का?’’ असा प्रश्न विचारला. माझ्या बालिश प्रश्नालाही त्यांनी अत्यंत समाधानानं उत्तर दिलं.

एक जण मराठी बोलत होता आणि दोघं जण हिंदी बोलत होते. महिलेचं वय आणि त्या दोघांचं वय ३५ ते ४० च्या दरम्यान असावं. आता आमच्या चौघा जणांचं बोलण्यात चांगलं बॉंडिंग जमलं होतं. रस्त्यावर, फूटपाथवर भीक मागून खाणारी माणसं किती प्रांजळ आणि समाधान मनाची असू शकतात, याचे हे तिघे जण आदर्श होते. तिथलं वातावरण, त्यांचं बालपण, त्यांचं राहणं, त्यांच्या आयुष्यातला आतापर्यंतचा सगळा कालखंड ते त्यांच्या बोलण्यातून सांगत होते. मध्ये-मध्ये मलाही ते प्रश्न विचारत होते. त्यांनी मला ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खूप धक्कादायक होत्या आणि एक सर्वांत धक्कादायक गोष्ट होती, ती म्हणजे हे तिघं जण नवरा-बायको होते. म्हणजे एक बायको आणि दोन नवरे. माझ्यासाठी त्यांचं हे सांगणं जरा धक्कादायकच होतं. मी हसून ‘माझी गंमत करता काय,’ अशा आविर्भावानं त्यांच्याशी बोलत होतो; पण बाजूला चिलीम ओढत बसलेले, अंगावर कंबर झाकेल एवढंच कापड असलेले, एक साठ वर्षांचे गृहस्थ मला म्हणाले : ‘‘ये झूठ नही बोल रहे, ये सही है।’’ खूप दिवसांनंतर काही इंटरेस्टिंग ऐकायला मिळालं होतं; त्यामुळं त्यांचं हे सगळं नातं जोडलं कसं गेलं आणि ते टिकून कसं आहे, हे ऐकण्यात मला अधिक रस होता. थोडंसं बाजूला त्याच पुलाखाली पत्त्याचा डाव बसला होता. सहा वर्षांपासून ते साठ वर्षांपर्यंतचे सात-आठ जण पत्त्यांभोवती दुनिया विसरून बसले होते.

या महिलेचं एकेकाळचं नाव नुरी. तिच्यासोबत असणाऱ्या दोघांपैकी एकाचं नाव राजा आणि एकाचं नाव शौकत. नुरीचं नाव आता ‘दुर्री’ आहे; कारण ती दोघा जणांची आहे म्हणून..! दहा वर्षांपूर्वी नुरी आणि शौकत हे दोघं जण याच ठिकाणी दोघांच्या मनानं एकत्र येऊन गुण्यागोविंदानं राहायचे. एकदा शौकत काही कामानिमित्तानं बाहेर गेला आणि तो परत आलाच नाही. त्यानंतर नुरीला सांगितलं गेलं, की गॅसच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला आणि तिथं दहा माणसांचा मृत्यू झाला. त्यात शौकतही मरण पावला. ही गोष्ट नुरीसाठी धक्कादायक होती. जिथं ही घटना झाली तिथं नुरीनं चौकशी केली; पण मृत्यू पावलेल्या माणसांचा काहीही पत्ता स्फोट झालेल्या ठिकाणच्या लोकांनासुद्धा लागला नाही. त्या सर्व मृत माणसांच्या चिंधड्या चिंधड्या झालेली आणि जळालेली शरीरं पोत्यात भरून पोलिसांनी नेली. तपासणीनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. गॅसची जशी गाडी येईल तशी ती रिकामी करून द्यायची, त्यामुळं गॅसमालकाकडे त्या मृत्यू पावलेल्या माणसांची कुठलीही लिखित स्वरूपाची नोंद नव्हती. नुरीनं अनेक वर्षं शौकतच्या आठवणीमध्ये काढली. ज्या वाकोला ब्रिजखाली शौकत आणि नुरी राहायचे, त्याच ब्रिजखाली शौकतचा मित्र राजाही राहायचा. एका पायानं अपंग असलेला राजा दिवसभर याच परिसरात भीक मागायचा आणि रात्री पुलाखाली येऊन आसरा घ्यायचा. हे तिघांनाही आपले आई-वडील कोण आहेत, आपल्याला जन्म कोणी दिला, याचा काहीही पत्ता नव्हता. शौकतच्या पश्‍चात राजा आणि नुरी दोघं जवळ आले. वर्षभरानंतर ते एकत्रित राहू लागले. त्यांच्या मनानं एकमेकांना कधीच स्वीकारलं होतं. वर्षभरानंतर नुरीला दिवसही गेले; पण तिच्या अशक्तपणामुळं तिचं जन्माला आलेलं बाळ मेलेल्या अवस्थेत होतं. यानंतर ती आई झाली, तर तिच्या जीवाला धोका आहे, असं महापालिकेच्या डॉक्‍टरांकडून सांगण्यात आलं होतं. त्या घटनेतून सावरून हे दोघंही गुण्यागोविंदानं भीक मागून आपले दिवस काढत होते. तीन वर्षांनंतर अचानकपणे शौकत आला. नुरी आणि शौकत एकमेकांना पाहून खूप रडत होते. तो प्रसंग नुरी मला सांगत असताना मलाही अश्रू आवरत नव्हते. राजाच्या मनात एकीकडं आपला मित्र आल्यावर आनंद होता; तर दुसरीकडं नुरी आपल्यापासून दूर जाणार याची भीतीही होती. ऋषी कपूर, शाहरूख खान आणि दिव्या भारती यांच्या ‘दिवाना’ या चित्रपटाची अख्खी कहाणी माझ्या डोळ्यांसमोर सरकत होती... पण तो सिनेमा होता आणि ही हकिकत होती. शौकत नेमका गेला कुठं, याची सगळी हकिकत शौकतनं सांगितली. राजस्थानमधला एक कॉंट्रॅक्‍टर ‘खूप पैसे देतो,’ असं सांगून त्याला घेऊन गेला. तिथं त्याची खूप पिळवणूक झाली. त्याला अक्षरश: नजरकैदेत ठेवलं. त्याला मारहाण झाली. कशीबशी तिथून आपली सुटका करून घेऊन तो आपल्या नुरीकडं आला होता. शौकतच्या पश्‍चात जे काही घडलं, ते या दोघांनी शौकतला सांगितलं. चार दिवस तिघांचा एकत्रित सहवास जरा अबोला धरून होता. पाचव्या दिवशी तिघांनीही ठरवलं, की आपण तिघंही सोबत राहायचं. या सगळ्या घटनेला आता खूप महिने उलटले. या तिघांचं आयुष्य खूप सुखात चाललंय. ना वाद, ना तंटा, ना कसलं टेन्शन, ना घराचा हप्ता भरायचा, ना कारच्या लोनचे हप्ते भरायचे आहेत. रोज काहीतरी वेगळं करायचं आणि एकमेकांना आनंद द्यायचा, हाच त्यांच्या आयुष्याचा अजेंडा...! पाच पांडव आणि त्यांची एक पत्नी पांचाली यांच्याप्रमाणं या तिघांचेही काही नियम ठरले आहेत, ज्या नियमांचं ते काटेकोरपणे पालन करतात. इतका समजूतदारपणा प्रत्येक माणसात असता, तर आपल्याकडं होणाऱ्या माणसा-माणसांतल्या होणाऱ्या रोजच्या हिंसा कधी झाल्याच नसत्या. या तिघांचीच नाही, तर तिघांच्या आसपास असणाऱ्या फूटपाथवर राहणाऱ्या त्या प्रत्येक माणसाची दुनिया वेगळी होती. पत्ते खेळणाऱ्या ‘एक्का, दुर्री, तिर्री’ असं म्हणणाऱ्या एका आजोबांनी ‘‘तू दोघांची आहेस, तर तुझं नाव ‘दुर्री’ ठेवू,’’ असं म्हणून ‘नुरी’ऐवजी ‘दुर्री’ असं तिचं नामकरण केलं. या तिघांच्या प्रेमाविषयी माझ्याभोवताली जमलेले अनेक जण मला कौतुकानं सांगत होते. तिघांमध्ये केवढं अफाट प्रेम होतं.

ट्रॅफिक केव्हाच सुरळीत झालं होतं; पण मी त्या तिघांमध्ये इमोशनली अडकून पडलो होतो. शेवटी त्यांचा निरोप घेतला आणि नवी मुंबईकडे जाणाऱ्या एका गाडीत बसलो. मनात खूप प्रश्न होते. त्या तिघांना जेव्हा मी परतपरत आठवत होतो, तेव्हा त्या सगळ्या प्रश्नांना अपोआपच उत्तरं मिळत होती. आपण जीवन जगतो कसं, यापेक्षा ते किती समाधानानं आणि समजूतदारपणे जगतो याला खरंच खूप महत्त्व आहे, हे ‘नुरी’ ते ‘दुर्री’चा सगळा प्रवास अनुभवताना माझ्या लक्षात येत होतं. आपल्या माणुसकीचं दर्शन घडवत अशा अनेक नुरी-दुर्री बनतात. आपल्या वेगळेपणाचा ठसा ठेवून या समाजात वावरत असतात. अशा सगळ्या ‘नुरी’ आणि त्यांच्या ‘दुर्री’पणाला सलामच..! कुठल्याही इतिहासाची पानं न होताही आपला एक इतिहास असणारी ही माणसं एक मातब्बर तत्त्वज्ञान घेऊन जगतात. या माणसांची आयुष्यं रुढ अर्थानं समृद्ध नसतीलही; पण आपल्यासारख्यांचं जगणं मात्र ती वेगळ्या अर्थानं समृद्ध करून जातात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News