महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी तयार करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेतील तरुणाई करीत आहे

प्रा. संजय ठिगळे
Sunday, 4 October 2020

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे महाविद्यालयीन तरूणाईला चार भिंतीपलिकडचे शिक्षण देणारी आणि परीक्षेतील गुणांपेक्षा गुणवतेला महत्व देणारी योजना

ओळख एनएसएसचीः प्रा. संजय ठिगळे, माजी कार्यक्रम समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेडी तयार करण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजनेतील तरुणाई करीत आहे

राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून एक नवा दृष्टिकोन असणारी तरुणाई तयार होत आहे.खऱ्या अर्थाने महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील खेडी तयार करण्याचे महत्वपूर्ण कार्य राष्ट्रीय सेवा योजनेतील तरुणाई करीत आहे. तरुणाईच्या बळावरच आम्ही महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आहोत.

राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे महाविद्यालयीन तरूणाईला चार भिंतीपलिकडचे शिक्षण देणारी आणि परीक्षेतील गुणांपेक्षा गुणवतेला महत्व देणारी योजना. तरुणाईला स्वावलंबी बनवते, त्यांच्यात राष्ट्रप्रेम जागृत करते. त्याबरोबरच व्यवहार ज्ञान शिकवते. तरुणाईमध्ये समाजभान निर्माण करते. महाविद्यालयीन तरुणाई एक आठवडा दत्तक खेड्यात राहते. खेड्याचा अभ्यास करते. गावाशी समरस होऊन ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण यासारखी अनेक विकासाभिमुख कार्ये करते.तरुणाई खेड्यात फक्त काम करीत नाहीतर आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाचे उतराई होण्याचा प्रयत्न करते असे म्हटले तर फारसे वावगे होणार नाही.

आजचे जग हे बलवान माणसांचे जग आहे. असे जरी असले तरी सर्व बळात आत्मबळ महत्वाचे असते. महात्मा गांधी यांच्याकडे आत्मबळ होते. हे आत्मबळ तरुणाईत आणण्याचे काम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजना ही एक चळवळ आहे. 'जो वळवळ करतो, तोच चळवळ करतो'.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विकासाभिमुख चळवळीशी माझा विद्यार्थी दशेपासून जवळचा संबंध आला याचा मला सार्थ अभिमान वाटतो. तरुणाईत श्रम संस्कार रुजवणारी आणि ग्रामीण विकासाचे शिक्षण देणारी राष्ट्रीय सेवा योजना नव्याने अधीक बळकट करण्याची नितांत गरज आहे.

अलीकडच्या काळात वाढत चाललेला जातीयवाद व विषमता आणि अंधश्रद्धा विचारात घेतली तर जातीपातीच्या भिंती तोडून, लोकांना विज्ञानवादी बनविण्याचे कार्य तरुणाईला करावे लागेल. त्याच बरोबर स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांना व्यसनमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. चंगळवादात अडकलेल्या आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या तरुणाईकडे पाहिल्यानंतर असे वाटते की, महाविद्यालयीन युवकांना विज्ञानवाद, राष्ट्रीय एकात्मता, समानता ,राष्ट्रप्रेम व राष्ट्र भक्तीचे धडे द्यावे लागतील त्याशिवाय खऱ्या अर्थाने देशाचा सर्वांगीण विकास होणार नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News