आता श्रीमंत रायगडास 'या'ची गरज; हवा विकास, पण कसा ? एकदा वाचाच...

अनिल पाटील
Thursday, 6 June 2019

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, द्रुतगती महामार्ग, नैना, स्मार्ट सिटी अशा मोठ्या प्रकल्पांमुळे रायगड जिल्हा प्रगतीच्या दिशेने झेप घेतो आहे. विविध पर्यटनस्थळे आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे यामुळे जिल्हा अग्रेसर आहेच; मात्र काळानुरूप बदलणाऱ्या रायगड जिल्ह्याचा नैसर्गिक ढाचा कायम ठेवत विकास व्हावा. विकासाच्या जोडीला पायाभूत सुविधांकडे 

प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, द्रुतगती महामार्ग, नैना, स्मार्ट सिटी अशा मोठ्या प्रकल्पांमुळे रायगड जिल्हा प्रगतीच्या दिशेने झेप घेतो आहे. विविध पर्यटनस्थळे आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे यामुळे जिल्हा अग्रेसर आहेच; मात्र काळानुरूप बदलणाऱ्या रायगड जिल्ह्याचा नैसर्गिक ढाचा कायम ठेवत विकास व्हावा. विकासाच्या जोडीला पायाभूत सुविधांकडे 

मात्र दुर्लक्ष होऊ नये, हीच अपेक्षा आहे.
मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला, सर्वच बाबतीत अभिमान वाटावा असा इतिहास, थोर राजकीय नेते, साहित्यिक, विचारवंत, कला-क्रीडामध्ये अग्रेसर, गड-किल्ले, विस्तीर्ण समुद्रकिनारे, दोन अष्टविनायक क्षेत्रे, माथेरान, कर्नाळा पर्यटन क्षेत्र, देशातील मोठे औद्योगिक क्षेत्र, नव्याने निर्मिती झालेले शैक्षणिक हब अशा सर्वच पातळीवर रायगड जिल्हा समृद्ध आहे. अशा पारंपरिक श्रीमंतीचे देणे मिळालेला हा जिल्हा द्रुतगती महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग रुंदी व विस्तारीकरण, नवीन होऊ घातलेले पनवेल येथील विमानतळ, नैना, स्मार्ट सिटी व महामुंबई प्रकल्पांच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात अधिक विकसित होणार आहे. नवीन प्रकल्प आले म्हणजे नागरीकरणही तेवढेच वाढणार आहे. त्यात सर्व प्रांतांमधून मोठ्या संख्येने नागरिक रायगडमधील विविध शहरांत, गावांत कायमचे रहिवासी बनणार आहेत. यातून विविध संस्कृतीचे रायगडच्या आपल्या पारंपरिक संस्कृतीत सरमिसळ होण्याचा वेग वाढणार आहे. वरवर या सर्व बाबी चांगल्या वाटत असल्या तरी बदलांमुळे काही गंभीर व वाईट परिणामही आगामी काळात रायगडला सोसावे लागणार आहेत. विकास करताना तो सर्वांंगीण व्हावा आणि त्यात पारंपरिक गोष्टींचेही जतन होणे गरजेचे आहे. नवीन प्रकल्पांचे स्वागत होणारच, पण स्थानिकांनाही विश्‍वासात घेणे काळाची गरज आहे.

योजना राबवताना गांभीर्य हवे
बदलांच्या तीव्र गतीवर स्वार असलेल्या जिल्ह्यात एका बाजूला विविध पातळीवर विकास होत असताना त्याला पूरक व महत्त्वाच्या असलेल्या रस्ते, पाणी, रोजगार, आरोग्य, शिक्षण सुविधा, कायदा सुव्यवस्था याबाबत मात्र रायगड मागे राहतो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. विस्तीर्ण विमानतळ, मोठ-मोठी हॉटेल, मॉल, भव्य रहिवासी संकुले निर्माण होतील हा आनंद असला तरी येथील मूळ नागरिकांना यातून काय मिळणार, हा प्रश्‍न आहे. त्याला रोजगार, उद्योग उपलब्ध होणार नसले तर हे उपक्रम रायगडची प्रगती ठरण्याऐवजी भविष्यात येथील मूळ माणसाची अधोगती तर बनणार नाहीत ना, याची काळजी आताच सर्व राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी व योजना लागू करणाऱ्या सर्व यंत्रणांनाही घ्यावी लागणार आहे.

बदलांचे स्वागत, पण...
मागील १५-२० वर्षांपूर्वीचा रायगड जिल्हा व त्यातील गावे, शहरे आणि आताची स्थिती यात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. या बदलांचे स्वागत आहे. नव्याने येत असलेल्या विकास प्रकल्प व योजनांनी आगामी काळात यात झपाट्याने वाढ  होणार आहे; मात्र हे बदल होत असताना उत्तम पायाभूत सुविधा निर्माण होऊन त्याचा लाभ येथील मूळ रहिवाशांना व्हावा ही खरी गरज आहे.

भूमिपुत्रांना विश्‍वासात घ्यावे
नागरिकांनी सकारात्मक व विकासात्मक बदलांना सामोरे जाण्याची तयारी केली आहे; मात्र विकास प्रकल्पासाठी प्रशासकीय यंत्रणेने स्थानिकांना विश्‍वासात घ्यावे. त्यांना अपेक्षित मोबदला द्यावा. प्रकल्पाचा कोणताही लाभ येथील मूळ रहिवासींना मिळणार नसल्यास प्रकल्पांना विरोध करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, याचीही दखल घेण्याची गरज आहे.

मूळ संस्कृती जपण्याची गरज
विकास प्रकल्पांमुळे आगामी काळात रायगड जिल्ह्यात झपाट्याने बदल होणार आहेत. कोणत्याही चांगल्या बदलाचे स्वागत व्हावे ही आपली परंपरा आहे; मात्र हे स्वागत करीत असताना येथील मूळ नागरिक त्यांचे हक्क, पारंपरिक संस्कृती, परंपरा, येथील सांस्कृतिक वातावरण याला धक्का न लावता हे विकास प्रकल्प आले, रुजले तर त्यांचे स्वागत होणार आहे. असे न झाल्यास रायगडमध्ये स्थानिकांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News