शहरात भव्यदिव्य नाटकासाठी रंगमंचच नाही..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 May 2019
  • मराठी रंगभूमीवरील पहिलीच भव्य निर्मिती असलेले ‘हॅम्लेट’ हे नाटक प्रथमच औरंगाबादच्या रसिकांसमोर येत आहे

 

औरंगाबाद -  मराठी रंगभूमीवरील पहिलीच भव्य निर्मिती असलेले ‘हॅम्लेट’ हे नाटक प्रथमच औरंगाबादच्या रसिकांसमोर येत आहे. मात्र येथील दुर्दैव असे, की मराठी रंगभूमीवरील या वर्षातील प्रमुख आकर्षण ठरलेल्या ‘हॅम्लेट’च्या देखण्या नाट्यप्रयोगाला शहरात सुसज्ज नाट्यगृहच उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे या नाटकाचे प्रयोग आता शहरापासून लांब विद्यापीठाच्या नाट्यगृहात सादर करण्याची वेळ आली आहे.

जागतिक कीर्तीचे नाटककार विल्यम शेक्‍सपिअर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘जिगीषा-अष्टविनायक’ या संस्थेची व्यावसायिक रंगभूमीवरील महत्त्वाकांक्षी निर्मिती असलेले ‘हॅम्लेट’ हे सर्वश्रेष्ठ नाटक शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सादर केले जाणार आहे. प्रख्यात नाट्य-चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी नेपथ्य, ध्वनी, प्रकाश, संगीत, वेशभूषेतून तंतोतंत उभ्या केलेल्या ‘हॅम्लेट’ला राज्यभर सर्व समीक्षक, रसिकांनी डोक्‍यावर घेतले आहे. महाराष्ट्रभरात ८५ प्रयोग झाल्यानंतर आता ते औरंगाबादच्या रसिकांसमोर येत आहे.

नाना जोग यांच्या मूळ मराठी संहितेचे रूपांतर आणि प्रशांत दळवी, अनिल देशमुख यांची रंगावृत्ती असलेल्या संहितेची तांत्रिक बाजू प्रदीप मुळ्ये, राहुल रानडे या तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. तुषार दळवी, मुग्धा गोडबोले, सुनील तावडे, मनवा नाईक, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, रणजित जोग, ओंकार कुलकर्णी, कुणाल वाईकर, आनंद पाटील, ओंकार गोखले, नितीन भजन, सौरभ काळे, तुषार खेडेकर, मयूर निकम आणि ‘हॅम्लेट’च्या भूमिकेत सुमित राघवन यांच्या अभिनयाने सजलेल्या या नाटकात प्रत्यक्ष रंगमंचावर २२ कलावंत आणि विंगेत साहाय्य करणारे ३५ जण असा  मोठा संच आहे.

या नाटकाचा रसिकांनी आवर्जून अनुभव घ्यावा, असे आवाहन निर्माते दिलीप जाधव, श्रीपाद पद्माकर यांनी केले आहे. आपण काही धडा घेणार का? ‘प्रत्येक चांगल्या, दर्जेदार गोष्टीला अनास्था आणि उदासीनतेची वागणूक देणाऱ्यांचे शहर’ अशी औरंगाबादची राज्यभर ओळख होऊ लागली आहे. प्रशांत दामले, सुमित राघवन, सुयश टिळक अशा कलाकारांनी वारंवार येथील नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्‍न चव्हाट्यावर आणल्यानंतर संत एकनाथ रंगमंदिराची दुरुस्ती सुरू झाली.

मात्र, भव्य अशा संत तुकाराम नाट्यगृहाचेही तेच हाल झाले आहेत. चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्दर्शकाला त्यांच्याच भूमीत रंगमंच मिळण्यासाठी धडपडावे लागत आहे. यातून आपण काही धडा शिकणार आहोत का, हा प्रश्‍न नाट्यक्षेत्रातून विचारला जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News