भिवंडीला एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. आमच्या मराठवाडा मित्रमंडळातले पदाधिकारी प्रा. राम भिसे यांनी एक कार्यक्रम आयोजिला होता. मुंबई आणि परिसरात काम करणारे मराठवाड्यातले सगळे शिक्षक आणि प्राध्यापक या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित जमले होते. काम करत असताना आलेले अनुभव, किस्से या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रत्येकानं शेअर केले. त्यांच्या कामाच्या ठिकाणचं वातावरण यानिमित्तानं डोळ्यांसमोर येत होतं. शिक्षक आणि प्राध्यापक यांचं प्रचंड शोषण या भागातले संस्थाचालक करत असल्याचंही अनेकांच्या बोलण्यातून जाणवलं. हा शोषणाचा प्रकार केवळ ग्रामीण महाराष्ट्रातच चालतो असं मला वाटलं होतं; पण मुंबईतही असे खूप प्रकार आहेत हे ऐकून मी चक्रावलो.
भिवंडीतल्या एका शाळेतले शिक्षक संतोष पवार यांनी त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले : ‘‘मुलांना शिकवण्याबद्दलची माझी मानसिकता जवळजवळ संपून गेली होती. कारण, मुलांना शिकण्यात आणि आम्हाला त्यांना शिकवण्यात रुचीच वाटत नव्हती, असं मला जाणवत होतं. मग शाळेत जायचं आणि सरकारी काम आटोपून घरी यायचं एवढाच काय तो दिनक्रम असायचा. त्यात दोन वर्षं गेली. या दोन वर्षांत काहीतरी चांगलं काम घडावं असं काही झालेलं नाही. एके दिवशी आमच्या शाळेत शिल्पा खेर नावाच्या बाई आल्या.
‘मुलांची शिक्षणात रुची वाढावी आणि शिक्षकालाही शिकवण्यात आवड, रुची निर्माण व्हावी यासाठी मी वेगळं काम करते,’ असं त्या बाईंनी सांगितलं. ठरल्यानुसार आम्ही त्यांचा कार्यक्रम शाळेत ठेवला. त्यांनी आपल्या तासाच्या सेशनमध्ये मुलांची मनं जिंकली. मुलं केवळ खुललीच नाहीत, तर बोललीसुद्धा. जी लाजरी-बुजरी होती त्यांनीही प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हात वर केले. शिल्पाबाईंची शिकवण्याची शैली पाहून आम्ही सगळे शिक्षक अवाक् झालो.
या बाई ही किमया करू शकतात, तर आम्ही का करू शकणार नाही, असा प्रश्न माझ्यासह सगळ्यांना पडला. शिक्षणाच्या माध्यमातून काहीतरी घ्यावं, काहीतरी नवीन करावं हा उत्साह त्या दिवसापासून ते आजपर्यंत सगळ्या मुलांमध्ये आणि सगळ्या शिक्षकांमध्ये कायम आहे. आज त्या घटनेला दोन वर्षं होऊन गेली. ही आमची एकच शाळा नाही तर मुंबईतल्या अशा असंख्य शाळांवर शिल्पाबाईंनी जादूची कांडी फिरवली आहे.’’
या शिल्पा खेर कोण, समाज घडवण्याचं काम त्या कुठल्या ऊर्मीतून करत आहेत, कुठून आली त्यांना ही ऊर्जा, हे व्रत त्यांनी का स्वीकारलं असेल असे अनेक प्रश्न माझ्या मनात घर करून बसले. कार्यक्रम संपल्यावर आम्ही पवारांच्या शाळेत गेलो. भिवंडीतल्या मुस्लिम वस्तीतली ती शाळा. अत्यंत मागासलेली; पण अतिशय शिस्तबद्ध.
शिल्पाबाईंनी ‘रोजनिशी’च्या माध्यमातून घालून दिलेली चौकट मुलांनी आनंदानं आत्मसात केली होती. या शाळेनंतर मी ‘शिवाई’, ‘केणी’, ‘ज्ञानवर्धिनी, ‘चारकोप’, ‘सुधागड एज्युकेशन’ अशा अनेक शाळांमध्ये पवार यांच्यासोबत गेलो. तिथल्या शाळांची पाहणी केली. सगळ्या गोरगरीब मुलांच्या शाळा या संस्कारित परिपाठामुळे आज ‘मुलांच्या आवडत्या शाळा’ म्हणून प्रसिद्ध आहेत. खूप नावलौकिक मिळवलाय या शाळांनी.
संस्था आणि सरकारी धोरण यांच्यापलीकडं जाऊन शाळेला एक वेगळ्या संस्कारांच्या ‘छडी’ची गरज असते. ही ‘छडी’ शिल्पाबाईंच्या ‘भाग्यश्री फाउंडेशन’नं वापरल्याचं पाहायला मिळालं.
पवार यांच्या शाळेतल्या प्रमोद सातपुते या सातवीतल्या विद्यार्थ्यानं मला सेवा दलाची गाणी म्हणून दाखवली. महात्मा गांधी कसे आहेत, हेही त्यानं मला त्याच्या स्टाईलमध्ये समजावून सांगितलं. ‘खेरबाईंच्या रोजनिशीच्या उपक्रमातून मला हे सगळं जमलं,’ असं प्रमोद म्हणाला.
हा उपक्रम शिल्पाबाईंनी ज्या ज्या शाळांमध्ये सुरू केला, त्या त्या शाळांमधल्या मुलांचा आत्मविश्वास खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं मला जाणवलं. मला अनेक प्रश्नांची उत्तरं हवी होती आणि शिल्पाबाईंकडूनच ती मिळणार होती. त्यांचा पत्ता, फोन नंबर पवार यांच्याकडून घेतला.
एके दिवशी वेळ काढून त्यांच्या ठाणे इथल्या घरी जाण्यासाठी मी निघालो. माझा मुलगा अथर्व याला ठाण्याला एका दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन जायचं होतं. ती तपासणी झाल्यावर शिल्पाबाईंचं घर शोधलं. त्यांच्या घरी आमच्या भरपूर गप्पा झाल्या.
शिल्पाबाई अत्यंत श्रीमंत घरच्या. आपल्या गावातलं आणि परिसरातलं शिक्षणातलं दारिद्य्र त्यांनी जवळून पाहिलं होतं. या दारिद्य्रामुळे पिढ्याच्या पिढ्या बरबाद झाल्या; त्यामुळे हे दारिद्य्र पुढं वाढू नये यासाठी पावलं उचलणारी यंत्रणा आपल्याकडं कुठंच नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी विवाहानंतर दोन वर्षांनी ‘भाग्यश्री फाउंडेशन’ नावाचा ग्रुप स्थापन केला. त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी मुंबईसह आसपासच्या शहरांमधल्या अनेक शाळांमध्ये ‘रोजनिशी’ हा उपक्रम राबवला. या रोजनिशीच्या माध्यमातून त्यांनी दिलेले संस्कारांचे धडे मी भेटी दिलेल्या अनेक शाळांमध्ये अनुभवले. खेर यांच्या फाउंडेशनमध्ये जे २० लोक काम करतात त्यांचा खर्च उचलण्यापासून ते ज्या ज्या शाळांमध्ये हे उपक्रम चालतात त्या त्या सगळ्या शाळांमध्ये साहित्यवाटप, पुस्तकवाटप करण्यासाठी लागणारा खर्च, हे सगळं करण्यासाठी शिल्पाबाईंनी मोठी आर्थिक झळ सोसली.
आपण का शिकायचं, याचा अर्थ शिल्पाबाईंच्या या उपक्रमाद्वारे कितीतरी हजार मुलांना स्पष्टपणे कळला आहे. एका शाळेत जायचं, त्या शाळेला शेड्युल द्यायचं, त्यानंतर दुसरी शाळा आणि मग पुन्हा काही दिवसांनी परत आधीच्या शाळेत होत असलेल्या कामाचा आढावा, असं करत करत संपूर्ण मुंबई आणि परिसरातल्या ४०० हून अधिक शाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. आपण का शिकायचं, शिकण्याचा अर्थ काय आणि शिक्षणातून काय आत्मसात करायचं असा रोजनिशीचा उपक्रम थोडक्यात सांगता येईल. तशी रोजनिशीची नियमावली लांबलचकच. एकूण काय तर, जी मुलं अत्यंत ‘ढ’ होती, ‘ढकलपास’ म्हणून पुढच्या वर्गात जात होती, ‘नापास’ हा शिक्का ज्यांच्यावर बसलेला होता अशा सगळ्या नापासांची बाई म्हणून शिल्पा खेर यांचं या भागातल्या अनेक शाळांमध्ये नाव घेतलं जायचं. आपण आजवर नापास मुलांची गोष्ट ऐकली आहे, त्या प्रत्येक मोठ्या व्यक्तिमत्त्वातला एक हीरो खूप काळानंतर आपल्याला त्या गोष्टीच्या माध्यमातून दिसला आहे; पण त्या सगळ्या नापासवीरांना त्या काळात कुणीही वाली नव्हतं, कुठल्याही ‘शिल्पा खेर’ त्यांच्यासाठी धावून आल्या नव्हत्या. आता मात्र या नापासांसाठी तसं घडतय हे खरं!
शिल्पाबाईंशी बोलत असताना मला एक फोन आला म्हणून मी बाहेर गेलो आणि फोन झाल्यावर आतमध्ये परत आलो आणि पाहतो तर काय, माझा मुलगा अथर्व आणि शिल्पाबाईंची जोरदार गट्टी जमली होती. त्या म्हणाल्या : ‘‘तुम्ही बसा थोडा वेळ बाजूला, मी बोलते अथर्वशी.’’ त्या दोघांचा संवाद सुरू झाला.
‘गीत गा रहे है हम’, ‘तेरी मिट्टी में मै मर जावां’, ‘तू कितनी अच्छी है’ अशी अनेक गाणी अथर्वनं त्यांना म्हणून दाखवली. लाजरा-बुजरा आणि ‘म्हण म्हण’ म्हणूनही भाव खाणारा अथर्व इतकी गाणी एकापाठोपाठ अगदी उत्साहानं का गात होता, याचं कारण शोधण्याची गरज मला पडलीच नाही.
शिल्पाबाई म्हणाल्या : ‘मला माझ्या फाउंडेशनचं नाव मोठं करायचं नाही की सरकारकडून एक रुपयाचं अनुदानही घ्यायचं नाही. मला माझंही नाव मोठं करायचं नाही. चार मुलं माझ्या या चळवळीमुळे घडली पाहिजेत, त्या मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत, त्यांना शिक्षणाची गोडी लागली पाहिजे, एवढाच माझा उद्देश आहे. मी आणि माझे पती डॉ. जितेंद्र खेर यांनी सुरू केलेला हा उपक्रम केवळ मुंबईपुरताच मर्यादित न राहता, राज्यातल्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या शाळांमध्ये जाऊन ती एक चळवळ झाली पाहिजे, असं मला वाटतं. जवळ असलेल्या काही शाळांमध्ये शिल्पाबाई मला घेऊन गेल्या. अत्यंत मागासलेल्या आणि वाईट अवस्थेत असलेल्या शाळांमधली ही मुलं कमालीची तयार झालेली पाहायला मिळली. मी अनेक मुलांशी, शिक्षकांशी बोललो. ‘आम्हाला आता शिक्षणाची गोडी लागली आहे. मी ‘रोजनिशी’ नियमित फॉलो करतोय...’ असाच सगळ्यांच्या बोलण्यातला आशय होता.
शिक्षणाची गोडी लागावी असं काहीच शासनस्तरावर राबवल्या जात असलेल्या कुठल्याही उपक्रमात नसतं, याचे अनेक नमुने मी या शाळाभेटींदरम्यान पाहत होतो. शिल्पाबाईंनी या शाळांना केवळ दिशा देण्याचंच काम केलं नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचा पाया भक्कम करण्याचं काम आपल्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून त्यांनी केलं आहे.
‘फील्डवर जाऊन शहानिशा केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर शिक्कामोर्तब करू नये’, या भूमिकेनुसार शहानिशा करण्याचं काम मी करत असतो. त्यानुसार, शिल्पाबाईंच्या या चळवळीत मला महाराष्ट्रामधल्या चांगल्या शिक्षणपद्धतीचं वातावरण आढळून आलं. हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये कसा राबवला जाणार आहे, याचा आलेखही शिल्पाबाईंनी मला दाखवला. मुंबईतल्या शाळांमध्ये हे घडून आलं. महाराष्ट्रातल्या हजारो शाळांमध्ये हे घडलं तर त्याचा फायदा येणाऱ्या पिढ्यांना नक्कीच होईल.
आपल्या राज्यातली शिक्षणव्यवस्था किती किचकट होऊन बसली आहे, याचे अनेक दाखले मी या शाळाभेटींदरम्यान अनुभवले आहेत. ही शिक्षणव्यवस्था इतकी कुचकामी का झाली आहे, या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होतो. शिक्षणव्यवस्था सुधारण्यासाठी गोविंद नांदेडे, श्रीकर परदेशी यांनी टोकाची उचललेली पावलं आणि त्यांनी त्यावर केलेली प्रचंड मेहनत माझ्या डोळ्यांसमोर येत होती. आता अशी माणसं शिल्लक नाहीत का, हाही प्रश्न मला पडत होता.
शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी शिल्पा खेर यांनी सुरू केलेली ही चळवळ मुंबईसारखी राज्यभरात कितपत यशस्वी होईल माहीत नाही; पण त्यांनी निःस्वार्थीपणे उचलेलं हे पाऊल धाडसाचं आहे हे निःसंशय.