नितीशकुमार भाजपपासून दूर ; विधानसभा स्वतंत्र लढणार

उज्ज्वल कुमार 
Monday, 10 June 2019

 

  • बिहारच्या बाहेर विधानसभेच्या निवडणुका ‘जेडीयू’ स्वबळावर लढणार
  • बिहार विधानसभा निवडणुकीत ‘जेडीयू’ हा ‘एनडीए’सोबत असेल

पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकी-वेळी संयुक्त जनता दल (जेडीयू) हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) भाग असेल. मात्र, बिहारच्या बाहेर जेडीयू हा एनडीएचा घटक असणार नाही, असे आज स्पष्ट करण्यात आले. तसेच, जेडीयू केंद्रातील मोदी सरकारमध्येही सहभागी होणार नसल्याच्या निर्णयावर जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले.

जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बिहारच्या निवडणुकीत जेडीयू हा एनडीएसोबत असेल. मात्र, पक्षाच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून दिल्ली, हरियाना, जम्मू आणि काश्‍मीर आणि झारखंडमधील विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यात येतील, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. पक्षाचा विस्तार करण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे जेडीयूकडून सांगण्यात आले.

केंद्र सरकारमधील सांकेतिक सहभाग आमच्या पक्षाला मंजूर नाही, असे पक्षाचे सरचिटणीस के. सी. त्यागी म्हणाले. बिहारमध्ये आघाडी असलेल्या पक्षांना आम्ही सत्तेत समान वाटा दिला आहे, असे स्पष्ट करीत त्यागी यांनी भाजपला टोला लगावला. 

बिहार विधानसभा निवडणुकीत ‘जेडीयू’ हा ‘एनडीए’सोबत असेल. मात्र, बिहारव्यतिरिक्त इतर राज्यांमधील विधानसभा निवडणुका आम्ही स्वबळावर लढवू.
- नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री

केंद्रीय सत्तेतील सांकेतिक सहभाग आम्हाला मान्य नाही. बिहारमध्येही आम्ही आमच्या मित्र पक्षांना सत्तेमध्ये समान वाटा दिला आहे.
- के. सी. त्यागी, सरचिटणीस, जेडीयू

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News