बिराजदारांचा नववर्षाला ‘नो व्हेईकल डे’ चा संकल्प

परशुराम कोकणे
Tuesday, 7 January 2020

ज्या दिवशी ऑफिसला सायकलने जाणे शक्‍य नाही त्यादिवशी अन्य कामांसाठी सायकल वापरणार आहे. एखादी गोष्ट करण्याची तुमची तीव्र इच्छा असेल तर काहीच अडचणी येत नाहीत.

सोलापूर :  आपल्यापैकी अनेकांनी नववर्षाच्या निमित्ताने वेगवेगळे संकल्प केले असतील. केलेले संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नही सुरू असतील. बरोबर ना? असाच एक संकल्प सोलापुरातील ॲड. नागनाथ बिराजदार यांनी नववर्षानिमित्त केला आहे. ॲड. बिराजदार यांनी सायकलिंगचा संकल्प केला असून त्यानुसार ते घरापासून कामाच्या ठिकाणापर्यंत म्हणजेच केगाव येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रापर्यंत सायकलिंग करत आहेत.

ॲड. बिराजदार हे पोलिस प्रशिक्षण केंद्रात विधी निदेशक पदावर नोकरीला आहेत. नवप्रविष्ठ पोलिस शिपायांना कायदा शिकवण्याचे काम ते करतात. वेगवेगळ्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन चळवळीत ते सहभागी होत असतात. आपल्या संकल्पाविषयी सांगताना ॲड. नागनाथ बिराजदार म्हणतात, ‘नवीन वर्षाचा पहिला संपूर्ण दिवस मी ‘नो व्हेईकल डे’ पाळला. नववर्षाच्या संकल्पाची पूर्तता दिवसभर सायकलिंगने केली. ऑफिस, संबंधित कामे, फिरणे, मित्रांना भेटणे हे सर्व सायकलिंगने केले. दिवसभरात जवळपास ७५ किलोमीटर सायकलिंग केले. खूप समाधान वाटले.

दिवसभराच्या सायकलिंगमुळे शरीराचा प्रत्येक भाग माझ्याशी तक्रार करत होता. पण माझे मन मात्र समाधानी होते. रात्री शांत व गाढ झोप लागली.’ सायकलिंगचा सराव नसल्याने थोडेसे पाय दुखत असले तरी मी माझा संकल्प कायम ठेवणार आहे. सायकलिंग करताना आवडीचा गायक अरिजित सिंग याची गाणी मी एकतो. गाणी ऐकत कधी घर येते हे कळत नाही. यानिमित्त मला पुन्हा संगीताच्या किमयेची प्रचिती आली आहे. संगीतामुळे तुमचा त्रास नाहीसा होत नाही. परंतु, त्रास सहन करण्याची किंवा विसरण्याची शक्ती तुम्हाला नक्कीच मिळते, असेही ॲड. बिराजदार यांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News