नव्या अभ्यासिकेमुळे मिळणार महाडमधील विद्यार्थ्यांना नवी दिशा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

एमपीएससी, यूपीएससी, आयएएस, आयबीपीएससारख्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत.

महाड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील ग्रंथालय अभ्यासिकेमुळे महाडमधील विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळत आहे. त्यामुळे महाड व परिसरातील ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी भरमसाठ खर्च करून मोठ्या शहरांकडे जाण्याचा त्रास वाचला आहे.

ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरीब आणि होतकरू मुलांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी लागणारी पुस्तके परवडत नाहीत. मार्गदर्शनासाठी मोठ्या शहरात जावे लागते. तेथील महागडी फी, राहण्याचा खर्च परवडत नसल्याने अनेक हुशार व होतकरू मुले हा मार्ग सोडून देतात. त्यामुळे पात्रता असूनही अनेकांना या परीक्षांपासून वंचित राहावे लागते. परंतु आता महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामधील ग्रंथालयात अभ्यासिका व ग्रंथालय मुलांसाठी उपयुक्त ठरत आहे. येथील संदर्भग्रंथांचा मुलांना अभ्यास करताना उपयोग होत असतो. स्पर्धा परीक्षेसाठी महागडे क्‍लास लावणे ग्रामीण भागातील मुलांना सहज शक्‍य होत नाही. त्यामुळे येथे अभ्यासासाठी येणाऱ्या मुलांना शांततेमुळे मनापासून अभ्यास करणे आणि आत्मसात करणे फायदेशीर ठरत आहे.

एमपीएससी, यूपीएससी, आयएएस, आयबीपीएससारख्या स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये असलेल्या ग्रंथालय अभ्यासिकेत अनेक विद्यार्थी, शासकीय कर्मचारी संदर्भ ग्रंथांसाठी आणि अभ्यासासाठी येत आहेत. या ग्रंथालयात विविध विषयांवरील संदर्भ ग्रंथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्यावरील पुस्तके आणि स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयातील शांतता, उपयुक्त पुस्तके यामुळे स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणारे शेकडो विद्यार्थी अभ्यासासाठी दररोज येथे येतात. सकाळी १० वाजल्यापासून ५ वाजेपर्यंत ही मुले अभ्यास करतात. दुपारी आपआपला जेवणाचा डबा मुले आणतात. पाचवीपासून मुलांना यात सहभागी होता येते. विविध कार्यालयांतील सरकारी अधिकारी, कर्मचारीही आपल्या उच्च शिक्षणासाठी या अभ्यासिकेचा वापर करत आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News