केंद्राची नविन नियमावाली; २१ सप्टेंबरपासून सुरू होणार शाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 9 September 2020
  • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते.
  • लॉकडाउन दरम्यान देशातील सर्व मंदिरे, उद्योगधंदे तसेच शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

मुंबई :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. लॉकडाउन दरम्यान देशातील सर्व मंदिरे, उद्योगधंदे तसेच शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. पण आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता, २१ सप्टेंबरपासून शाळा अंशतः सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्राने नवी नियमावली जाहिर केली आहे. २१ सप्टेंबरपासून इयत्ता नववी पासून १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा अटी शर्थींसह उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु विद्यार्थ्यांना शाळेत जायचे आहे की, नाही हे ऐच्छिक असणार आहे. यावेळेस विद्यार्थ्यांना प्रत्येकामध्ये कमीत कमी ६ फुटाचे अंतर ठेवावे लागणार आहे. तसेच मास्क देखील अनिवार्य असणार आहे. या व्यतिरिक्त कंटेन्मेंट झोन मधील शाळा उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आली नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमावलीत ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळांना जास्तीत जास्त ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे. नववी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनासाठी शाळेत जायचे असेल तर त्यांना परवानगी असेल. पण त्यांना आपल्या पालकांकडून लेखी स्वरूपात परवानगी घेणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायही उपलब्ध असेल.

 

 

 

दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर राहिल अशी व्यवस्था शाळांना करावी लागणार आहे. तसेच खेळ किंवा विद्यार्थी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. संक्रमणाचा धोका वाढू शकतो म्हणून खेळांना आणि विद्यार्थ्यांच्या एकत्र येण्याला परवानगी नसेल. या व्यतिरिक्त शाळांमध्ये राज्यातील हेल्पलाईन क्रमांक आणि स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांचे नंबरही डिस्प्ले करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कंन्टेन्मेंट झोनच्या जवळ राहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळेत जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच ज्या शाळांचा क्वारंटाइन सेंटर म्हणून वापर करण्यात आला होता त्या सुरू करण्यापूर्वी योग्यरित्या सॅनिटाईझ करण्याचा ही आदेश देण्यात आला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News