कोरोना रुग्णांवर उपचाराची नवी पद्धत; जाणून घ्या कसा केला जाणार उपचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 27 May 2020

कोरोनाचा विषाणू श्‍वसनयंत्रणेवर हल्ला करत असल्याने फुफ्फुसांवर परिणाम होतो. चीनमध्ये रुग्णांच्या फुफ्फुसांचे एक्‍स-रे आणि सीटी स्कॅन काढून उपचारांची दिशा ठरवण्यात येत होती.

मुंबई : धारावीतील लक्षणविरहीत कोरोना रुग्णांवर आता चिनी पद्धतीने उपचार करण्यात येणार आहेत. ठरावीक दिवसांत रुग्णांच्या छातीचे एक्‍स-रे काढून उपचारांची दिशा ठरवण्यात येईल. हाजी अली येथील नॅशनल स्पोर्टस्‌ क्‍लब ऑफ इंडिया येथील कोव्हिड केअर केंद्रात ही पद्धत वापरण्यात येत आहे.

कोरोनाचा विषाणू श्‍वसनयंत्रणेवर हल्ला करत असल्याने फुफ्फुसांवर परिणाम होतो. चीनमध्ये रुग्णांच्या फुफ्फुसांचे एक्‍स-रे आणि सीटी स्कॅन काढून उपचारांची दिशा ठरवण्यात येत होती. त्याच पद्धतीचा वापर एनएससीआय कोव्हिड केंद्रात केला जात आहे. तेथील रुग्णांचे दोन ते तीन दिवसांनी एक्‍स-रे काढून उपचार निश्‍चित केले जातात. त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत. त्यामुळे आता वरळी, बीकेसी व गोरेगाव येथील कोरोना केंद्रांत याच पद्धतीचा वापर करण्यात येईल. त्यासाठी 10 एक्‍स-रे मशीन खरेदी केल्या जाणार आहेत.

सॉफ्टवेअरची मदत

एनएससीआय केंद्रात एका सॉफ्टवेअरच्या मदतीने एक्‍स-रेचा आढावा घेतला जातो. त्यामुळे रुग्णाच्या फुफ्फुसांतील लहानसा बदलही सहज समजू शकतो. त्यानुसार तत्काळ उपचार सुरू करता येतात, असे महापालिकेच्या एका डॉक्‍टरने सांगितले.

साडेतीन हजार रुग्ण दाखल

मुंबईतील लक्षणविरहीत कोरोनाचे रुग्ण, इतर दीर्घकालीन आजार नसलेले व ज्येष्ठ नागरिक वगळून अन्य रुग्णांसाठी कोव्हिड केअर सेंटरमध्ये 29 हजार 629 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे सध्या 3,456 रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत 5,294 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News