आयपीएल दुबईत खेळवण्यासाठी सरकारच्या परवानगीची गरज?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 23 July 2020

आयपीएल संयोजनाचा मार्ग खुला झाल्यानंतर बीसीसीआयने संयोजनाची एकेक प्रक्रिया सुरू करण्यास प्रारंभ केला आहे.

नवी दिल्ली: आयपीएल संयोजनाचा मार्ग खुला झाल्यानंतर बीसीसीआयने संयोजनाची एकेक प्रक्रिया सुरू करण्यास प्रारंभ केला आहे. सर्वप्रथम दुबईत ही स्पर्धा खेळवण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.आयपीएल दुबईत खेळवण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे पत्र आम्ही केंद्र सरकारला पाठवले आहे. सरकारने हिरवा कंदील दाखवल्यानंतर आम्ही स्पर्धेचा कार्यक्रम बहुधा पुढच्या आठवड्यात जाहीर करू, असे आयपीएल प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.

केंद्र सरकारची परवानगी मिळणे, ही केवळ औपचारिकता असेल, असे बोलले जात आहे. बीसीसीआयचे सचिन जय शहा हे गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत करण्यात आलेल्या पत्राला विरोध करण्याचा प्रश्न येणार नसल्याचे आयपीएल प्रशासन समिती म्हणत आहे.

2014 मध्ये लोकसभा निवडणुका आणि आयपीएलच्या तारखा एकच असल्यामुळे आयपीएलचा पहिला टप्पा दुबईत झाला होता. त्यामुळे दुबईत आयपीएल खेळवण्याचा अनुभव असल्याने आयोजनात कोणत्याही त्रुटी असण्याची शक्‍यता कमी आहे.

तारखांबाबत संभ्रम
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डोळ्यासमोर ठेऊन प्रशासकीय समितीने 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर असा प्राथमिक कालावधी निश्‍चित केला होता; परंतु दिवाळीतही आयपीएलचे सामने खेळवावे, यासाठी ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्टस्‌ आग्रही असल्याने आयपीएल 14 नोव्हेंबरपर्यंत लांबू शकते. म्हणून पटेल यांनी तारखांबाबत सांगण्यास नकार दिला.
ऑस्ट्रेलियातील विश्वकरंडक पुढे जाणार आणि आयपीएलचा मार्ग मोकळा होणार याचा अंदाज अगोदरच आलेला असल्यामुळे आयपीएल संघमालकांनीही अगोदरपासूनच दुबई-अबुधाबीतील हॉटेल्सची शोधाशोध सुरू केलेली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News