निसर्गाचा स्वर्ग म्हणजे कुंभार्ली घाट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019
  • कुंभार्ली घाटात अनेक ठिकाणी लहानमोठे धबधबे कड्याकपारीतून फेसाळत उड्या घेत आहेत. पाण्याचे झरे मुक्तपणे खळखळाट करीत वाहत आहेत.

कुंभार्ली घाटात अनेक ठिकाणी लहानमोठे धबधबे कड्याकपारीतून फेसाळत उड्या घेत आहेत. पाण्याचे झरे मुक्तपणे खळखळाट करीत वाहत आहेत. आजूबाजूची हिरवी वनसंपदा पाहून पर्यटक येथे वर्षा सहलीचा मनमुराद आनंद घेत आहेत. पावसाळी कुंभार्ली म्हणजे निसर्गाचे लेणेच आहे.

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट पावसाळ्यात तेथील नितांत सुंदर वैभवाने अधिकच खुलतो. घाटातील उंच टेकड्या, त्यावर पडणारा पाऊस व पाऊस थांबल्यावर घाटात पसरणाऱ्या धुक्‍याचे साम्राज्य पर्यटकांना खिळवून ठेवते. ढगाळलेले आकाश व सभोवताली धुक्‍याची चादर लपेटून पर्यटक घाटातून प्रवास करीत असतात. हा क्षण अनमोल असतो. घाटात मुसळधार पावसाचा आस्वाद घेता येत असल्यामुळे पावसाळी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. घाटातील नयनरम्य दृश्‍य, ठिकठिकाणचे लहानमोठे फेसाळणारे धबधबे, विविध फुलणारी रानफुले, त्यावर भिरभिरणारी फुलपाखरे पर्यटकांचे मन आकर्षून घेतात. गरमागरम भजी, चहा, नाश्‍त्यासाठी घाटात ठिकठिकाणी टपऱ्या आहेतच. घाटातील पावसात भिजल्यानंतर हे सारे खाण्याची मजा काही औरच. 

सोनपात्रा नावाच्या धनगर बांधवाने ब्रिटिश अधिकाऱ्यांना या रस्त्याची वाट दाखविली होती. त्यामुळे या घाटात सोनपात्राला अधिक महत्त्व आहे. कोयनेतून घाट उतरताना तसेच पोफळीतून घाट चढताना यू टर्नवर सोनपात्राचे मंदिर आहे. येथे पर्यटक दर्शनासाठी थांबतात. घाटाच्या मध्यभागी गेल्यावर वानरांचा कळप कडेला उत्साहात फिरताना पर्यटकांच्या नजरेस पडतो. लहान पिलू उराशी बाळगून वानरीण बिनधास्त उड्या घेत असते. पर्यटक या वानरांना खाऊ घालत असल्याने ती येथेच विसावतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News