अधोमुख श्वानासनयुक्त नटराजासन
- त्यानंतर तोच पाय हात वळवून डोक्याकडे घ्यावा. हात वळवणे शक्य नसेल तर पायाचा घोटा पकडूनही हे आसन करता येते.
अधोमुखश्वानासनामध्ये विविध बदल करून बरीच आसने करता येतात. आपण उभे राहून नटराजासन करतो, त्याच पद्धतीने ते अधोमुखश्वानासनातही करता येते. यापूर्वी आपण नटराजासनाचे दोन्ही प्रकार पाहिले आहेतच. त्यामुळे अधोमुखश्वानासन व नटराजासन ही दोन्ही आसने व्यवस्थित येतात, त्यांना हे आसन करणे अवघड नाही. मात्र, ते जमत नसणाऱ्यांनी हळूहळू योग्य मार्गदर्शन किंवा आधाराने सराव सुरू करता येईल.
प्रथम अधोमुखश्वानासन करावे. त्यानंतर एकपाद अधोमुखश्वानासनाप्रमाणे एक पाय वर घ्यावा. हा वर घेतलेला पाय गुडघ्यात वाकवून डाव्या हाताने पायाचा अंगठा पकडावा. त्यानंतर तोच पाय हात वळवून डोक्याकडे घ्यावा. हात वळवणे शक्य नसेल तर पायाचा घोटा पकडूनही हे आसन करता येते. हे तोलात्मक आसन असल्याने पूर्ण लक्ष देऊनच सराव करावा. एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूनही करावे. अधोमुखश्वानासन व नटराजासन दोन्हीचे फायदे यामध्ये मिळतात. एकाग्रता तसेच लवचिकता वाढते. पूर्ण शरीराला ताण बसल्याने स्नायूंची कार्यक्षमताही वाढते.