#NationalYouthDayमहिला क्रिकेट पंच तरुणींची भरारी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 January 2020

क्रिकेटच्या सामन्यात एखादी महिला अंपायर म्हणून उभी दिसणे हे चित्र दुरापास्तच. कारण, आता कुठे महिला क्रिकेट लोकप्रिय होऊ लागला आहे. त्यामुळे आपल्याकडे महिला पंचांची संख्याही तशी कमीच. सोलापुरातील ऋतू भोसले आणि प्रसिद्धी जोशी मात्र गेल्या काही वर्षांपासून पंचाची ही भूमिका लीलया पार पाडत आहेत. त्यांच्या अचूक निर्णयक्षमतेमुळे आज त्या प्रत्येक स्पर्धेत राज्यस्तरीय पंचांच्या बरोबरीने काम करत आहेत. सोलापुरातील पहिली महिला पंच होण्याचा मानही त्यांना मिळाला. युवा दिनानिमित्त बातमीदार अलताफ कडकाले यांनी महिला अंपायरची घेतलेली विशेष मुलाखत. मुलाखतीचे चित्रीकरण बातमीदार परशुराम कोकणे यांनी केले.  

सोलापूर: शहरातील भय्या चौकातील ऋतू भोसले व बाळे येथील रहिवासी असलेल्या प्रसिद्धी जोशीला लहानपणापासून क्रिकेटची आवड. घराशेजारी त्या दोघी क्रिकेट खेळायच्या. शाळेत इतर खेळता- खेळता त्या पुढे होत्या. त्याचबरोबर त्यांनी राज्यस्तरावर कामगिरी केली आहे. मात्र, आवडत्या क्रिकेटकडे त्यांनी दुर्लक्ष होऊ दिले नाही. सोलापूरच्या संघातून त्या क्रिकेट खेळू लागल्या. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बुर्स, प्रशिक्षक मल्लिनाथ याळगी यांनी त्यांच्यातील गुण हेरले. त्यांना महिला क्रिकेट संघात संधी दिली. 

 

रागिणी महिला क्रिकेट संघाकडून खेळताना प्रशिक्षक मल्लिनाथ याळगी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले. तिने पंचगिरीचे धडे गिरवले आणि हळूहळू दर्शना मैदानात पंच म्हणून उभी राहू लागली. आता जिल्हास्तरावर होणाऱ्या सामन्यात तिला पंच म्हणून काम पाहण्याची संधी मिळाली आहे. यातून तिने इतर महिलांसमोर करिअरसाठी एक वेगळा पर्याय ठेवला आहे. सोलापुरात जास्त मुली क्रिकेट खेळत नव्हत्या. त्यांना फार मोठी संधी असतानाही क्रिकेटमध्ये मुली दिसत नव्हत्या. परंतु, मल्लिनाथ याळगी यांनी मुलींना, पालक व त्यांच्या शिक्षकांना भेटून मुलींना क्रिकेट खेळाकडे वळवले. त्यांना पटवून सांगितले क्रिकेटमध्येही करिअर होऊ शकते. मुलींना एकत्रित करून क्रिकेट प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. क्रिकेट खेळता-खेळता मुलींचा उत्साह वाढला. नंतर त्यांनी ठरवले की, आम्ही क्रिकेटमध्ये करिअर करणार. 

मल्लिनाथ याळगी म्हणातात, मुळात क्‍लब काढण्याचा विचार आला तेव्हा मुलींना क्रिकेटमध्ये करिअर कराण्यासाठी प्रोत्साहन देण्याचासाठीच. हे एक ध्येय घेऊन मी पुढे आलो. नंतर काही मुली क्रिकेटर होतील का पंच होतील याचाही विचार मी करू लागलो. त्यातून ऋतू भोसले आणि प्रसिद्धी जोशी या दोन मुली पंच म्हणून पुढे आल्या आहेत. त्यांच्याबरोबर आणखीन संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे. 

ऋतू भोसले उत्कृष्ट फलंदाज 
ऋतू भोसले 2010 पासून क्रिकेट खेळत आहे. या काळात तिने राज्य कॅम्प, तसेच स्टेट मॅच खेळली आहे. विद्यापीठ संघाकडून महिला संघाची सतत तीन वर्षे कर्णधार म्हणून काम केले आहे. सोलापूर जिल्हा महिला संघाची कर्णधार होती. रागिणी महिला क्रिकेट क्‍लबची ती ज्येष्ठ खेळाडू आहे. क्‍लबबरोबर महाराष्ट्र व राज्याबाहेर भारतातील संघाबरोबर खेळताना संघाचे कर्णधारपद तिने भूषवले आहे. दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही ती कर्णधार होती. आता 29 डिसेंबरला विशाखापट्टणम येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची कर्णधार होती. तिने अनेक सामने सोलापूर डिस्ट्रिक क्रिकेट असोसिएशनला कर्णधार म्हणून जिंकून दिले आहे. ती एक उत्कृष्ट फलंदाज आहे. 

प्रसिद्धी जोशी उत्कृष्ट गोलंदाज 
प्रसिद्धी जोशी 2016पासून क्रिकेट खेळत असून सुरवातीला घरातील लोकांनी तिला क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. आम्ही घरी जाऊन तिच्या घरच्यांना क्रिकेटमधील करिअरविषयी पटवून दिले. एक चांगली क्रिकेटर होणार असल्याच्या खात्रीमुळे क्रिकेट खेळता- खेळता एक चांगली क्रिकेटपटू होण्याचा मान तिने मिळविला. आश्‍चर्य म्हणजे ती जिल्ह्यात खेळली, राज्याच्या सराव शिबिरात तीन वेळा सहभाग नोंदविला. शालेय राष्ट्रीय स्पर्धेत खेळली आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. तीही लवकरच पंचाची परीक्षा देणार असून क्रिकेटबरोबर पंचाच्या भूमिकेतही ती दिसणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News