राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे गोरगरीब शिक्षणापासून वंचित राहतील-अनिल सदगोपाल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या धोरणाला समाज माध्यमांतून अनेक जण विरोध करत असतानाच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिल सदगोपाल यांनीदेखील या धोरणावर गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या धोरणाला समाज माध्यमांतून अनेक जण विरोध करत असतानाच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अनिल सदगोपाल यांनीदेखील या धोरणावर गंभीर आरोप केले आहेत. देशातील शिक्षण व्यवस्था मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या ताब्यात सोपवण्याचे हे धोरण आहे. यातून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव आणला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, हे धोरण "मनुवादी' व्यवस्थेवर आधारित असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

नव्याने मंजूर केलेल्या शिक्षण धोरणातून भेदभाव आणि त्यासाठीची शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात श्रीमंत आणि गरिबी अशी मोठी दरी निर्माण होणार आहे. यामुळे दुसरीकडे शिक्षण प्रचंड महाग होणार असून केवळ श्रीमंत आणि कार्पोरेट घराण्यांना या शिक्षणाचा अधिकाधिक लाभ कसा होईल, यासाठीची उपाययोजना या धोरणाच्या माध्यमातून करण्यात असल्याचा दावाही प्रा. सदगोपाल यांनी केला आहे.

नव्या धोरणानुसार कार्पोरेट घराण्याकडून चालवण्यात येणाऱ्या शिक्षण संस्था, विद्यापीठे यांना सरकारकडून अनुदान देण्याची तरतूद केली जाणार आहे. याशिवाय सरकारी अनुदानावर चालणाऱ्या सर्व संस्था, विद्यापीठे यांचे खाजगीकरण करून ते कार्पोरेट कंपनीच्या स्वाधीन केले जाणार आहे. कार्पोरेट कंपन्या शिक्षणाच्या नावाने सरकारी जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करतील आणि त्यावर आपला ताबा मिळवतील. यातून केवळ नफा कमवण्याच्या उद्देशातून शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचंड मोठा गोंधळ निर्माण करतील. यामुळे देशातील कोट्यवधी गोरगरीब शिक्षणापासून बेदखल होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

ऑनलाईन शिक्षणातूनही नफा
मोदी सरकारकडून सहा राज्यांमध्ये जागतिक बॅंकेच्या आदेशानुसार ऑनलाईन शिक्षणाचा मोठा गाजावाजा सुरू आहे. त्यासाठी विविध कंपन्या आणि त्यांचे एक मोठे जाळे पसरवले जात आहे. यातूनही खूप मोठा आर्थिक लाभ काही कंपन्यांना होत आहे. ऑनलाईन शिक्षणातून केवळ कार्पोरेट कंपन्यांना नफा होणार आहे. मात्र, यामुळे गोरगरीब शिक्षणापासून वंचित राहतील. त्यांना हे शिक्षणच मिळू शकणार नाही, अशी भीती प्रा. अनिल सदगोपाल यांनी व्यक्त केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News