राष्ट्रीय तिरंदाजी शिबिर पुण्यात होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 1 August 2020
  • कोरोनाचे पुण्यातील रुग्ण वाढत असल्याने ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी भारतीय तिरंदाजांचे शिबिर पुण्यात घेण्यास विरोध केला जात होता; मात्र आता क्रीडा प्राधिकरण या शिबिरासाठी पुण्यासच पसंती देण्याचा विचार करीत आहे.

मुंबई :- कोरोनाचे पुण्यातील रुग्ण वाढत असल्याने ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी भारतीय तिरंदाजांचे शिबिर पुण्यात घेण्यास विरोध केला जात होता; मात्र आता क्रीडा प्राधिकरण या शिबिरासाठी पुण्यासच पसंती देण्याचा विचार करीत आहे.

पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट येथे यापूर्वी महिला तिरंदाजांचे शिबिर झाले आहे. त्या वेळी शिबिरातील महिला तिरंदाजांची व्यवस्था लष्कर संकुलाच्या नजीक असलेल्या हॉटेलमध्ये करण्यात आली होती. एवढेच नव्हे, तर विश्वकरंडक स्पर्धांसाठी संघाची निवड चाचणीही पुण्यातच झाली होती. पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील शिबिर रद्द करण्यात आले. त्यामुळे दीपिका कुमारी, बॉम्बयला देवी यांनी घरी परतण्याचे ठरवले होते. आता पुण्यातील रुग्ण कमी होत नसल्यामुळे तिरंदाजी संघटना शिबिरासाठी जमशेदपूर तसेच सोनिपतचा विचार करीत होती.

भारतीय तिरंदाजी संघटनेची संलग्नताही देशातील अन्य क्रीडा संघटनांप्रमाणेच रद्द झाली. त्यामुळे ऑलिंपिक पूर्वतयारीसाठी तिरंदाजांचे शिबिर घेण्याची जबाबदारी क्रीडा प्राधिकरणावर आली. पुण्यातील शिबिराच्या वेळी असलेली व्यवस्था पाहून क्रीडा प्राधिकरणाने आर्मी स्पोर्टस्‌ इन्स्टिट्यूटसह संपर्क साधला. त्या वेळी महिला तिरंदाजांची व्यवस्थाही संकुलात करण्याबाबत विनंती केली आहे.

आर्मी स्पोर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये प्रवीण जाधव, तरुणदीप रायसारखे तिरंदाज सराव करीत आहेत. आता भारताच्या आघाडीच्या पुरुष तसेच महिला तिरंदाजांची निवास व्यवस्था संकुलात झाल्यास त्यांचा कोरोनापासून बचाव होईल; तसेच शिबिरही सुरळीतपणे पार पडू शकेल, असा विचार होत आहे. आर्मी स्पोर्टस्‌ इन्स्टिट्यूटने मंजुरी न दिल्यास शिबिर सोनिपत किंवा जमशेदपूरला सप्टेंबरमध्ये सुरू होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News