मुंबई मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मुलींची चमक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 January 2020

राष्ट्रीय क्रॉस कंट्रीत खेळण्याच्या उद्देशाने अलिबागच्या राज्य क्रॉस कंट्रीत सहभागी झाली होती, पण त्यावेळी तिला दुखापत झाली.काही डॉक्‍टरांनी मॅरेथॉन सोडण्याचा सल्ला दिला, पण त्याचवेळी काहींनी पायातील ताकद वाढवण्याचे एक्‍झरसाईज नियमित करण्यास सांगितले. शस्त्रक्रियेऐवजी मी यास पसंती दिली.

मुंबई : वडिलांच्या चिंताजनक होत असलेल्या प्रकृतीचे आव्हान पेलत आरती पाटील आणि मोनिका अथरे यांनी मुंबई मॅरेथॉनमधील अर्धमॅरेथॉन शर्यतीत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. अवघ्या एका महिन्यापूर्वी स्पर्धात्मक शर्यतीत पुनरागमन केलेली मोनिका आणि राज्य क्रॉस कंट्रीच्यावेळी झालेली दुखापत बाजूला ठेवतही यांनी लक्षवेधक कामगिरी केली.

मीरतच्या पारुलने पाच, तसेच दहा हजार मीटरच्या शर्यतीद्वारे ऑलिंपिक पात्रतेचे लक्ष्य बाळगले आहे. त्याचीच पूर्वतयारी तसेच त्याचवेळी स्पर्धेचा अनुभव या उद्देशाने सहभागी झालेल्या पारुलने सहज बाजी मारली. मात्र लक्ष वेधले ते मूळच्या गडहिंग्लजच्या, नाशिकमध्ये लांब अंतराच्या शर्यतीचे धडे गिरवणाऱ्या, तसेच मुंबई कस्टम्समध्ये नोकरीस असलेल्या आरती, तसेच एक वर्षे दुखापतीचा सामना केलेल्या मोनिकाने.

आरतीला गडहिंग्लज तालुक्‍यातील. महापुराने शेतीचे नुकसान केले, त्यावेळी घरच्यांबरोबर संपर्क होत नसल्याने ते दिवस कमालीचे टेन्शनचे होते, असे सांगितले, पण त्यातून सावरतात तोच वडिलांना गंभीर दुखापत झाली. त्यातच वडिलांना मधुमेह. त्यामुळे खर्च वाढला. तिने यापूर्वीच वडिलांच्या खर्चाची जबाबदारी घेतली आहे, त्यामुळे बक्षीस रकमेचा उपयोग डाएटसाठी करणार असे पारंपरिक उत्तर दिल्यावर काही वेळातच वडिलांच्या प्रकृतीकडेही लक्ष देत आहे. त्यांच्यावर मुंबईत उपचार करावे लागणार आहेत, असे सांगितले.

आरतीची पहिलीच मॅरेथॉन
आरतीची ही पहिलीच मुंबई मॅरेथॉन. खरं तर ती आजच तेलंगणात होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्रीत खेळण्याच्या उद्देशाने अलिबागच्या राज्य क्रॉस कंट्रीत सहभागी झाली होती, पण त्यावेळी तिला दुखापत झाली. आशियाई क्रॉस कंट्रीत खेळणे नक्कीच माझ्यासाठी महत्त्वाचे होते. पण आता पदार्पणाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये पदक जिंकल्याचे समाधान आहे, असे तिने सांगितले.

नाशिकच्याच मोनिका अथरेने तिसऱ्या क्रमांकाने शर्यत पूर्ण केली. गतवर्षी मी या स्पर्धेत नव्हते. ही माझी केवळ दुसरी स्पर्धा आहे. माझा पाय दुखावला होता. त्यावेळी काही डॉक्‍टरांनी मॅरेथॉन सोडण्याचा सल्ला दिला, पण त्याचवेळी काहींनी पायातील ताकद वाढवण्याचे एक्‍झरसाईज नियमित करण्यास सांगितले. शस्त्रक्रियेऐवजी मी यास पसंती दिली. दुखऱ्या पायावर उपचार सुरू असताना वडिलांवर अँजिओप्लास्टी करावी लागली. गतवर्षी एकंदर आठ-दहा लाखांपर्यंत वैद्यकीय खर्च झाला. यापूर्वी मॅरेथॉन जिंकल्यामुळे आर्थिक प्रश्‍न फारसा भेडसावला नाही. त्यातच विमा संरक्षणही होते. आता नव्याने सुरुवात केली आहे, त्यात चांगली कामगिरी होत आहे, यश मिळत आहे, हे महत्त्वाचे असल्याचे मोनिकाने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News