नरनाळा किल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 August 2020
  • नरनाळा अभयारण्य हे विर्दभातील प्रसिध्द असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे.
  • याच अभयारण्यात नरनाळा किल्ला आहे.
  • नरनाळा किल्ला तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला आहे.

नरनाळा अभयारण्य हे विर्दभातील प्रसिध्द असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. याच अभयारण्यात नरनाळा किल्ला आहे. नरनाळा किल्ला तीन किल्ल्यांचा मिळून बनलेला आहे. यातील पूर्वेकडील (उजवीकडील) गडाला “जाफराबादचा किल्ला”, मधील गडाला “नरनाळा” आणि पश्र्चिमेकडील (डावीकडील) गडाला “तेलीया गड” म्हणतात. यातील जाफराबाद किल्ला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या “कोअर एरीयात” गेल्यामुळे पाहाता येत नाही, तर तेलीया गडावर जाण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. हे तीन ही किल्ले नरनाळा अभयारण्यात येत असल्यामुळे त्यांना वनसंरक्षण कायदा आणि पूरातत्व कायदा या दोन्ही कायद्यांचे संरक्षण लाभल्यामुळे किल्ल्यावरील वास्तू सुस्थितीत आहेत. पण त्याच बरोबर जंगलाचा विळखा या वास्तूंभोवती पडत आहे.

नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ आहे. संध्याकाळी ५.०० वाजल्या नंतर नरनाळा अभयारण्यात थांबता येत नाही. हे अभयारण्य दर मंगळवारी आणि राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी बंद असते. नरनाळा अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी गाडीचे आणि माणसांचे प्रवेशशुल्क भरावे लागते. नरनाळा किल्ल्याचा घेर मोठा असल्यामुळे किल्ला संपूर्ण पहाण्यासाठी एक अख्खा दिवस लागतो तेथे भेटलेल्या वनाधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, नरनळा किल्ल्याचाही मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या “कोअर एरीयात” लवकरच समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा किल्ला सुध्दा गडप्रेमींना पहाणे अशक्य होईल.

आज अस्तित्वात असलेल्या नरनाळा किल्ल्याचा एतिहासिक कागदपत्रातील पहिला उल्लेख “तारिख-ए-फरीश्ता” या ग्रंथात आढळतो. या किल्ल्याची दुरूस्ती इ.स. १४२५ मध्ये बहामणी घराण्यातील नववा राजा अहमदशहा वली याने केल्याचा तो उल्लेख आहे. पुढे इ.स. १४८८ मध्ये इमादशाही घराण्यातील मूळ पुरूष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याच्या ताब्यात नरनाळा किल्ला आल्यावर त्याने या किल्ल्याची दुरूस्ती केली आणि विस्तार केला. इमादशाही घराण्याच्या मूळ पुरूष फत्तेउल्ला इमाद उलमुल्क हा मूळचा विजयनगर साम्राज्यातील ब्राम्हणाचा मुलगा होता बहामनी राज्याच्या बेरार (वऱ्हाड) प्रांताचा सेनापती खान-ए-जहानचा खास मर्जीतील हा मुलगा पुढे बहामनी राज्याचा सेनापती बनला. बहामनीच्या पडत्या काळात त्याने इ.स. १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली.

इमादशाही घराण्याने ९० वर्षे वऱ्हाड प्रांतावर राज्य केले. त्यानंतर १५७२ मध्ये गाविलगड आणि नरनाळ हे दोन्ही किल्ले निजामशाहीत सामिल झाले.

इ.स. १५९८ मध्ये अकबराने नरनाळा किल्ला मुघल साम्राज्याला जोडला. परंतू मलिक अंबरने तो पुन्हा निजामशाहीत आणला. शहाजहानच्या काळात गाविलगड किल्ला पुन्हा मुघल साम्राज्यात गेला. इ.स. १७३८ मध्ये रघूजी भोसले यांनी शुजातखानचा पराभव करून गाविलगड आणि नरनाळा हे दोन्ही किल्ले ताब्यात घेतले. पण लवकरच हे किल्ले पुन्हा निजामाच्या ताब्यात गेले. निजाम आणि पेशवे यांच्यातील भांडणाचा फायदा घेऊन मुधोजी भोसले यांनी १७५२ मध्ये गाविलगड जिंकून घेतला.

१३ ते १५ डिसेंबर १८०३ या तीन दिवसात इंग्रज सेनानी वेलस्ली आणि भोसल्यांचा किल्लेदार बेनिसिंग यांच्यात गाविलगडावर लढाई झाली. यात बेनिसिंग याला हौतात्म्य प्राप्त झाल आणि किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुढे १८ डिसेंबर १८०३ रोजी झालेल्या देवगाव तहानुसार गाविलगड आणि नरनाळा हे दोन्ही किल्ले भोसल्यांच्या ताब्यात गेले. त्यानंतर इंग्रज आणि भोसले यांच्यात झालेल्या तहानुसार गाविलगड आणि नरनाळा किल्ले इंग्रजांकडे गेले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News