नागपूर विभागातील मुले मातृभाषेतच "ढ"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  •  दहावीतील बच्चे, मराठीत कच्चे
  • मराठीत 34.70 टक्के विद्यार्थी नापास 

नागपूर: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी आणि तसे प्रयत्न सुरू असतानाच नागपूर विभागातील विद्यार्थी मातृभाषा मराठीतच 'ढ' असल्याचे दहावीच्या निकालाने अधोरेखित केले आहे. पहिली भाषा असूनही मराठी विषयात केवळ 65.30 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तब्बल 34.70 टक्के विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय कठीण ठरला.
 
योग्य शिक्षणाअभावी मुले इंग्रजीत मागे पडत असल्याचा समज आजवर होता. परंतु, यंदाच्या निकालाने हा समज चुकीचा ठरविला. पहिली भाषा इंग्रजी असणारे 93.97 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचवेळी नियमित मराठी बोलणारी मुले मराठीतच ढेपाळली आहेत. मातृभाषा मराठी असणारे फारच मागे आहेत. त्या तुलनेत दुसरी किंवा तिसरी भाषा म्हणून मराठी विषय निवडणारे 82.45 टक्के विद्यार्थी मराठीत उत्तीर्ण झाले आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता "दहावीतील बच्चे, मराठीत कच्चे' म्हणण्याची वेळ आली आहे.
 
पूर्व विदर्भातील मराठी भाषेत हिंदी शब्दांचा बोलबाला आहे. मराठी बोलताना सर्रास हिंदी शब्दांचा वापर केला जातो. हिंदीचा टक्काही इंग्रजीपेक्षा कमीच आहे. पहिली भाषा हिंदी असणारे 77.59 टक्के विद्यार्थीच उत्तीर्ण झाले आहेत. उर्दू भाषेचा निकाल मात्र इंग्रजीच्याही पुढे 99.93 टक्के एवढा आहे. पाली, बंगाली, तेलुगू भाषा विषय निवडणारे शंभर टक्के विद्यार्थी या विषयात उत्तीर्ण झाले आहेत. 

भाषावार निकाल असा 
विषय विद्यार्थी संख्या उत्तीर्ण विद्यार्थी प्रमाण (टक्के) 
मराठी  (पहिली भाषा) 1,25,562 82,003 65.30 
इंग्रजी  (पहिली भाषा) 20,171 18,956 93.97 
हिंदी    (पहिली भाषा) 13,632 10,578 77.59 
मराठी  (दुसरी/ तिसरी) 33,486 27,610 82.45 
इंग्रजी   (दुसरी/ तिसरी) 1,42,091 1,02,929 72.43 
हिंदी     (दुसरी/ तिसरी) 1,22705 92,773 75.60

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News