पर्यटकांची रेलचेल असलेलं ना'गाव'

अभय आपटे
Friday, 8 March 2019

अलिबाग शहरापासून सुमारे आठ कि.मी.अंतरावर असलेले नागाव हे अष्टागारातील एक गाव. या गावाचे मूळ नाव नामग्राम असावे, असे इतिहासात सांगितल्याचे आढळते. हे प्राचीन गाव सध्या पर्यटन व्यवसायामुळे सातासमुद्रापार पोहोचले आहे.

शांत आणि सुरक्षित किनारा; जणु काही आकाशासमवेत स्पर्धा करत आहेत, असा भास होणाऱ्या नारळी-सुपारीच्या बागा, किनारी पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले सुरूचे बन, शिवकालीन नागेश्वर, भिमेश्वर, वंखनाथ मंदिरे; तसेच छोटे-मोठे तलाव या पार्श्वभूमीवर बारमाही पर्यटकांची रेलचेल असलेले नागाव पर्यटनाचे केंद्र बनले आहे. या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. जवळ जवळ नागाव बंदर भागात जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेश केला की दुतर्फा फक्त कॉटेज, रिसॉर्ट, घरगुती खानावळी अशा फलकांची भाऊगर्दी पाहायला मिळते. येथील स्थानिकांनी टिपिकल कोकणी पद्धतीचे भोजन पर्यटकाला देण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला दिसतो. पर्यटक ज्या वेळी किनाऱ्यावर पोहोचतो, त्या वेळी त्याला धकाधकीच्या जीवनातून शांतता वाटते. घोंगावणारा वारा व पाण्याच्या लाटा यामुळे पर्यटकाचे पाय तिथून निघतच नाहीत. एकदा आलेला पर्यटक तिथे पुन्हा येतोच. पण अन्य जणांचे नागावकडे लक्ष वेधतो. दररोज वाढत चाललेल्या दळणवळणाच्या सोई-सुविधांमुळे मुंबई व पुणे परिसरात अनेकांना हाकेच्या अंतरावर असलेलं नागाव पर्यटकांच्या पसंतीचे गाव ठरले आहे, यात शंका नाही.

re>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News