आईची प्रेमळ मिठी

​दिपक सुमन पंडित साटोटे
Tuesday, 12 February 2019

आजची आईची प्रेमळ
मिठी खोल रुजली मनात,
कशी ही अदभूत मानवी
शक्ती गं आई तुझ्या रुपात ।।

तुझाच,
दिपक सुमन पंडित साटोटे

जिच्या कुशीत जन्म घेऊन आज लहानाचा मोठा झालो, तिच्या समोर बायकोची मिठी थोडी फिकट राहीलच ना..
तिच्या मिठीत जगण्याचं विश्व दडलेलं असतं आणि ते विश्व, आई आपल्या खडतर जीवनात ओतत असते. म्हणून संकटांना सामोरे जातांना आई हा शब्द साहजिकच ओठांवर येत असतो. त्यामुळे आयुष्य जगतांना आईचं इंगित कळण्याइतकं सोप्प नाही. तिची ममता अपरंपार आहे.  जेंव्हा लहान असतांना रडायचो तेंव्हा हीच मिठी शांत करण्याचं अविश्वसनीय औषध आहे, तर का नाही आवडणार आईची प्रेमळ मिठी?

जेंव्हा दुःखाचा डोंगर आपल्यावर येतो तेंव्हा साधा तिचा हातही डोक्यावर फिरला तरी, सुखाचा पदर फिरल्यासारखं वाटतं. मग ही तर मिठी आहे, ज्या उदरानं आपण हे जग पाहतोय आणि ज्या शरिराच्या उबेनं आपली थंडी गायब व्हायची आणि निवांत झोप येण्यासाठी ह्या मिठीचा आस्वाद घ्यावा लागायचा तर, तिची मिठी किती अप्रतिम असेल हे आज मोठं झाल्यावर कळतंय.

आपल्या बालपणी, तिच्या इतकी काळजी घेण्याची किमया आज पुस्तकात वाचायला मिळतेय तिला ( kangaroo mother Care) म्हणतो, त्या माय माऊलीचा तो स्पर्श जीवनाची कितीतरी दारं उघडतो आणि आपण तिच्या मायेतच निजून जातो. कपाळावरचा प्रितीचा तळहात आणि माझ्या राजाला ताप तर नाही ना? या शंकेनं हुरहूर करणारी माऊली, तिची ओंजळ किती पवित्र असेल हो? तिचा तो मायेचा आशीर्वाद आणि अजून बरेच काही आपल्याला नकळत तिच्या पावन स्पर्शानं लाभत असतो, मग मिठी तर हक्काची आहे ना!

बाळ जेंव्हा काही दिवस घराबाहेर गेलेलं असतं, तेंव्हा तिची काळजी पोटीची तळमळ तिच्याशिवाय कोणाला कळत नाही; पण जेंव्हा पोरगं डोळ्यासमोर येतं, तेंव्हाची तीची मिठी अश्रूंनी भरलेली दिसते आणि हीच त्या आईच्या प्रेमाची प्रचिती असते, म्हणून एवढी ताकदीची प्रेमळ मिठी आई शिवाय कोण देईल का हो? नाही ना!

म्हणून आज पुन्हा हा योग आला; पण याला hug dayचं औचित्य समजावं, असं मला मंजूर नाही, कारण आईच्या प्रेमाला एक दिवस अपुरा आहे त्यामुळे आज तिच्या प्रेमळ मिठीत तिने सामावून घेतले. खडतर आयुष्यातील मायेचा पदर आणि मायेची ममता पांझरवणारी ही माऊली, आज पुन्हा देवाच्या रुपात दिसली आणि तिच्या मिठीत पुन्हा एकदा सुंदर विश्वाचं दर्शन देऊन गेली. मायेचा अथांग महासागर असलेली माय, तिच्या स्पर्शाने जगण्याची तरतरी आणि आशीर्वादाने प्रयत्नांचा डोंगर धावताना तिची शक्ती रक्तात मिसळत होती. अशा प्रकारे तिची मायेच्या प्रेमळ मिठीचं स्वरूप जगण्याचं कोडं बनून जातं. 

मिठी म्हटलं की, दोन जीवांची घट्ट गाठभेट; पण आईच्या बाबतीत गाठभेट नसून प्रेमळ भेट असते. जी साऱ्यावर सहज विजय मिळवते. जर आशा आईच्या मिठीत आपलं विश्व फुलतंय म्हणाल तर, अभिमान राहीलच ना! मग हीच प्रेमळ मिठी पुन्हापुन्हा अनुभवायला नक्कीच आवडेल, कारण त्यात जगण्याचं सार आहे, अमृताच दार आहे.

आजची आईची प्रेमळ
मिठी खोल रुजली मनात,
कशी ही अदभूत मानवी
शक्ती गं आई तुझ्या रुपात ।।आज येता येतं मन तिच्या विश्वात दडलं होत, तिचा तो शब्द माझ्या काजळीचा सूर होता. तिच्या या मिठीचा लयजोर होता, न विसरण्यासारखा त्या माऊलीचा तो मायेचा पाऊस होता. म्हणून आईची प्रेमळ मिठी माझ्या स्मरणात राहील. मिळाली संधी, तर जगताना आई तुझी प्रेमळ मिठी अनुभवत राहीन. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News