"माझा पीएचडी चा प्रवास"

श्रीमंत कोकाटे, पुणे
Thursday, 27 August 2020
  • भांडारकर प्रकरणानंतर कोल्हापुरातील शिवाजी पेठेत माजी महापौर भिकशेठआण्णा पाटील यांनी शिवचरित्रावर माझे व्याख्यान आयोजित केले होते.
  • कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे मार्गदर्शक नामवंत इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार सर यांच्या घरी गेलो असता त्यांच्या पत्नी सौ. वसुधा पवार यांनी मला अत्यंत हक्काने सांगितले की, "श्रीमंत तुम्ही आता लवकर पीएचडी करा" परंतु व्याख्याने, संशोधन, लेखन, विविध विषयावरचा लढा यामुळे पीएचडी कडे दुर्लक्ष झाले.

भांडारकर प्रकरणानंतर कोल्हापुरातील शिवाजी पेठेत माजी महापौर भिकशेठआण्णा पाटील यांनी शिवचरित्रावर माझे व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे मार्गदर्शक नामवंत इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार सर यांच्या घरी गेलो असता त्यांच्या पत्नी सौ. वसुधा पवार यांनी मला अत्यंत हक्काने सांगितले की, "श्रीमंत तुम्ही आता लवकर पीएचडी करा" परंतु व्याख्याने, संशोधन, लेखन, विविध विषयावरचा लढा यामुळे पीएचडी कडे दुर्लक्ष झाले.

दरम्यानच्या काळात नामवंत इंजिनियर इतिहास अभ्यासक चंद्रशेखर शिखरे यांनी पीएचडी करण्याचा आग्रह धरला. परंतु पीएचडीसाठी पेट (पीएचडी एंट्रन्स टेस्ट) परीक्षा देणे अत्यावश्यक होते. पेटच्या जाहिरातीची आम्ही वाट पाहत होतो. दरम्यानच्या काळात पेटची पहिली जाहिरात *कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव* येथील आली. शिखरे साहेबांच्या आग्रहावरुन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पेट परीक्षा दिली. त्या परीक्षेतील इतिहास विषयात मी विद्यापीठात पहिला आलो. असे तेथील प्रशासनाने फोनवरुन कळविले आणि याच विद्यापीठात प्रवेश घ्यावा असा त्यांनी आग्रह केला.

चंद्रशेखर शिखरे आणि आम्ही एकत्र बसून पीएचडी चा विषय निश्चित केला. छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रावर प्रचंड प्रभाव आहे. शिवचरित्राचे अनेक अंगाने लेखन झालेले आहे. विविध विचार धारांचा प्रभाव शिवचरित्रावर आहे. त्यामागे काही कारणे आहेत. ऐतिहासिक सत्याची मोडतोड करुन शिवचरित्र आपापल्या सोयीनुसार लिहिले गेले आहे. याचा परिणाम जनमानसावर झालेला आहे. हे गृहीतक धरून "प्रमुख शिवचरित्र लेखनातील विविध विचारप्रवाह यांचा चिकित्सक अभ्यास" या विषयावर पीएचडी करण्याचे निश्चित केले. तसा सीनोपसिस तयार केला. ही शिवचरित्रावरील महाराष्ट्रातील पहिली पीएचडी आहे. 

विद्यापीठाच्या कमिटीने विषयाला मंजुरी दिली. सदर विषयासाठी डॉ. पी. डी. जगताप हे गाईड (संशोधक मार्गदर्शक) म्हणून लाभले. आज मी जो पीएचडी झालेलो आहे, त्याचे मोलाचे श्रेय डॉ. पी. डी. जगतापसर यांना जाते. कारण त्यांनी माझ्याकडून अक्षरशः कडक शिस्तीने काम करून घेतले. अत्यंत दुर्मिळ ग्रंथ डॉ. जगताप सर यांनी उपलब्ध करु न दिलेत. इतिहास संशोधन क्षेत्रातील महत्वपूर्ण आर्टिकल्स दिली. ज्या ज्या वेळेस मी जळगावला जात असे, त्या त्या वेळेस संशोधनासाठी चंद्रशेखर शिखरे साहेब इंजिनीयर, व्ही. एम. बापू पाटील, राजेश मोरे, रामदादा पवार, हिरेश कदम, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, सुमित पाटील, राजेश पाटील, प्रा. देवेंद्र इंगळे सर, खुशालआप्पा चव्हाण, डॉ. ज्ञानदेव नीलवर्ण, डॉ. समाधान सुरडकर सर, राजेश ठाकरे, दुर्योधन साळुंखे, डॉ. प्रमोद पवार, प्रा. विश्वास वळवी, डॉ. किशोर पवार, किरण बागुल यांनी खूप मोलाची मदत केली. 

माझ्या पीएचडी च्या कामासाठी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील, डॉ. मेश्राम सर, डॉ. बी. पी. पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. माझे पीएचडी चे सहअध्यायी महाजन सर, प्रा. लीलाधर पाटील, डॉ. विलास पाटील, डॉ. सतीश निकम, प्रा. आबासाहेब देशमुख यांनी मोलाची मदत केली.

विविध विचार प्रवाह, शिवचरित्राची मांडणी आणि ऐतिहासिक तथ्य याबाबत प्राच्यविद्यापंडित शरद पाटील, पुरातत्वज्ञ डॉ. वसंत शिंदे, नामवंत इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, धर्मशास्त्र इतिहास आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे सर, व्यवसायाने इंजिनीयर परंतु इतिहास, पुरातत्वशास्त्र, धर्मशास्त्र, तत्वज्ञान, प्राच्यविद्या आणि व्युत्पत्ती शास्त्राचे अभ्यासक राजकुमार घोगरे, इतिहास अभ्यासिका डॉ. श्रद्धा कुंभोजकर, प्रा. बाबासाहेब दूधभाते सर, इतिहास, प्राच्यविद्या आणि साहित्य यांचे अभ्यासक प्रा. देवेंद्र इंगळे सर, विविध शाखांचे अभ्यासक डॉ. दिलीप चव्हाण सर, इतिहासतज्ञ डॉ. राधिका शेषन, पुरातत्वशास्त्र, इतिहास, प्राच्यविद्या, मूर्तिशास्त्र आणि एपिग्रफीचे अभ्यासक प्रा. गोपाळ जोगे सर यांचेशी केलेल्या चर्चेतून मोलाचे मार्गदर्शन मिळाले. 

महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ व संदर्भ उपलब्ध करून देण्यासाठी डेक्कन कॉलेजचे ग्रंथपाल डॉ. तृप्ती मोरे, धनंजय सुरवसे, डॉ. शिगवण सर, सोमय्या कॉलेज संस्कृती पीठमच्या प्रा. डॉ. ललिता नामजोशी मॅडम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ग्रंथपाल, फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रकाश पवार सर, शिवाजी विद्यापीठातील सचिन घोरपडे व ग्रंथालय तसेच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी मोलाची मदत केली. इंग्रजी भाषातज्ञ प्रा. दिलीप चव्हाण यांनी सीनोपसिसचा दर्जेदार इंग्रजी अनुवाद करुन दिला.

इतिहासलेखन पद्धतीसाठी इतिहास अभ्यासक लोकप्रिय प्रा. डॉ. राजेश करपे सर, प्राचार्य डॉक्टर झेड. ए. पठाण सर, अर्थशास्त्रज्ञ डॉ. संतोष कदम, पुरातत्त्वज्ञ अरविंद आसबे यांचे मार्गदर्शन लाभले. 

सामाजिक प्रबोधन, व्याख्याने, रस्त्यावरची लढाई, सांस्कृतिक संघर्ष करत असतानाच पीएचडी चे काम चालू होते. एसटी, रेल्वे, विमान, चारचाकी प्रवासात वाचन करायचे आणि रात्री रेस्ट हाऊसला / घरी लेखन करायचे असा पीएचडी चा प्रवास चालू होता. परिवर्तनाच्या लढाईमुळे दोन वेळा मुदतवाढ घ्यावी लागली. पण कधीही नैराश्य येऊ दिले नाही. सतत नवीन समजून घेण्याचा ध्यास असावा असे मला वाटते. विद्यापीठ प्रशासनाने खूप सहकार्य केले.

प्रबंध लेखनाचे काम सुरु असताना अनेक वेळा गाईड डॉ. जगताप सरांकडे जावे लागत असे. सरांनी विनाविलंब सर्व प्रकरण तपासून दिली. उशीर झाला तर रात्रीचा प्रवास सरांनी करु दिला नाही. अनेक वेळा सरांकडेच जेवण आणि मुक्काम केला. डॉ. पी. डी. जगताप सर म्हणजे निस्वार्थी, माणुसकीचे आणि सतत विद्यार्थ्यांची पीएचडी पूर्ण होण्यासाठी काळजी घेणारे संशोधक मार्गदर्शक आहेत. सर पुण्याला आले की, त्यांच्या मुलाच्या घरी मला बोलावून घेत व प्रबंध तपासून देत, जेणेकरून माझा औरंगाबाद / जळगावचा प्रवास वाचावा. डॉ. पी. डी. जगताप सरांना मी अनेक वेळा घरी येण्याचा आग्रह केला, परंतु जोपर्यंत पीएचडी पूर्ण होणार नाही, तोपर्यंत मी तुमच्या घरी पाणीही घेणार नाही असा त्यांनी संकल्पच केलेला आहे. आता ते येतील अशी आशा आहे. 

जेव्हा मी फायनल थेसिसवर सही आणण्यासाठी जळगावला गेलो, तेव्हा जगताप सरांनी माझ्या हातात ६५० रुपये ठेवले, तेव्हा मी सरांना म्हणालो "हे पैसे कशाचे?" तेव्हा सर म्हणाले "हे पैसे प्रथमतः खिशात ठेवा" मी आग्रह धरला कशाचे आहेत ते सांगा, तेव्हा सर म्हणाले "मी एकदा पुण्याला आलो असता शिवाजीनगर बस स्टँड वरती पुणे-औरंगाबाद शिवनेरीचे तिकीट काढून दिले होते त्याचे हे पैसे. मी त्या ठिकाणी तिकिटाचे पैसे दिले असते तर तुम्ही घेतले नसते आणि स्टॅन्ड वरती ते तुमच्या मित्रासमोर बरे दिसले नसते. म्हणून मी आता दिले आहेत. मी सरांना ते परत देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सर म्हणाले "तुम्ही पैसे नाही घेतले तर मी सही करणार नाही" मी जेव्हा साडेसहाशे रुपये परत घेतले, तेव्हाच जगताप सरांनी थेसीसवर सही केली. असे निस्वार्थी व विद्यार्थ्यांचे हित जोपासणारे देखील डॉ. जगताप सरांसारखे गाईड आहेत आणि म्हणून मला माझ्या गाईडचा खूप खूप अभिमान वाटतो. विद्यार्थ्यांना मदत करुन खाऊ पिऊ घालून पीएचडी चे काम पूर्ण करुन घेणारे डॉ. जगताप सर आहेत.

प्रबंधाचे लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याचे टायपिंग उल्हास सोनवणे यांनी न थकता केले. मुद्रित शोधन नितीन बांदल यांनी केले. प्रबंधाची बांधणी सरदारजी यांनी केली. या सर्व कामासाठी माझे जिवलग मित्र सुप्रसिद्ध वक्ते प्रा. औदुंबर लोंढे सर, सुप्रसिद्ध वक्ते प्रा. सोमनाथ गोडसे सर, प्रा. रवींद्र शिंदे सर, ईश्वर ढमढेरे, संजयसिंह शिरोळे यांनी अविस्मरणीय मदत केली. पीएचडी चे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी मुख्याध्यापक गुजर सर, मिरगणे सर आणि सहकारी शिक्षक मोतीराम शिंदे सर, देशमुख मॅडम, शामा पाटील मॅडम आणि महादेव वाघमोडे सर यांनी शैक्षणिक कार्यात मोठा आधार दिला.

माझी पीएचडी लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी अभ्यासक आमचे मार्गदर्शक प्रतापराव बोर्डे साहेब, पुरुषोत्तम खेडेकर साहेब, प्राचार्य डॉ. बी. एन. पवार सर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, गिरिप्रेमी ग्रुपचे प्रमुख रविदादा ढमढेरे, लहुजी लांडगे, शेकापचे नेते आणि राष्ट्र सेवा समूहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, इतिहासतज्ञ प्रा. विलास खरात, अरण्येश्वर अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शोभा कागदे मॅडम, प्रा. डॉ. सारिका बहिरट मॅडम, मारुती भोसले, विठ्ठल जाधव यांचा खूप आग्रह होता.

पीएचडी च्या फायनल ऑनलाइन व्हायवासाठी डॉ. माहुलीकर सर, डॉ. तळेले सर, डॉ. सुनील अमृतकर सर, डॉ. गजानन राशिनकर सर, डॉ. संगीता मेश्राम मॅडम, चाळीसगावचे प्रा. गवारे सर, डॉ. प्रशांत अनभुले सर यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. फायनल व्हायवाच्या आदल्या रात्री माझे गाईड डॉ. पी. डी. जगताप यांचे ज्येष्ठ बंधू हिम्मतराव जगताप यांचे निधन झाले, ते दुःख बाजूला सारुन जगताप सर व्हायवासाठी ऑनलाईन आले. पण व्हायवा त्यांनी रद्द करु दिली नाही. या सर्व संशोधन कार्यात पत्नी अनुराधा आणि मुले दिग्विजय, सयाजी यांनी हसत खेळत मोलाची साथ दिली. आई वडील नर्मदाबाई आणि शिवाजी कोकाटे यांच्या कष्टामुळे आज मी घडलो.

संशोधन कार्यासाठी नेहमीच गणेश भरेकर, रावसाहेब मिरगणे साहेब, सुनीलबप्पा मोरे, लक्ष्मण पासलकर, प्रा. दीपक पाटील, इंजि. विलास देशमुख, विजय पाटील, एपीआय रोहित चौधरी, चंद्रकांत पाटील, प्रशांत पाटील, प्रशांत धुमाळ, हिंदुराव पाटील, राहुल शिरोळे, तुषार जाधव, मुबारक फरास साहेब, बंधू अतुल कोकाटे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात.

पीएचडी च्या कामानिमित्त जळगावला जाण्यासाठी रेल्वे अधिकारी विजयसिंह दडस साहेब, रमेश शिंदे, विजय वाठोरे, महेश धस यांनी अनेक वेळा ऐनवेळेस रेल्वे रिझर्वेशन उपलब्ध करून दिले. जीवाला जीव देणारे ड्राइवर दस्तगीर, अमोल, विकी आणि सर्व पोलीस अंगरक्षक अंकुश घोंगे, बाळासाहेब ढाकणे साहेब, काथे साहेब, मुरहे साहेब, चपटे साहेब, केदार साहेब, संतोष भांदिगरे, जाधव साहेब, बायस, भोसले, रणदिवे, घाटगे, सागर गलांडे, दयानंद गायकवाड, अमित भिलारे, भेलके, नवनाथ जाधव इत्यादींनी अत्यंत आनंदाने साथ दिली. संशोधन काळात पुणे शहर पोलिसांनी धमक्या देणाऱ्या प्रतिगाम्यांचा बंदोबस्त केला, विशेषतः कर्तृत्ववान पोलीस अधिकारी पीआय राजेंद्र मोकाशी साहेब व त्यांच्या टीमने धमक्या देणारांना तात्काळ पकडून त्यांचावर कारवाई केली. पोलिसांच्या सहकार्यामुळे मी हे कार्य निर्धोकपणे करु शकलो.

पीएचडी च्या कामासाठी मदत करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, हितचिंतक, मित्रमंडळीचे खूप खूप आभार आणि पीएचडी प्रदान झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटून, फोनवरून, सोशल मीडियातून अभिनंदनाचा वर्षाव केला व भविष्यकाळातील कामकाजासाठी सदिच्छारुपी बळ दिले, त्या सर्वांचे खूप खूप आभार!

असा आहे माझा पीएचडी चा प्रवास!

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News