...आणि मला 'ती'च्या मुळे हा लेख लिहावा वाटला

संदेश थोरवे
Saturday, 26 September 2020

माझा आणि जपानी भाषेचा कुठे ना कुठे संबंध येतोच. टीव्हीवर आणि मोबाईलवर बातम्या वाचत असलो की, त्यात जपानची बातमी येतेच. त्यात माझा लहान भाऊ 'शिनचॅन' कार्टून पाहतो. त्यातही जपानी भाषा आहे.

...आणि मला 'ती'च्या मुळे हा लेख लिहावा वाटला

माझा आणि जपानी भाषेचा संबंध १९ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झालाय. वाचनाची थोडीफार आवड असल्यामुळे सोशल मीडिया आणि बऱ्याच व्यक्तींकडून जपानी पुस्तक 'तोत्तोचान' विषयी खूपच ऐकले होते. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद झाला होता. लगेच मी ते पुस्तक विकत घेतले. पण वाचण्याचा योग काही लवकर आलाच नाही. त्यानंतर काही दिवसांनी १९ ऑगस्टला वृत्तपत्रात छापून आलेल्या 'तोत्तोचान' पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहिले. दुसऱ्याच दिवशी त्या पुस्तकाच्या अनुवादिका चेतना सरदेशमुख-गोसावी यांची मुलाखत स प महाविद्यालयात सकाळी ११ वाजता होती. पण मी ते पुस्तकच वाचल नव्हतं. मग मी ते पुस्तक वाचण्याच ठरवलं. पुस्तकाचे ४१ पान वाचले, पण खूपच झोप आल्यामुळे मी झोपी गेलो. मध्यरात्री एकच्या दरम्यान अचानक जाग आली. मग पाणी प्यायलो आणि मग उरलेले पुस्तक मी वाचले.

दुसऱ्या दिवशी कॉलेजचा तास बुडवून मुलाखतीला गेलो. मुलाखत खूपच चांगली झाली. त्यानंतर मी त्यांना भेटून पुस्तकाविषयीचा आनंद व्यक्त केला. तिथे त्यांचे अजून एक नवीन पुस्तक विक्रीस होते. मी ते लगेचच खरेदी केले. काही दिवस उलटल्यानंतर मी आणि माझा अभियांत्रिकीचा मित्र रविराज, आम्ही एखादी परदेशी भाषा शिकावी, असं ठरवलं. त्यानंतर एके दिवशी रविराजचा फोन आला. तो म्हणाला, "मी आणि व्यंकटेश डेक्कनला आलोय. आपण सिम्बॉयसिसला परदेशी भाषेविषयी चौकशी करायला जाऊ." मी त्याला बोललो,"ठीक आहे, मी कॉलेजचे तास संपल्यावर येतो." मग दुपारी साडेतीनच्या सुमारास मी सिम्बॉयसिसजवळ पोहोचलो.

रविराज आणि व्यंकटेश हे आधीच चौकशी करून आले होते. मग त्यांनी मला एक पत्रक दिलं आणि माहिती सांगितली. तेव्हा मी म्हणलं पाहू आपण कसं शिकायला जमतंय ते. त्यानंतर आम्ही तिघे तिथे जवळच नाष्टा करायला गेलो. खाता खाता मस्त गप्पा मारत होतो.. खरंतर मी तेव्हा कोणती परदेशी भाषा शिकावं, हे ठरवलंच नव्हतं. त्यानंतर कॉलेजच्या गडबडीत मी हा विषयच विसरून गेलो. पुन्हा बरेचसे दिवस उलटले.

आता आपल्याकडे टाळेबंदी होण्याच्या बरोबर एक दिवस आधी आम्ही सर्व गावाला म्हणजेच जुन्नरला गेलो. गावाला निवांत असल्यामुळे माझ्या मनात पुन्हा परदेशी भाषेचा विषय घोळू लागला. एक दिवस सकाळ पेपर वाचत असताना त्यात 'जपान आणि संधी' हे सदर वाचलं. जपानी आणि मराठी भाषेत खूपच साम्य आहे, असंही माझ्या वाचनात आले, हे वाचून खूपच आनंद झाला. त्यानंतर एका सदरात स्वामी विवेकानंदांनी जपानविषयी लिहिलेले एक वाक्य वाचल. त्यांनी असं लिहिलं होतं की, "प्रत्येक भारतीय युवकाने एकदा तरी जपानला जरूर भेट द्यावी. जपानची शिस्तप्रियता, स्वच्छता आणि जपानी माणसांचे देशप्रेम या गोष्टी मला खूपच भावल्या आहे." हे वाचून तर मला अजूनच प्रेरणा मिळाली.

मी जपानी भाषा शिकण्याचे ठरवले. पण सुरवात कशी करावी, हे काही समजेना. मग मी इंटरनेटवर माहिती पाहू लागलो. त्यात अस आढळलं की, जपानी ही जगातील सर्वात कठीण भाषांपैकी एक आहे. ती भाषा पाहिली. सर्व चित्रलिपीच होती. त्यात त्या अक्षरांचा काहीच ताळमेळ लागेना. पण तरीही मी ती भाषा शिकायची ठरवली. पण शिकायची कशी हा प्रश्न पडला. मग पाटी पेन्सिलवर त्याचा सराव करण्याचे ठरवले. पण पाटी पेन्सिल नव्हती. मग आई बोलली,"कदाचित आयुषकडे (मामाचा मुलगा) पाटी असेल." आईने फोन करून विचारले तर मामा बोलला की, पाटी आहे. मग बाबांनी जाऊन पाटी आणि पेन्सिल आणली. पण ती पाटी खूपच जुनी असल्याने त्यावर पेन्सिलने नीट अक्षरच उठत नव्हते. मग बाबांनी मला नवी कोरी पाटी आणि पेन्सिल आणून दिली.

मोबाईलमध्ये काही अ‌ॅप घेतले, त्यातून मी रोज पाच अक्षरं घेऊन पाटीवर सराव करायचो. त्यानंतर मला आठवले की, माझ्याकडे 'तोत्तोचान' पुस्तकाच्या अनुवादिका चेतना सरदेशमुख-गोसावी यांचा मोबाईल नंबर आहे. लगेच त्यांना फोन केला आणि मी जपानी भाषा कसं शिकतोय याबाबत त्यांना माहिती दिली. चेतना ताई बोलल्या की, "चांगलं आहे. तू लिहायचा आणि बोलायचा सराव करत राहा." मग दीड महिना रोज सराव केला आणि दोन्ही लिपी बऱ्यापैकी यायला लागल्या.

त्यानंतर २४ मे रोजी पुण्याला आलो. जपानीचा सराव चालूच होता. त्यातच एक दिवस इंटरनेटवरून 'हिकारी सेंटर फॉर जापनीज लँग्वेज' विषयी माहिती मिळाली. चैत्रालीताई पानसे या जपानी भाषा मराठीतून शिकवत होत्या. हे पाहून मला आनंदाचा धक्काच बसला. कारण मी कधी विचारही केला नव्हता की, कुणी मराठीतूनही जपानी भाषा शिकवत असेल.

चैत्रालीताई पानसे यांची यु ट्यूब वाहिनी आहे, त्यात ते मराठीतून जपानी भाषा शिकवतात. हाच माझा जपानी भाषा शिकण्याचा मैलाचा दगड ठरला. त्यांच्या यु ट्यूब वाहिनीमुळे मला जपानी शिकायला खूपच मोठी मदत होत आहे. त्यानंतर एकदा मी आणि वर्गमित्र आदित्य आम्ही व्हाॅट्सअ‌ॅपवर बोलत होतो. त्याला मी जपानी भाषा शिकतोय, याबद्दल सांगितलं. त्यावर तो बोलला की,"आता आईला जपानी सून आण." हे वाचून मी खूपच हसत होतो. त्यानंतर आता दोन आठवड्यांपूर्वी इचलकरंजीचे मित्र आकाश यांनी त्याचा व्हाॅट्सअ‌ॅपचा डीपी जपानी भाषेत ठेवला होता. मग मी त्यांना त्याबद्दल विचारले तर ते बोलले की, माझे दोन मित्र जपानी आहे. त्यांनी मला प्रवीण यांडे या मित्राविषयी माहिती दिली. ते मूळचे पुण्याचेच आहे, पण ते जपानला स्थलांतरित झाले आहे. त्यांना मी फेसबुकवर संपर्क साधला. त्यांनी एक खूपच छान उत्तर दिले. ते म्हणाले,"मी आतापर्यंत जपानी भाषा स्वयंसाधनेतून शिकत आलो आहे." खरतर प्रवीणने दिलेलं हे उत्तर नवीन काही शिकू पाहणाऱ्या प्रत्येकालाच लागू पडत.

माझा आणि जपानी भाषेचा कुठे ना कुठे संबंध येतोच. टीव्हीवर आणि मोबाईलवर बातम्या वाचत असलो की, त्यात जपानची बातमी येतेच. त्यात माझा लहान भाऊ 'शिनचॅन' कार्टून पाहतो. त्यातही जपानी भाषा आहे. मी ते वाचण्याचा प्रयत्न करतो, पण ते लगेच जातं. आज सकाळी एक घटना घडली. रोज सकाळी पावणे सहा वाजता मी आणि आई चालायला जातो. तिथे स्पाईन सर्कलला आम्ही दोघे बसलो होतो. अचानक तिथे मला एक जपानी मुलगी जॉगिंग करताना दिसली. मग मी जपानी भाषेचा प्रवास आठवू लागलो. तेव्हा माझ्या ध्यानात आलं की, मी याचा लेख लिहायला पाहिजे. त्यामुळे हा भलामोठा लेखप्रपंच तुमच्यासमोर मांडला. याबद्दल मी त्या अनोळखी जपानी मुलीचे मनापासून धन्यवाद मानतो.

- संदेश थोरवे

मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय, संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभाग

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News