'या' जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाकडून मदत जाहीर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाने मदत जाहीर केली आहे.

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 15 महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठाने मदत जाहीर केली आहे. विद्यापीठाच्या आपत्ती व्यवस्थापन निधीतून या महाविद्यालयांना 56 लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेच्या शुक्रवारी (ता.24) झालेल्या बैठकीत याबाबत ठराव करण्यात आला.
3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण विभागातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या महाविद्यालयांना मदत करण्यासाठी सिनेट सदस्य व अधिकाऱ्यांनी भेट देऊन अहवाल तयार केला. त्याअनुषंगाने महाविद्यालयांच्या नुकसान भरपाईबाबत निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक डॉ. सुधीर पुराणिक आणि कोकण विभागीय सहसंचालक डॉ. संजय जगताप यांनी महाविद्यालयांना दिलेल्या प्रत्यक्ष भेटीतून व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांनी एकत्रित केलेल्या माहितीवरून महाविद्यालयांचे इमारतीचे पत्रे, इलेक्‍ट्रिक वायरिंग, इलेक्‍ट्रिक व इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे यांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन समितीने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील सुमारे 15 महाविद्यालयांना 56 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

 या 15 महाविद्यालयांना मिळाली मदत

 •  लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, मंडणगड - 7 लाख रुपये
 •  विश्‍वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आंबडवे मॉडेल महाविद्यालय - 7 लाख
 •  टिकमभाई मेहता वाणिज्य महाविद्यालय माणगाव - 7 लाख
 •  दोशी वकील कला, गोरेगाव कॉ-ऑपरेटिव्ह अर्बन बॅंक विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गोरेगाव - 7 लाख
 • एन. के. वराडकर कला व आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालय, दापोली- 4 लाख
 • दापोली अर्बन बॅंक वरिष्ठ विज्ञान महाविद्यालय दापोली- 4 लाख
 •  माणगाव शिक्षण प्रसारक संस्थेचे कला, विज्ञान महाविद्यालय, माणगाव- 4 लाख- जी. बी. तथा तात्यासाहेब खरे वाणिज्य, पी. जी. ढेरे कला व एम. जी. भोसले विज्ञान महाविद्यालय, गुहागर- 2 लाख
 • गोखले शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय श्रीवर्धन- 2 लाख
 •  वसंतराव नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, म्हसळा, रायगड - 2 लाख
 • द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय, तळा, रायगड- 2 लाख
 •  जी. एम. वेदक विज्ञान महाविद्यालय तळा - 2 लाख
 •  डॉ. सी. डी. देशमुख वाणिज्य महाविद्यालय, सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालय, रोहा - 2 लाख
 • शेठ ज. नौ. पालीवाला महाविद्यालय पाली- 2 लाख
 •  अंजुमन इस्लाम वाणिज्य महाविद्यालय, श्रीवर्धन- 2
   
निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात सापडलेल्या महाविद्यालयांना तातडीने मदत देण्याची मागणी कुलगुरूंकडे केली होती. या मागणीची दखल घेत मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कॉन्सिलच्या बैठकीत महाविद्यालयांसाठी आपत्कालीन निधीतून 56 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला आहे. विद्यापीठाला उशिरा का होईना जाग आली, पण हा निधी तातडीने या महाविद्यालयांना वितरित केला तरच या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या महाविद्यालयांना दिलासा मिळेल.
- सुधाकर तांबोळी
सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News