पदव्युत्तर वैद्यकीय अंतिम वर्षांच्या परीक्षांना स्थागिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • कोरोना महामारीमुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवून राज्यातील अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याची घोषणा केली होती.
  • परीक्षा न घेण्याच्या निर्णयामध्ये सर्व क्षेत्रातील अंतिम वर्षांच्या परीक्षांचा समावेश होता.

मुंबई :- कोरोना महामारीमुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास राज्य सरकारने असमर्थता दर्शवून राज्यातील अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याची घोषणा केली होती. परीक्षा न घेण्याच्या निर्णयामध्ये सर्व क्षेत्रातील अंतिम वर्षांच्या परीक्षांचा समावेश होता.  विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्तिथीत परीक्षा घेऊन त्यांचे आरोग्य धोक्यात टाकले जाऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हंटले. परंतु विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने सर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या सप्टेंबर महिन्यापर्यंत घेण्यात याव्या असे जाहीर केले. राज्य सरकारांनी यूजीसीला पत्र लिहून कोरोना काळात परीक्षा घेण्यास असमर्थ असल्याचे दर्शवले परंतु तरीही विद्यापीठ अनुदान आयोग आपल्या निर्णयावर ठाम राहिले. देशभरातील अनेक विद्यार्थी संघटना तसेच युवासेनेने यूजीसी विरोधात सर्वोच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी येणाऱ्या मंगळवारी १८ ऑगस्ट ला होणार आहे. 

यूजीसी ने दिलेल्या सूचनांप्रमाणे दंत वैद्यकीय आणि पदव्युत्तर वैद्यकीय अंतिम वर्षांच्या परीक्षा ह्या देखील सप्टेंबर महिन्यामध्ये होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच या परीक्षांसाठी वेळापत्रकही निश्चित करण्यात आलेली आहेत. परंतु कोरोनाची परिस्तिथी डोळ्यासमोर ठेऊन प्रॅक्टिकल परीक्षा न घेता लेखी परीक्षा ह्या ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थांनी केली. यासंदर्भात आकाश उदयसिंह राजपूत ह्या विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल केली असून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी प्रत्यक्ष केंद्रावर उपस्तिथ राहण्याची अट नको अशी मागणी यात केली. या याचिकेवर काल सुनावणी पारपडली.

यावेळी दंत आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षांकरीता प्रत्यक्ष उपस्तिथ राहण्याच्या मागणीवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी याचिका कर्त्यांची चांगलीच कान उघडणी केली.  तुम्ही डॉक्टर आहात, आज तुम्हीच परीक्षा देण्यासाठी बाहेर पडायला घाबरला तर उद्या रुग्णांवर उपचार कसे करणार? असा थेट सवाल विचारला. तसेच जे विद्यार्थी परीक्षा देण्याकरीता तयार आहेत अशांवरही अन्याय करता येणार नाही. तसेच परीक्षा स्थगित करण्याविषयीची सुनावणी ही सर्वोच्च न्यायालय सुरु असताना मुंबई उच्च न्यायालय विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा देणार नाही. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावरच सर्व काही स्पष्ट होईल असे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि सुरेंद्र तावडे यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी दंत आणि पदव्युत्तर वैद्यकीय अंतिम वर्षांच्या परीक्षा ह्या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News