हे खासदार म्हणतात, हेच घर पाहिजे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019
  • पसंतीच्या निवासस्थानासाठी नव्या सदस्यांची दिल्लीत भ्रमंती 

नवी दिल्ली - लोकसभेवर नव्याने निवडून आलेल्या खासदारांची सध्या राजधानीत भ्रमंती सुरू आहे ती दिल्ली किंवा आपापल्या पक्षाची मुख्यालये पाहण्यासाठी नव्हे; तर आपल्या पसंतीचे निवासस्थान मिळावे यासाठी! सध्या सुमारे अडीचशे खासदारांची निवासव्यवस्था जनपथावरील वेस्टर्न कोर्ट व राज्यांच्या सदनांमध्ये तात्पुरती करण्यात आली आहे. येत्या दोन महिन्यांत खासदारांना नवे फ्लॅट दिले जातील. लोकसभेची निवास समिती याबाबतचा निर्णय घेते. 

नवनिर्वाचित खासदारांना सामान्यतः साउथ-नॉर्थ ॲव्हेन्यू व विश्‍वंभरदास रस्त्यावरील बहुमजली इमारतींमधील आलिशान फ्लॅट दिले जातात. टाईप-५ (ए-ए, ए-बी व बी-बी) ही निवासस्थाने नव्या खासदारांना दिली जातात. ज्या खासदारांचा कार्यकाळ संपला आहे त्यांना २४ मेपासून महिनाभरात निवासस्थाने रिकामी करून देण्याच्या सूचना आहेत.

आजारपण वा इतर अत्यावश्‍यक कारणांसाठी लोकसभाध्यक्षांच्या विशेष परवानगीने हा कालावधी चार महिन्यांपर्यंत वाढवून मिळतो. मात्र मोदी सरकार निवासस्थाने रिकामी करण्याबाबत सक्त भूमिका घेते, असा २०१४ चा अनुभव आहे. 

ल्यूटन्स दिल्लीत खासदार व मंत्र्यांसाठी पाच, सहा, सात व आठ प्रकारची ५१७ निवासस्थाने आहेत. यात १५९ लहान-मोठे बंगले, ३७ ट्विन फ्लॅट, १९३ एकल फ्लॅट व बहुमजली इमारतींतील ९६ फ्लॅट्‌सचा समावेश आहे. 

बहुतेक सर्व नव्या खासदारांनी आपापल्या पसंतीचे निवासस्थान लिहून ते अर्ज लोकसभेकडे जमा केले आहेत. निवासस्थानांबाबत अनेक खासदारांच्या विशेष अपेक्षा असतात. त्यांचा दिल्लीत प्रत्यक्ष मुक्कामी राहण्याचा कालावधी जास्तीत जास्त १९० दिवस असला तरी बरेच खासदार फ्लॅट मिळण्याबाबत फार चोखंदळ असतात, असा पूर्वानुभव आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News