‘चार वर्षांत पदवी’च्या पुन्हा एकदा हालचाली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांपर्यंत घटविण्याचा वादग्रस्त निर्णय पुन्हा लादण्याच्या हालचाली मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली - पदवी अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांपर्यंत घटविण्याचा वादग्रस्त निर्णय पुन्हा लादण्याच्या हालचाली मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केल्याचे वृत्त आहे. नवीन शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आल्या आल्याच वादग्रस्त विषयांना हवा देण्याचा हा आणखी एक प्रयत्न मानला जातो. ताज्या हालचालींबाबत शिक्षणतज्ज्ञांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
प्रस्तावित चौवार्षिक पदवीपूर्व अभ्यासक्रमात (एफवाययूपी) शिक्षक प्रशिक्षणालाही मोठे महत्त्व देण्याची तरतूद आहे.

सध्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) १९८६ मध्ये लागू झाले व १९९२ मध्ये त्यात सुधारणा केल्या गेल्या. बदलत्या काळानुसार हे धोरण बदलण्याची गरज वारंवार बोलून दाखविली जाते, हा तर्क प्रस्तावित बदलामागे दिला जातो.ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. अशोक वाजपेयी यांनी ‘सकाळ’ शी बोलताना प्रस्तावित निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली. ते म्हणाले की, एक वर्ष अगोदरच बेरोजगारांची फौज तयार करण्याचा इरादा यामागे असावा. पदवीसाठीची पाच वर्षे कमी करायची, तर त्यासाठी सर्वसहमतीने, चर्चेने निर्णय झाला पाहिजे.
पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमाची सध्याची ‘दोन अधिक तीन’ ही संरचना बदलण्याचा पहिल्यांदा घाट घातला गेला २०१३ मध्ये.

यूपीए सरकारच्या त्या निर्णयाला यूजीसीचे माजी अध्यक्ष प्रा. यशपाल, यू. आर. अनंतमूर्ती, प्रा. वाजपेयी आदी नामवंतांनी कडाडून विरोध केला व दिल्लीत जोरदार निदर्शनेही झाली होती. त्यानंतर मोदी सरकारच्या काळातही दिल्ली विद्यापीठाने हा प्रयत्न रेटताच पुन्हा विरोध झाल्यावर तत्कालीन मंत्री स्मृती इराणी यांनी तो प्रकार तत्काळ बंद केला. नवीन शैक्षणिक धोरणाबाबतच्या के. कस्तुरीरंगन समितीने जो अहवाल पोखरियाल यांना सादर केला; त्यात चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या शिफारशीचाही समावेश आहे.

ही शिफारस पोखरियाल यांचे मंत्रालय स्वीकारण्याच्या मनःस्थितीत असून, तसा निर्णय होणे शक्‍य असल्याचे वृत्त आज आले. शिक्षण मंत्रालय अधिकाऱ्यांनी यावर सारवासारव करताना, कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशी व हा पूर्ण अहवाल केवळ मसुदा आहे, असे म्हटले आहे. कस्तुरीरंगन समितीने पदवीपूर्व अभ्यासक्रम चारच वर्षांचा असावा, अशी शिफारस केली आहे. सध्याच्या पाच वर्षांऐवजी हा कालावधी कमी केला, तर विद्यार्थ्यांचा वेळ वाचेल व संशोधनावर जास्त लक्ष केंद्रित करता येणे त्यांना शक्‍य होईल, असे समितीचे म्हणणे आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News