मृत्यूच्या छायेत वावरणाऱ्या मातृत्वाची बखर : 'नीरज'

डॉ. सुरेश सावंत, नांदेड
Thursday, 27 August 2020
  • निसर्ग काही दुर्दैवी मातापित्यांच्या पदरात जन्मजात दुर्धर आजाराने ग्रासलेली अल्पजीवी बालके टाकतो.
  • त्यामुळे त्यांना अपत्यप्राप्तीचा निर्भेळ आनंदही अनुभवता येत नाही.
  • उलट अशा बालकाचे संगोपन करताना, बालकाच्या मृत्यूसोबत असे दुर्दैवी मातापिता क्षणोक्षणी आपलेही मरण अनुभवत असतात.

निसर्ग काही दुर्दैवी मातापित्यांच्या पदरात जन्मजात दुर्धर आजाराने ग्रासलेली अल्पजीवी बालके टाकतो. त्यामुळे त्यांना अपत्यप्राप्तीचा निर्भेळ आनंदही अनुभवता येत नाही. उलट अशा बालकाचे संगोपन करताना, बालकाच्या मृत्यूसोबत असे दुर्दैवी मातापिता क्षणोक्षणी आपलेही मरण अनुभवत असतात. कारण मृत्यू अशा बालकाच्या सावलीत आश्रयात वावरत असल्याची दाहक जाणीव त्यांना क्षणोक्षणी छळत असते.
अशाच एका दुर्दैवी मातेची आणि तिच्या अल्पजीवी बालकाची चित्तरकथा 'नीरज' ह्या पुस्तकात साकारली आहे. सेलूच्या सौ. जयश्री विवेक सोन्नेकर यांनी ही चित्तरकथा लिहिली आहे. जयश्री सोन्नेकर ह्या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांना दोन मुले. पहिली मुलगी नेहा ही आता डॉक्टर झाली आहे. नेहाच्या पाठीवर जन्मलेला मुलगा नीरज याच्या 20 वर्षांच्या संघर्षपूर्ण जीवनाची ही कहाणी त्याच्या आईने मोठ्या हिंमतीने शब्दबद्ध केली आहे. नीरजने आपल्या 20 वर्षांच्या उण्यापुऱ्या आयुष्यात मृत्यूशी दिलेल्या संघर्षाची ही शोकात्म कहाणी आहे.

नीरजच्या जन्मानंतर त्याचे बारसे मोठ्या थाटामाटात झाले. नीरजला पाहायला आलेल्या डॉ. कामठकरांनी (मामा) बाळाला पाहून 'हा एवढ्या वेगात नेहमी श्वास घेतो का?' असा प्रश्न विचारला आणि लेखिकेची अपत्यप्राप्तीच्या आनंदाची तंद्री भंगली. तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविल्यावर बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. इथून पुढे बाळाची आणि त्याच्या आईवडिलांची जी ससेहोलपट सुरू झाली, तिची हृदय विदीर्ण करणारी हकीकत ह्या पुस्तकात आली आहे.

हैदराबादच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले, मूल लहान असल्यामुळे ऑपरेशन शक्य नाही. जन्मापासूनच दुर्धर आजार सोबत असल्यामुळे नीरजचे निरागस बालपणही कोमेजलेल्या फुलासारखे करपून गेले. त्याला एकातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसराच आजार उद्‌भवत असे. त्यामुळे त्याला मैदानावर मित्रांसोबत मुक्तपणे खेळता, बागडता येत नसे. थोडे चालले तरी धाप लागत असे. एव्हाना लेखिकेला 'आपण एका वेगळ्या अपत्याची आई आहोत', याची क्लेशकारक जाणीव झाली होती. तरीसुद्धा मातापिता नीरजच्या संगोपनात कसलीच कसर सोडत नाहीत.

एके दिवशी नीरज गंमत म्हणून गाईला ठेचा खाऊ घालतो आणि तिला तिखट लागेल या कल्पनेने आपणच अस्वस्थ होतो. इतकी संवेदनशीलता नीरजच्या ठायी होती. नीरज इतका अशक्त की शाळेत येता-जाता वाटेत चक्कर येऊन पडत असे. नाकातून रक्त वाहात असे. त्याला श्वास घेता येत नसे. म्हणून वडिलांनी घरीच ऑक्सिजन कॉन्सण्ट्रेटर आणले होते. गरज पडली की नीरज नाकाला त्याची नळी लावून प्राणवायू घेत असे. भरीस भर म्हणून त्याला 'गाऊट' नावाचा हाडांचा विकार जडला. हाडे ठिसूळ होऊ लागली.  मेंदूत रक्ताच्या गाठी व्हायला सुरुवात झाली होती. नाना आजारांनी त्याला ग्रासले होते. अनारोग्याने त्याचा आत्यंतिक छळवाद मांडला होता.

नीरजला बालपणापासून सौंदर्यदृष्टी लाभली होती. तो आपल्या कॅमेऱ्यातून निसर्गाचे सौंदर्य टिपत असे. पेन्सिलने व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रेही छान रेखाटत असे. आईच्या स्वयंपाकावर मिश्कील कोट्या करत असे. नीरज आणि कृष्णाच्या मैत्रीची कहाणी लेखिकेने छान रंगवून सांगितली आहे. नीरजचा 19 वा वाढदिवस संस्मरणीय साजरा करून नीरजच्या मित्रमैत्रिणींनी त्याला कसा सुखद धक्का दिला, याचे लेखिकेने मोठे चित्रदर्शी वर्णन केले आहे. लेखिकेने नीरजच्या उपजत विनोदबुद्धीचे काही मजेशीर किस्से कथन केले आहेत. घरातील गंभीर वातावरणातील ताण कमी करण्यासाठी तो 'जरा हटके है अपना दिल' हे गाणे म्हणून आपल्या शारीरिक कमतरतेला बगल देण्याचा प्रयत्न करत असे.

सगळ्या नातेवाईकांशी दृढ मैत्रीचे बंध तो सांभाळून होता. नीरजला काही वेदना झाल्या, की लेखिका मूक अश्रू ढाळत असे. देवाला जाब विचारत असे. नीरजला पर्यटनाची भारी आवड. नीरज 15 वर्षांचा होईपर्यंत त्याला कडेवर, पाठीवर घेऊन कुटुंबीय पर्यटन घडवत. गाणं हा तर नीरजचा श्वास होता. संगीत हा त्याच्या आवडीचा प्रांत. दर्दभरी हिंदी गाणी गुणगुणणे हा त्याचा आवडता छंद. मौज मस्ती करायच्या वयात असह्य वेदना त्याच्या वाट्याला आल्या होत्या. त्याला उपचारासाठी तीन वेळा मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले होते.

एखाद्याची हार्ट टान्स्प्लांटची बातमी वाचली, की लेखिकेच्या आशा पल्लवित होत. आई म्हणून बाळाला आपले हृदय देण्याचीही लेेेखिकेची तयारी आहे. कारण लेकराच्या वेदना तिला पाहावत नाहीत. नीरजच्या उपचारासाठी नांदेड, परभणी, अंबाजोगाई, हैदराबाद, पुट्टपर्थी अशा चकरा वारंवार होत, पण फारसा गुण येत नसे. शेवटच्या आजारात, ऐन दिवाळीत नीरजला औरंगाबादच्या माणिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नीरजच्या नाकातोंडात घातलेल्या नळ्या पाहून लेखिकेमधील आई अस्वस्थ होत असे.

कार्तिक एकादशीला नीरज वयाच्या 20 व्या वर्षी सगळ्यांना सोडून निघून जातो. त्यावेळी आई स्वत:ला एकच प्रश्न विचारते, 'अचानक आपल्या काळजाच्या तुकड्याला हिरावून घेतल्यानंतर आईच्या जीवनात उरतंच काय?' ती त्रासाची 20 वर्षे आठवली की आईचं मन रक्तबंबाळ होतं. नीरज म्हणजे संतपरंपरेतील माळेचा एक मोती होता, असं ही आई सहजच लिहून जाते. आईला नीरजविना जग उदास आणि अर्थशून्य भासते. नीरजला निसर्गानं सर्व काही दिलं होतं, पण फक्त पुरेसं आयुष्यच दिलं नव्हतं.

पुस्तकाच्या शेवटी ही आई निसर्गाकडे एकच मागणं मागते, 'माझ्यासारखी अकाली सुपुत्र हरवणारी दुर्दैवी आई कुणाला बनवू नकोस. स्वत:चा शेवटही माहीत असावा, असं शापित जगणं कुणाला देऊ नकोस'.

'नीरज' ह्या पुस्तकात लेखिकेतील आईने दु:खावेगात स्वत:ला, निसर्गाला, नियतीला, विज्ञानाला, वैद्यकशास्त्राला, नीरजला अक्षरश: हजारो प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे हे सगळे निरुत्तर करणारे प्रश्न आहेत. हे पुस्तक म्हणजे एका दुर्दैवी आईने आपल्या आसवांनी लिहिलेले 'प्रश्नोपनिषद' आहे. 'नीरज' हे पुस्तक म्हणजे नीरजच्या गोड आठवणींचं आईनं प्रेमानं केलेलं पारायण आहे. विकल मनाने केलेलं नीरजचं गुणसंकीर्तन आहे.

मुळात लेखिका धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांची आहे. म्हणूनच तिने विष्णूची आठवण या अर्थाने लाडक्या बाळाचे नाव 'नीरज' ठेवले आहे. तथापि नीरजला आरोग्य आणि आयुष्य न दिल्याबद्दल ती देवाच्या नाकर्तेपणाविषयी चिडून त्याचा निषेध करते, धिक्कार करते. म्हटलं तर हे नीरजचं चरित्रकथन आहे, म्हटलं तर एका अभागी आईचं अश्रूचिंब आत्मकथन आहे.

नीरज आपल्या शारीरिक विकलांगतेमुळे बराच वेळ घरीच राहात असे. त्यामुळे आई आणि मुलाचे भावविश्व अगदी एकजीव झाले होते. ह्या आईचा लेखिका बनण्याचाही आग्रह नाही, पण दु:खाचा निचरा करण्यासाठी (कॅथॉर्सिस) तिने आपल्या आणि बाळाच्या दु:खभोगाची ही कर्मकहाणी कथन केली आहे. हे सगळे दु:खाचे, वियोगाचे कढ एका आईच्या अंत:करणातून आलेले असल्यामुळे, आतमधून आलेले असल्यामुळे ह्या लेखनात एकप्रकारची 'आत्मधून' ऐकू येते. 'नीरज' म्हणजे आई आणि लेकराच्या अतूट नाळबंधाची करुणाजनक कहाणी आहे.

लेखिकेची भाषा अतिशय साधी, सोपी, प्रवाही, अलंकारविरहित तरीही ओघवती आहे. 'नीरज' हे शोकात्मजीवननाट्य किंवा शोकात्म काव्य असल्यामुळे ही कथा वाचताना वाचकाची आतडी पिळवटून निघतात. लेखिकेच्या जीवनचिंतनाने वाचक अस्वस्थ होतो.

लक्ष्मीकांत तांबोळी यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे लेखन म्हणजे करुणामयी नायिकेचे दर्शन घडविणारी वत्सलरसाने व्याप्त अशी मातृसंहिता आहे. लेखिकेने ह्या पुस्तकाची मांडणी छोट्या छोट्या 18 प्रकरणांमधून केली आहे. प्रकरणांना 'जिद्दीचा संघर्ष', 'निरागस बालपण', 'सुगंधाची पखरण', 'आगाऊ कुठला!', 'पिलाची तगमग', 'गोड गोजिरा बटू', 'प्रतिमेशी संवाद', 'सौंदर्य टिपणारी नजर', 'अश्रूंचा डोह', 'मैत्र जीवाचे', 'प्रेमाचा चहा', 'संवेदनशील तळमळ', 'प्रवास आनंदाचा', 'दर्दभरी दास्तॉं', 'खट्याळ नातू', 'माणूसवेडा', 'वेदनेपलीकडची शांतता', 'अपराजित योद्धा' अशी मोठी अन्वर्थक शीर्षके दिली आहेत. संपूर्ण वाचून संपल्याशिवाय पुस्तक सोडवत नाही.

'नीरज'चे मुखपृष्ठ आणि आतील मांडणी नयन बाराहाते यांनी अतिशय कल्पकतेने केली आहे. नीरजने काढलेली रेखाचित्रेही या पुस्तकात छापली आहेत. मयूर प्रकाशनाचे सतीश कुलकर्णी यांनी पुस्तकाची निर्मिती फारच देखणी केली आहे. 'नीरज' या पुस्तकात दुर्धरात फुललेल्या कमळाचा परिमळ पुस्तकाच्या पानोपानी दरवळत राहतो आणि म्हणूनच 'नीरज' म्हणजे मृत्यूच्या छायेत वावरणाऱ्या मातृत्वाची बखर आहे, असे म्हणावेसे वाटते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News