देशातील सर्वाधिक कोरोना चाचण्या महाराष्ट्रात: राजेश टोपे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 26 April 2020
  •  कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून चाचण्यांना सुरुवात 

मुंबई: गेल्या दीड महिन्यापासून राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कालावधीत 40 प्रयोगशाळांच्या माध्यमातून राज्य सरकारने तपासणी चाचण्यांचा एक लाखांवरील टप्पा गाठला आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात झाल्या असून, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्याच्या किमान एक महिना आधीपासून या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या निदानात मोठी मदत होत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

24 एप्रिलपर्यंत राज्यात एक लाख दोन हजार 189 नमुने पाठवण्यात आले होते. त्यापैकी 94 हजार 485 जणांच्या प्रयोगशाळेतील नमुन्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत; तर सहा हजार 817 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. राज्यात आजमितीस शासकीय आणि खासगी प्रत्येकी 20 अशा एकूण 40 प्रयोगशाळा आहेत. त्याद्वारे साधारणत: दररोज पाच ते सात हजार चाचण्या करण्याची या प्रयोगशाळांची क्षमता असून, जास्तीत-जास्त चाचण्या होत असल्याने कोरोनाच्या रुग्णांचे तातडीने निदान होणे शक्‍य होत आहे. 21 जानेवारीपासून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनासाठी प्रवाशांची तपासणी केली गेली. त्यानंतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा आरोग्य विभागामार्फत 14 दिवसांचा पाठपुरावा करण्यात आला. ज्या प्रवाशांना सर्दी-खोकला अशी लक्षणे आढळून आली, त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत होते.

राज्यात सुरुवातीला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) तपासणीची सुविधा होती. राज्यात साधारणत: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पाच जणांचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत तीन महिन्यांत राज्यातील चाचण्यांचा आकडा लाखांवर गेला आहे.

दृष्टिक्षेप

  • 1 लाख 2 हजार 189 जणांची - तपासणी
  • 6 हजार 817 जण - लक्षणे आढलेली
  • एकूण प्रयोगशाळांची संख्या- 40

चाचण्यांच्या क्षमतेत वाढ

सुरुवातीला फक्त पुणे येथे असलेली ही सुविधा मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालय, नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आली. संशयित रुग्णसंख्या वाढल्याने दरम्यानच्या काळात आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली. केईएम येथेही सुविधा सुरू झाली. टप्प्याटप्प्याने राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचबरोबर आयसीएमआरने खासगी प्रयोगशाळांनाही चाचण्यांना मान्यता दिल्याने राज्यात झपाट्याने प्रयोगशाळांची संख्या वाढत गेली. त्यामुळे ठिकठिकाणी चाचण्या मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्याचा रुग्णांच्या निदानात मोठा फायदा होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News