'बिदर' किल्ल्यावर झाली 'या' मशिदीची निर्मिती

प्रकाश पिटकर
Wednesday, 5 June 2019

'बिदर'चा किल्ला' फारच देखणा आहे. वास्तुशास्त्राची असामान्य निर्मिती इथे पावलापावलावर बघायला मिळते. इथल्या प्रत्येक वास्तूची भव्यता आणि नजाकत आपल्याला भुरळ घालत राहाते. एके काळी दक्खनच्या पठारावरची ही अतिशय सम्रुद्ध आणि समर्थ नगरी होती. इथले सुलतान पराक्रमी, कर्तृत्ववान होतेच पण कलेची वेगळीच जाण असणारे होते. या नगरीची कीर्ती त्यावेळी दिगंत पसरलेली होती.

'बिदर'चा किल्ला' फारच देखणा आहे. वास्तुशास्त्राची असामान्य निर्मिती इथे पावलापावलावर बघायला मिळते. इथल्या प्रत्येक वास्तूची भव्यता आणि नजाकत आपल्याला भुरळ घालत राहाते. एके काळी दक्खनच्या पठारावरची ही अतिशय सम्रुद्ध आणि समर्थ नगरी होती. इथले सुलतान पराक्रमी, कर्तृत्ववान होतेच पण कलेची वेगळीच जाण असणारे होते. या नगरीची कीर्ती त्यावेळी दिगंत पसरलेली होती. इथल्या कर्तृत्ववान सुलतानांनी आपल्या पराक्रमांनी मोठी मर्दुमकीच गाजवली नाही तर कलाकारांना मोठं प्रोत्साहन देऊन स्थापत्यशास्त्रातल्या तंत्रज्ञानात फार मोठी उंची गाठली. गुलबर्ग्याहून जेव्हा राजधानी इथे वसवली गेली तेव्हा या सुलतानांनी ही नगरी वसवताना प्रत्येक गोष्ट तब्बेतीत आणि योजनापूर्वक केली. नगरीभोवती तीन पदरी बुलंद असा तट बांधला. त्याला भव्य आणि मजबूत असे दरवाजे बांधले. किल्ल्याच्या आत मोठे महाल, उद्यानं, कारंजी बांधलीच पण आत मध्ये भव्य अशा दोन मशिदी बांधल्या. सोला खांब मशिदीच्या निर्मितीने स्थापत्यशात्राला वेगळ्या उंचीवर नेलं. किल्ला आहे बऱ्यापैकी उंचावर. दक्खनच्या हिरव्यागार पठारावर. इथून सगळं पठार आणि ही नगरी आपल्याला दिसत राहाते. आपल्या मनातल्या काल्पनिक चित्रापेक्षा सगळ्या गोष्टी आहेत अतिसुंदर गोष्टी आणि स्वप्नवत वाटाव्या अशा. त्यात दक्खनच्या पठारावरचा वाहणारा वारा आपल्याला वेगळ्या विश्वात नेतो. याच नगरीतली अजून एक असामान्य आणि मनाला स्मिमित करणारी निर्मिती म्हणजे आकाशाला स्पर्श करणारे इथले बहामनी मकबरे.

आपण बिदर शहरातून बाहेर पडलो की सगळीकडे दक्खनचं मोकळं पठार. साधारण साडेतीन किमी शहराबाहेर गेलो की दूरवर हे भव्य मकबरे आपली नजर वेधून घ्यायला लागतात. हे बारा मकबरे आहेत. यातला प्रत्येक मकबरा भव्य आणि आकाशाला स्पर्श करेल असा. शहराबाहेरचा आऊटर रिंग रोड क्रॉस केला की डावीकडे दूरवर एक वेगळीच वास्तू आपलं लक्ष वेधून घेते. एका छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर असलेली ही वास्तू 'चौखंडी' या नावाने मशहूर आहे. हा आहे एक सुंदर दर्गा. हजरत खलील उल्लाह दर्गा. माळरानावरच्या झाडीत असलेली ही आहे एक प्राचीन भव्य अष्टकोनी इमारत. बांधकाम नक्कीच जीर्ण आणि खूप जुनं असलं तरी तिची भव्यता आपल्याला तिकडे ओढून नेते. आजूबाजूला सगळा मोकळा आणि शांत निसर्ग. दूरवर पसरलेला हिरवागार माळ आणि वरती दिगंत पसरलेलं आकाश ... हा दर्गा फार पूर्वीपासून आहे. आत 'पीर' आहे. आत सहज साठ ते सत्तर फूट एवढं उंच सिलिंग आहे आणि त्यावर घुमट. आत मध्ये नैसर्गिक प्रकाश झिरपण्याची अतिशय सुंदर रचना आहे. त्यात हवाही चांगलीच खेळती राहील अशी बांधकामाची रचना आहे. मुख्य द्वाराच्या भोवती आणि आजूबाजूला पूर्वी वेगवेगळ्या रंगाच्या रत्नांचं सुंदर नक्षीकाम असावं. आजही त्याच्या स्पष्ट खुणा आपल्याला सहज दिसतात. आतला अवकाश इतक्या सुंदर रीतीने बांधलाय की आपण बाहेरचं जग आपोआप विसरतो आणि देवाशी संवाद साधायची मनाची एकाग्रता येते. खरं तर या सगळ्या जागांवर आत मध्ये 'कबर' असते. मकबर्यात आपल्या प्रिय माणसांची कबर असते किंवा पाच सहा कबरी देखील असतात. दर्ग्यामध्ये देखील कबर असते. पण ती समाजासाठी आयुष्यभर निस्वार्थ बुद्धीने काम केलेल्या माणसाची-संतांची कबर असते. सर्वसाधारणपणे याला 'पीर' म्हणायची पद्धत आहे. या कबरीला 'मजार' असंही म्हणतात. इथे त्याची नित्य पूजाअर्चा केली जाते. आत दिवा अखंड तेवत असतो. इथे लोक प्रार्थना करायला येतात. आपल्या अडचणी सांगतात आणि दुवा मागतात. मशीद असते तिथे गाभाऱ्यात काहीही नसतं. हे देऊळ असतं आणि लोक नित्यनियमाने तिथे प्रार्थनेसाठी येतात. 'चौखंडी' या दर्ग्यावर सगळ्याच धर्माच्या लोकांची नितांत श्रद्धा आहे आणि दूरवरचे लोक दर्ग्याच्या दर्शनाला येतात आणि आपली प्रार्थना रुजू करतात.

इथले बहामनी मकबरे या दर्ग्यापासून अगदी जवळ आहेत. या ठिकाणाला 'अष्टुर' असं म्हणतात. आपण त्या आवारात प्रवेश करतो आणि ते भव्य मकबरे बघून हरखयाला होतं. इथे असे बारा मकबरे आहेत. प्रत्येक वास्तू स्थापत्यशास्त्राची महती सांगणारी अशीच आहे. किती मोठे आहेत हे, आणि उंच तरी किती ... अक्षरशः आकाशाला स्पर्श करतील असे. हे सगळे मकबरे त्यांनी उभारले आपल्या राजघराण्यातल्या व्यक्तींसाठी. यातला एक आहे अहमद शाह वली या सुलतानाचा. हा सुलतान ख्वाजा बंदे नवाझ या सुफी फकिराचा निस्सीम भक्त होता. यानेच या सुलतानाला 'वली' हा 'किताब बहाल केला होता. याच्या आतल्या भिंतींवर अप्रतिम कलाकुसर आणि चित्रं आहेतच. पण कुराणातली भक्तीवचनं सोनं वापरुन लिहिलेली आहेत. इथल्या मुख्य कबरीसमोर दिवा अखंड तेवत असतो. दुसरा असाच लक्षवेधक मकबरा आहे सुलतान अल्लाउद्दीन शाह (दुसरा) याचा. यातही स्थापत्य आणि वास्तूशास्त्राची कमाल बघायला मिळते. इथे एक मकबरा पडक्या अवस्थेत आहे. त्याचा घुमट आणि एक बाजू पूर्णपणे पडलेली आहे. या पडक्या बांधकामावरून आपल्याला या मकबऱ्याआतल्या अवकाशाची चांगलीच कल्पना येते. स्थानिक कथा असं सांगते की हा मकबरा सुलतान हुमायून याचा आहे. त्याने तीन वर्ष राज्य केलं. मात्र तो अतिशय क्रूर असा शासक होता. त्याच्या कारकिर्दीत त्याने लोकांना अतोनात त्रास दिला. म्हणूनच बहुतेक त्याच्या मकबर्यावर वीज पडून त्याची ही अशी भग्नावस्था झाली. याच्या उलट अहमद शाह वली हा अतिशय चांगला शासक होता. आजही वर्षातून एकदा त्याच्या प्रित्यर्थ इथे उरूस भरतो. या ऊरुसाला दशक्रोशीतली हिंदू आणि मुस्लिम मोठया संख्येने येतात.

हे मकबरे आणि सगळ्या वास्तू बांधायला या सुलतानांनी टर्की आणि अरबस्तानातून निष्णात कारागीर आणले होते. हे सगळे मकबरे इंडो-इस्लामिक कलापरंपरेतले प्रामुख्याने नमूद करावेत, असेच आहेत. हजरत बंदे नवाझ, मेहमूद गवान या सारख्या अतिशय सच्च्या आणि निस्वार्थी धुरीणांनी ही असामान्य निर्मिती करायला मोठा हातभार लावलाय. मेहेमूद गवान हा तर त्यावेळचा अतिशय मोठा विद्वान होता. त्याने समरकंद आणि खोरासनच्या धर्तीवर इथे मोठं विद्यालय उभारलं. बिदरमधल्या स्थापत्य आणि वास्तुशास्त्र असामान्य निर्मितीत त्याचा सिंहाचा वाटा आहे.

समृद्धी आणि विचार केवढे प्रचंड तर आपल्या माणसांना मरणानंतरही चिरविश्रांतीसाठी त्यांनी कल्पनेपलीकडे भव्य आणि नजाकतदार वास्तू उभारल्या. त्यासाठी वास्तुशास्त्राच्या स्वतःच्या कल्पनांना साकार केलं. बाहेरून निष्णात आणि कसबी कारागीर आणले. आत अतिभव्य, सुंदर आणि नीरव शांततेचा असामान्य असा अवकाश तयार केला. त्यात बाहेरच्या कुठल्याही अभद्र गोष्टीचा शिरकाव होऊ नये आणि पावित्र्य जपलं जाईल, याची पुरेपूर काळजी घेतली. स्थापत्यशास्त्राने असामान्य आणि कमाल कामगिरी केली. हे मकबरे त्यांनी वस्तीपासून दूर बांधले. भोवताली तट बांधून त्यात पाण्याची व्यवस्था केली. सभोवताली हिरवागार निसर्ग, मोकळेपणा आणि शांतता या सगळ्याचा कसोशीने विचार करूनच हे सगळं निर्माण केलं. बिदर आजही पर्यटकांना तेवढं माहित नाहीये. त्यात हे मकबरे गावापासून दूर असल्याने सर्वसाधारणपणे कोणीही नसतं. सगळ्या आसमंतात मनाला सुखावणारी शांतता असते. खरं तर हे एक वेगळंच असं स्वतंत्र विश्व आहे आणि आपण त्यातून विशाल आकाशाची पार्श्वभूमी आहे. सुंदर वास्तू, मोकळा परिसर, मनाला स्पर्श करणारी शांतता आपला संवाद अवकाशाशी घडवून आणते. खरं तर वेगळीच भावना असते. जी सध्या अतिशय दुर्मिळ झाल्येय. आकाशाचा, शांततेचा सुंदर असा स्पर्श आपण कधीही अनुभवलेला नसतो. फार फार मस्त वाटतं. इथून जाऊच नये,असंही वाटत राहतं. खरं तर मकबरा म्हणजे कबर असलेली जागा. म्हणजे अमंगल. पण इथे मनाला स्पर्श करणारी मंगलता नक्कीच आहे. वास्तूचं देणं किती अलौकिक आणि दिव्य असतं, हे इथे आपण प्रत्यक्ष अनुभवतो. कधी त्या बाजूला गेलात, तर बिदरला जरूर जा. दक्खनच्या पठारावरचं फार मोठं आणि अभिमान वाटेल असं ऐश्वर्य इथे नांदतंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News