लग्नात फक्त चामड्यापासून बनवलेल्या मोजडीची मज्जा...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

रणवीर आणि दीपिकाच्या लग्नानंतर ‘मोजडी’ या पादत्राणांचा ट्रेण्ड पुन्हा रुजू लागला. मुघल साम्राज्यातील राजा सलीम शाह याला मोजडी हा पादत्राणाचा प्रकार आवडत असे; त्यामुळे मोजडीला ‘सलीम शाही’ असेही संबोधले जाते.

महाराष्ट्रामध्ये लग्न, मुंज, पाडवा आदी महत्त्वाच्या सणांना मोजडीचा हमखास वापर केला जातो. ही मोजडी साधारणत: चामड्यापासून बनविली जाते. त्यावर सुंदर कोरीव काम, धाग्याची नक्षी, मणी आदींनी  मोजडीला आकर्षक रूप दिले जाते. पारंपरिक राजस्थानी मोजडी तरुण-तरुणांना आकर्षित करते. राजे-महाराजे यांनी घातलेल्या मोजडींना युवावर्गातून मोठी मागणी आहे. जुन्या काळातील मोजडीला फॅशनच्या जमान्यातही चांगले दिवस आले आहेत. महाराष्ट्रातील कोल्हापुरी चप्पल जशी सर्वांना भुरळ घालते, तशाच प्रकारे राजस्थानी मोजडीची जादू दिवसेंदिवस वाढत आहे.

भारतीयांसह विदेशी पर्यटकांना राजस्थानी मोजडी ही आकर्षित करताना दिसत आहे. राजस्थानी मोजडीचे मुख्य आकर्षण म्हणजे तिची पारंपरिक बनावट. राजस्थानातील स्थानिक कारागीर मोजडीवर रंगबिरंगी धाग्यांनी सुंदर नक्षी तयार करतात. बाजारात २०० रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत मोजड्या उपलब्ध आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना दुकानातील शोकेसमध्ये ठेवलेल्या विविध रंगीबेरंगी व आकर्षक डिझाईनमधील मोजडी आकर्षित करतात. काळानुरूप फॅशनमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. त्याला मोजडीही अपवाद ठरली नाही. मोजडीमध्ये झालेल्या बदलांचा घेतलेला वेध... 

मोजडीचे काही प्रकार
पारंपरिक लेदर मोजडी

ही मोजडी मृत प्राण्याच्या चामड्यापासून बनवली जाते. तसेच सध्या बनावट चामड्याच्याही मोजड्या बाजारात उपलब्ध आहेत. काही मोजडीवर नक्षीकाम केलेले असते; तर काही सर्वसाधारण पॉलिश केलेल्या प्लेन मोजड्या असतात. 

जोधपुरी मोजडी

जोधपुरी मोजडीचे वैशिष्ट्य म्हणजे, तिचे टोकदार निमुळते टोक. जोधपुरी प्रकारच्या मोजडीच्या पुढील आवरणास मध्यभागी सोनेरी किंवा चंदेरी रंगाची पट्टी लावलेली असते. मोजडीचे आकर्षक टोक तिला एक वेगळेच रूप देते. 

विणकाम केलेली मोजडी 

सर्वसाधारण मोजडीला धाग्यांचे नक्षीकाम करून अधिक आकर्षक बनविण्याचा प्रयत्न कारागीरांनी केला आहे. अशा प्रकारच्या मोजडीमध्ये दोन प्रकार उपलब्ध आहे. एक म्हणजे सर्वसाधारण मोजडी आणि दुसरी म्हणजे अशी आकर्षक मोजडी. पाहताक्षणी त्या खरेदी केल्याशिवाय कोण बरं थांबेल! कुर्ता-पायजमा तसेच शेरवानी घातलेल्या तरुणांच्या सौंदर्यात मोजडी भर घालते. महिलादेखील साडीवर व तरुणी जीन्स व टॉपवर मोजडी वापरतात. 

कोणत्या पोशाखावर वापराल मोजडी? 

तरुण कुर्ता-पायजमा व शेरवाणीवर; तर तरुणीने चुडीदार, सलवार-कुर्ता, जीन्स व टॉपवर वापरल्याने त्यांच्या पोषाखात परिपूर्णता येते. 

काही महत्त्वाच्या गोष्टी  
मोजडी खरेदी करताना हे लक्षात घ्या की, ती पायात घट्ट बसत नाही ना? त्यासाठी थोडी सैल बसेल अशीच मोजडी खरेदी करा. 
काही दिवस मोजडी वापरल्यानंतर पायाला फोड येतात. मराठीत आपण त्याला चप्पल चावली असे म्हणतो. त्यासाठी मोजडी ज्या ठिकाणी लागते, त्या जागी मेण लावावे.
पांढरा कुर्ता-पायजाम्यावर राखाडी किंवा क्रीम रंगाची मोजडी एक वेळा अवश्‍य ट्राय करा. 
सलवार-कुर्त्यावर तर मोजडी घालणे विसरू नका. 
मोजडी विकत घेताना ती दुकानातच पायात घालून पाहिली पाहिजे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News